कालची पोरं आम्हाला राजकारण शिकवताहेत
एकनाथ खडसे यांची स्वकियांवर तुफान टोलेबाजी
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : ज्या कष्टानं आम्ही महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर भाजपचं सरकार आणलं, त्या कालखंडात आताचे अनेक लोक नव्हते. ते १०-१२ वर्षे झाले राजकारणात आले आणि चमकायला लागले. ही कालची पोरं आम्हाला राजकारण शिकवू लागली आहेत, अशी तुफान टोलेबाजी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.
खडसे यांच्या ६८ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्रिपद गेल्यापासूनच खडसेंच्या मनात पक्षातून डावललं गेल्याची भावना आहे. ती त्यांच्या प्रत्येक भाषणातून दिसून येते. या कार्यक्रमातही खडसे यांनी आपल्याला राजकीय विजनवासात घालवणा-या भाजपमधीलच स्वकियांवर एकामागून एक टीकास्त्र डागले.
संतापाचा विस्फोट होईल
खडसे म्हणाले की, या सगळ्यांमुळं महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. त्या संतापाचं एकत्रिकरण कधी होईल आणि त्याचा स्फोट कधी होईल हे सांगता येणार नाही. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे राज्यभर दौरा करेन. मला अनेक पक्षांकडून ऑफर होती. पण ज्या पक्षात ४० वर्षे निष्ठेनं काढली, तो सोडून जावं असं कधी वाटलं नाही.
महाराष्ट्रात सत्ता का गेली?
एकेकाळी कै. गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, गडकरी, गिरीश बापट, मुनगंटीवार आणि माझ्यासारख्या काही नेत्यांनी कष्टानं पक्ष उभारला होता. मागच्या वेळेस युती नसतानाही एकहाती सत्ता राज्यात मिळाली. आता केंद्रात सरकार असताना, महाराष्ट्रात अनुकूल परिस्थिती असताना सत्ता का गेली? याचे उत्तर द्यावे, असे खडसे म्हणाले.
‘मी येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही घोषणा जनतेला आवडली नाही का? की वेगळं काही कारण होतं? याचा शोध मी घेतोय,’ असा टोला खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला.