थिंक टँक / नाना हालंगडे
वर्षातून दोन महाएकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..
पाहा महापुजेचा व्हिडिओ
या दिवशी लोक उपवास करतात. भजन-कीर्तनात दिवस घालवितात. विठ्ठलाची महापूजा करतात.हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिक एकादशी म्हणतात. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी चातुर्मास संपतो. कारण या तिथीला भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रातून बाहेर पडतात. चातुर्मासाच्या शेवटी, भगवान विष्णू पुन्हा सृष्टीचे संचालन करण्याची जबाबदारी घेतात.
या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत करण्याचा नियम आहे. कार्तिकी एकादशीपासून मांगलिक कार्याला सुरुवात होते. आपल्याकडे लोक खूप भक्तिभावाने प्रत्येक एकादशीचा उपवास करतात. पंचांगानुसार कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवार, 03 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 07.30 पासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार, ०४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०६:०८ वाजता संपेल. अशा स्थितीत उदयतिथीच्या आधारे कार्तिकी एकादशीचे व्रत 04 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे.
एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून व्रत करावे. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. हा दिवस विष्णू देवाला जागृत करण्यासाठी असतो अशी मान्यता आहे. शंख आणि घंटा वाजवून त्यांना जागृत केले जाते. यानंतर भगवान विष्णूसमोर दिवा आणि उदबत्ती लावा. त्यानंतर त्यांना फळे, फुले आणि भोग अर्पण करावेत.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीचा नैवेद्य दाखवावा, असेही म्हणतात. संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करताना विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. एकादशीच्या पूर्वसंध्येला सात्विक अन्नच खावे. एकादशीच्या व्रतामध्ये अन्न सेवन केले जात नाही. एकादशीला तांदूळ खाण्यास मनाई आहे.
कार्तिकी एकादशीला मांगलिक कार्यांच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे, कारण या तिथीपासून लग्न, मुंज, गृहप्रवेश आदी मंगल कार्यांना सुरुवात होते. देवशयनी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत चार महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. कारण भगवान विष्णू हे चार महिने योगनिद्रामध्ये राहतात. या एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूची आराधना केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजनही केले जाते. तुळशीविवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणीही दूर होतात.
प्राचीन धारणा
आज कार्तिकी एकादशीबद्दल एक कथा प्रचलित आहे . मृदुमान्य या राक्षसाने भगवान शंकरांची भक्तिपूर्वक आराधना केली . त्याचा भक्तिभाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले . त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला की , तू कोणत्याही पुरुषाकडून मरणार नाहीस , पण एका स्त्रीच्या हातून मारला जाशील . असा वर मिळताच या राक्षसाचा पूर्वी असलेला मृदू स्वभाव नष्ट झाला . त्याचे कारण म्हणजे शंकरांनीच त्याला अमरत्वाचा वर दिलेला असल्याने त्याच्यापुढे कुणाचाही निभाव लागला नाही .
सर्व देव व स्वतः भगवान शंकर एका गुहेत लपले . त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली . तिचेच नाव एकादशी . तिने मृदुमान्याला ठार मारले तेव्हा प्रचंड पाऊस कोसळला . त्यामुळे देवांची अंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे काहीही खायला न मिळाल्याने उपवासही घडला . त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरू झाली.
पुढील दोन महिन्यात जगावर भीषण संकट! बाबा वेंगा यांचे धडकी भरवणारे भाकीत | Think Tank Live