ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

काँग्रेस कभी मरती नही…

विजय चोरमारे यांचा सणसणीत लेख

Spread the love

मोदींच्या समोर कोण आहे, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. ममता बॅनर्जी यांच्यापासून के. चंद्रशेखर राव यांच्यापर्यंत अनेक नेते आपले लंगडे घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत होते. अशा सगळ्यांना भारत जोडो यात्रेने थेट उत्तर दिले आहे.

भारत जोडो यात्रेला सुरुवातीपासून मिळणा-या प्रतिसादामुळं कुतूहल होतं. एवढी ऐतिहासिक यात्रा टीव्हीवरून, वृत्तपत्रांतून येणा-या बातम्यांमधून समजून घेणं कठीण होतं. कारण प्रत्यक्ष यात्रा आणि तिचं या कॉर्पोरेट माध्यमातून दिसणारं चित्र एक शतांशही नव्हतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीएक अंदाज येत होता. परंतु दिसणारं, दाखवलं जाणारं चित्र आणि प्रत्यक्षातलं चित्र यात जमीन अस्मानाचं अंतर असतं हे पंचवीस वर्षांच्या रिपोर्टिंगमुळं माहीत होतं. यात्रेत सहभागी व्हावं असं वाटत होतं, त्याची दोन कारणं. एक पत्रकार म्हणून यात्रेचा प्रत्यक्ष अनुभव घेणं. आणि दुसरं म्हणजे राहुल गांधी जे मुद्दे घेऊन निघाले आहेत, त्यासोबत आपण उभं राहणं, चार पावलं चालणं.

राहुल गांधी यांना भेटणं किंवा त्यांच्यासोबत फोटो काढणं वगैरे उद्देश मुळातच नव्हता. तरीही शेगावमध्ये पोहोचण्यापूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांशी संपर्क साधून राहुल गांधी यांची भेट होण्यासंदर्भातील चाचपणी केली. स्वतंत्र भेट शक्य नाही, परंतु पदयात्रेत चालता चालता बोलणे शक्य होऊ शकेल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु आदल्या संध्याकाळी तीही शक्यता मावळली. कारण तो दिवस इंदिरा गांधी यांच्या जयंतीचा असल्यामुळे राहुल गांधी यांनी तो फक्त महिलांसाठी राखीव ठेवला होता. त्यामुळं यात्रेत सहभागी होण्यापूर्वीच राहुल गांधींशी भेट हा विषय निकालात निघाला होता.

शेगावच्या मार्केट यार्डचा परिसर उजळून निघाला होता. पहाटेपासूनच गर्दीने विशेषतः महिलांच्या गर्दीने गजबजला होता. पोलिसांची ढकला ढकली, नेते-कार्यकर्त्यांशी हमरीतुमरी वगैरे होत असतानाच आले आले… म्हणत गलका झाला. पदयात्रा सुरू झाली आणि राहुल गांधी त्यांच्या विलक्षण झपाट्याने चालत राहिले. बघता बघता राहुल गांधी पुढं निघून गेले आणि आम्ही खूप मागं राहिलो. पदयात्रेचा माहोल विलक्षण ऊर्जादायी होता. राजकारणापलीकडची गर्दी होती. एका ध्येयानं झपाटल्यासारखी चालणारी. थोडं अंतर चालल्यावर कुणीतरी हाक मारली, तर औरंगाबादच्या संगीता सांबरे होत्या. त्यांच्यासोबतच्या सोनल पाथ्रीकर यांनीही हाय केलं. या दोघीही फेसबुकवर सक्रीय असलेल्या आणि ठामपणे भूमिका मांडत राहणा-या. दोघींनी फोटोचा आग्रह केला. सोनल पाथ्रीकर यांची मुलगी वैष्णवी सोबत होती, तिनं आमचा फोटो काढला. त्यांचा निरोप घेऊन पुढं निघालो.

दुपारनंतर भारत जोडो यात्रेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला. एक छोटी मुलगी राहुल गांधी यांना बिलगल्याचा फोटो होता. अरे, ही तर सकाळी आपला फोटो काढणारी वैष्णवी. झूम करून बघितलं तर तिच्या डोळ्यातून ओघळलेला थेंब दिसत होता. भारत जोडो यात्रेतल्या उत्तम फोटोंपैकी हा एक फोटो असावा.

दुस-या दिवशी सोनल पाथ्रीकर यांनी आपल्या मुलीच्या राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीसंदर्भात एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलंय- `फार बोलका भावनिक फोटो आहे हा. दोघांनीही एकमेकांना किती सुंदर जवळ घेतले आहे. त्यात तिचे आनंदाश्रू!!! ती फार पटकन कोणाच्या इतकी जवळ जात नाही. मनानेही शरीरानेही. त्यासाठी वेळ घेते. पूर्ण विश्वास वाटत नाही, तिला कम्फर्ट, कॉन्फिडन्स वाटत नाही तो पर्यंत एक अंतर ठेवून असते. मुलांना वाईब्स कळतात. त्यामुळेही हा फोटो खूप अर्थपूर्ण आहेच.`

`वैष्णवीला राहुल गांधी यांनी नाव काय, कुठून आलीस, कोणता विषय आवडतो, काय बनायचे आहे वगैरे विचारले. वैष्णवी सहाव्या इयत्तेत शिकणारी चिमुरडी. ती त्यांना म्हणाली, काश्मिरकडे थंडी असेल स्वेटर घेतले का? नाही घेतले म्हणाले आणि हसून डोक्यावर, खांद्यावर हात ठेवला. मग वैष्णवीला काही बोलताच आले नाही. रडूच आलं…`

राहुल गांधी तरुणांशी, वृद्धांशी, तरुणींशी, लहान मुला-मुलींशी ज्या सहजतेने संवाद साधताहेत त्यावरून शिंतोडे उडवणारे सडके मेंदू खूप आहेत. त्यांच्या मेंदूतील घाण काढण्यासाठी मला वाटतं वैष्णवीचा हा किस्सा पुरेसा आहे.

************

भारत जोडो यात्रा सात सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरू झाली. ३५७० किलोमीटरची, १५० दिवसांची ही ‘नॉन-स्टॉप’ पदयात्रा आहे. ज्यामध्ये देशभरातील १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल. कन्याकुमारीपासून सुरू होऊन यात्रा श्रीनगरमध्ये संपेल.

यात्रेच्या प्रारंभी एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले होते की, मी या पदयात्रेचे नेतृत्व करणार नाही, तर त्यात सहभागी होणार आहे. यात्रेचे जे प्रमुख उद्देश स्पष्ट करण्यात आले होते ते प्रामुख्याने असे होतेः १)आर्थिक विषमतेच्या विरोधात, २)जात, धर्म, भाषा, प्रांत किंवा वंशाच्या आधारे वाढत्या भेदभावाच्या विरोधात, ३) वाढती बेरोजगारी, महागाई आणि गुन्हेगारीच्या विरोधात आणि ४) केंद्रसरकारकडून होणा-या केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाच्या आणि घटनात्मक संस्थांच्या खच्चीकरणाच्या विरोधात.

या माध्यमातून लोकांशी थेट संपर्क साधणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांचे प्रश्न समजून घेतले जाणार असल्याचे सांगून राहूल गांधी यांनी ही यात्रा भाजप-आरएसएसच्या विचारधारेच्या तसेच द्वेषाच्या वातावरणाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले होते. ही काँग्रेसची प्रचारयात्रा नसल्याचे सुरुवातीपासून वारंवार सांगण्यात येत आहे. भाजपविरोधात संघर्ष करणा-या देशातील सर्व घटकांना तसेच राजकीय पक्षांना सोबत घेण्यासाठी तसे सांगण्यात येत असले तरी ही यात्रा काँग्रेसने, काँग्रेससाठी काढलेली यात्रा आहे हे नाकारता येत नाही.

मोदींच्या समोर कोण आहे, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. ममता बॅनर्जी यांच्यापासून के. चंद्रशेखर राव यांच्यापर्यंत अनेक नेते आपले लंगडे घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत होते. देशभरात व्याप्ती असलेल्या काँग्रेस पक्षाची हेटाळणी करून काँग्रेसला कमी लेखण्याचा प्रयत्न करीत होते. अशा सगळ्यांना भारत जोडो यात्रेने थेट उत्तर दिले आहे. काँग्रेस हाच देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वामागे कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रचंड जनाधार असल्याचे भारत जोडो यात्रेने दाखवून दिले आहे.

राहिला मुद्दा महाराष्ट्र काँग्रेसचा. राहुल गांधींच्या कर्तृत्वावर काँग्रेसला उभे राहता येणार नाही. महाराष्ट्र हा पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली असली तरी काँग्रेसचा पाया मजबूत आहे. भविष्याकडे वाटचाल करताना सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व पक्षाला हवे आहे. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्याकडे आजघडीला ती क्षमता नाही. त्यांची सन्मानाने मार्गदर्शक मंडळात प्रतिष्ठापना करून नव्या नेतृत्वाकडे सूत्रे द्यायला हवीत. मग ते सतेज पाटील असतील, विश्वजित कदम असतील किंवा आणखी कुणी. तर आणि तरच काँग्रेस पुन्हा उभी राहील.

वर्तमानातील आव्हानांचा सामना करता येत नसेल तर असा काँग्रेस पक्ष मेलेला बरा, अशा भावना स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्यापासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यापर्यंत अनेकांनी यापूर्वी व्यक्त केल्या आहेत. हे दोघेही भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींसोबत चालताना दिसले, हे खूप काही सांगणारे आहे. काँग्रेस कभी मरती नही… हे खरं असलं तरी ती नुसती जगून उपयोग नाही तर ती जिवंत हवी. प्रत्येक काळजाचा ठोका जिवंत असलेली काँग्रेस.

– विजय चोरमारे (लेखक हे वरिष्ठ पत्रकार आहेत.)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका