काकी : वंचित, उपेक्षितांची माता
सांगोला तालुक्याला दोन आमदार व जि. प. अध्यक्षा देणारी माय माऊली
सांगोला : तालुका प्रतिनिधी
समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन हयातभर समाजसेवा करणाऱ्या आणि दिन-दलित, भटक्या, विमुक्त, उपेक्षित व वंचितांची माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह. भ. प. शारदादेवी साळुंखे पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून वयाच्या ८३ व्या वर्षी सांगोला येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री १ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रविवार दि. ४ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवण्यात येणार आहे तर स ११ ला अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. दु १.०० वा. त्यांच्या पार्थिवावर जवळा येथील शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
सांगोला तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. पती स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व मुलगा मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या रूपाने शारदादेवी साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याला दोन आमदार व कन्या जयमालाताई गायकवाड यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले.
त्यांच्या पश्चात मा. आम. दिपकआबा व डॉ.प्रदीपदादा ही दोन मुले व जयमाला गायकवाड व चारुशीला काटकर अशा दोन मुली तर सौ. रुपमती दिपक साळुंखे व सौ. मधुमती प्रदीप साळुंखे या दोन सुना तर डॉ. पियुष साळुंखे, यशराजे साळुंखे, प्रियांका साळुंखे- देशमुख, मुक्ता साळुंखे-गायकवाड, कु. कृष्णाई साळुंखे, डॉ.निलेश काटकर, आरती काटकर-घाडगे, विक्रम गायकवाड, नेहा गायकवाड-आमरे आदी नातवंडे असा परिवार आहे. स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या पार्थिवावर जवळा ता.सांगोला येथे रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी दु. १.०० वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत्या.
महिनाभरापासून सांगोला येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. तब्बल महिनाभर तज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही वाढत्या वयामुळे ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या शरीराने उपचारास साथ न दिल्याने अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर १.०० च्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.
सांगोला तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्यावर पती स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व मुलगा मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवला.
राज्यातील सर्व आमदारांच्या विधवा पत्नींना फरकासह पेन्शन मिळावी म्हणून सर्वप्रथम त्यांनी पाठपुरावा केला आणि या मागणीला यशही मिळाले. सांगोला तालुक्यातील मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे म्हणूनही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून जवळा ता सांगोला येथे तालुक्यातील मुलींचे पहिले ज्युनिअर व सीनियर कॉलेज सुरू केले.
तालुक्यातील गोरगरिबांच्या मुली शिकल्या पाहिजेत त्यांनीही मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेत उतरले पाहिजे असा त्यांचा नेहमी अट्टाहास असायचा. ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांना आमदारांची विधवा पत्नी म्हणून मिळणाऱ्या फरक व पेन्शनमधून जवळा पंचक्रोशीतील सर्व दिन दलित, भटक्या, विमुक्त, उपेक्षित, वंचित, गोरगरीब, अनाथ, निराधार अशा सर्व घटकांना सढळ हाताने मदत केली. उपेक्षित आणि वंचितांची माता म्हणून त्यांना सांगोला तालुक्यात ओळखले जात होते.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबरोबरच गेल्या ३० हून अधिक वर्षे त्या अध्यात्मिक क्षेत्रातही सक्रिय होत्या. पंढरपूरच्या पांडुरंगावर त्यांची अगाध श्रद्धा होती. दर महिन्याला त्या न चुकता पांडुरंगाची पायी चालत वारी करत होत्या. श्री. संत ज्ञानेश्वर माऊलीवर त्या उत्तम प्रवचन करत होत्या.
अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांनी सढळ हाताने दानधर्म केला. ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या निधनामुळे सांगोला तालुक्यात कधीही भरून न निघणारी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक पोकळी निर्माण झाली आहे. गोर-गरीब, दीन-दलित, उपेक्षित, वंचित यांना भरल्या हाताने मदत करणाऱ्या काकींचे निधन झाल्याने सांगोला तालुक्यावर असणारे एक मायेचे छत्र हरपले असल्याची भावना सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे यामुळे संपूर्ण तालुक्यातील सामान्य नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.
गौरी आल्या पण सांगोला तालुक्याची लक्ष्मी गेली..!
सर्वत्र काल दि. ३ सप्टेंबर रोजी घरोघरी गौरीचे आगमन करण्याची तयारी सुरू असतानाच मध्यरात्री अचानक ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील तथा काकींचे निधन झाले. त्यामुळे राज्यभर घरोघरी गौरी आल्या असल्या तरी सांगोला तालुक्याची खरी लक्ष्मी अर्थात शारदादेवी साळुंखे पाटील आज तालुक्याला कायमची सोडून गेली असल्याने या सणावर शहर आणि तालुक्यात दुःखाचे सावट दिसून आले.
अशी माता पुन्हा होणे नाही..!
आमदारांची विधवा पत्नी म्हणून ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील तथा काकी यांना पेन्शन आणि त्यातील फरक असे लाखो रुपये मिळाले होते. सामाजिक जाण आणि भान असणाऱ्या काकींनी या पैशातील एकही रुपया स्वतः साठी किंवा कुटुंबासाठी खर्च न करता या पैशातून आपल्या शेतात काम करणाऱ्या निराधार आणि गरीब महिलांना सोन्याचे दागिने घेऊन ते भेट दिले.
यातून जी रक्कम शिल्लक राहिली होती त्यातून जवळा गावातील सर्व वयोवृद्ध आणि गरीब महिलांना स्वतःच्या खर्चातून तीर्थयात्रा घडवून आणली होती. आज काकींच्या निधनामुळे त्यांच्या अशा अनेक आठवणी त्यांनी मदत केलेल्या महिलामधून जागवल्या जात होत्या.