काय सांगता? गुवाहाटीला पुन्हा जाणार शिंदे गटाचे सर्व 50 आमदार!
Guwahati Assam
मुंबई : विशेष प्रतिनिधी
आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. हे भांडण फक्त दोघांपुरते सीमित राहिले नाही. याचे पडसाद इतर ५० आमदारांवरही उमटू लागले आहेत. याची दखल घेत हा वाद मिटवण्यासाठी राज्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करताना दिसत आहेत.
अशातच आता पुन्हा एकदा या सर्वच ५० बंडखोर आमदारांना गुवाहाटीला नेण्यात येणार असल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे. परिणामी “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” चा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे.
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील शाब्दिक युद्ध अजूनही सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बच्चू कडू आणि रवी राणा यांना समोरासमोर बसून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कडू आणि राणा यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ज्यात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडी पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वेग धरण्याची दाट शक्यता आहे. शिंदे गटाच्या 50 आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेलं जाणार असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि तब्बल 40 शिवसेना आमदारांना घेऊन सत्तेबाहेर पडले. त्यांच्यासह मित्रपक्ष आणि अपक्ष अशा 10 आमदारांनी देखील सोबत घेतले. हे सर्व आमदार गुवाहाटीच्या एका आलिशान आणि महागड्या हॉटेलमध्ये थांबले होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देण्यासाठीच ते महाराष्ट्रात परत आले.
शहाजीबापूंनी गुवाहाटी गाजवली
शिंदे गटाच्या या सर्व 50 आमदारांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता. महाराष्ट्रातील हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामी होते. आ. शहाजीबापू पाटील यांचा फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांना त्यांनी कॉल केला होता.
त्यामध्ये त्यांनी “काय झाडी, काय डोंगार.. काय हाटील… एकदम ओक्केमध्ये आहे..” अशा सार्थ शब्दांत वर्णन केले होते. हा डायलॉग अजूनही महाराष्ट्रात चर्चिला जात असतो. आता पुन्हा एकदा हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीला जाणार असल्याने आता आमदार शहाजीबापू पाटील कोणता डायलॉग म्हणणार, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
नवे सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. या दुसऱ्या टप्प्याकडे अनेक आमदारांचं लक्ष आहे. अनेक आमदारांना मंत्रिपदाची आशा आहे. दुसऱ्या टप्प्यातील विस्तार लवकर होत नसल्याने बच्चू कडू नाराज असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आवाजात सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तारही लवकर होणार असल्याची माहिती खासगी वृत्तवाहिन्या देत आहेत. याशिवाय महामंडळाचादेखील फॉर्म्युला ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवे सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. या दुसऱ्या टप्प्याकडे अनेक आमदारांचं लक्ष आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुढच्या महिन्यात दोन नियोजित दौरे आहेत. एक म्हणजे गुवाहाटीचा कामाख्या देवीच्या दर्शनासाठीचा दौरा आणि दुसरा म्हणजे अयोध्या दौरा. या दोन्ही दौऱ्यात हे सर्व बंडखोर आमदार असतील असे सांगितले जात आहे.
शिंदे गटाच्या 50 आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेलं जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.