ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

कणेरीच्या काडसिद्धेश्वर स्वामींचा “अदृश्य” महिमा

महाराज भाजपात जाणार?

Spread the love

अलीकडच्या काळात मठामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, हिंदुत्ववादी संघटनाच्या प्रतिनिधींचा ठळकपणे वावर वाढला आहे. कणेरी मठ म्हणजे कोल्हापूरची रेशीमबाग असे वर्णन टीकाकार करताना दिसतात. काडसिद्धेश्वर स्वामी हे भाजपचे लोकसभेचे भावी उमेदवार असल्याचे म्हटले जाते. त्याचा स्वामींनी इन्कार केला असला तरीही चर्चा थांबताना दिसत नाही.

स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे
शाहू नगरी आणि पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून देशात नावलौकिक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाने नवा वाद सुरू केलाय. इथले महाराज भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे छुपे हस्तक असल्याचाही आरोप केला जात आहे.

Kaneri matha of Kolhapur district, which is famous in the country as Shahu city and district of progressive thoughts, has started a new controversy. It is also being alleged that the Maharaj here is a hidden hand of BJP and Rashtriya Swayamsevak Sangh.

कणेरी मठात ५० हून अधिक देशी गाईंचा मृत्यू झाल्याने विविध अंगांनी चर्चा रंगते आहे. मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची कार्यशैली, राजकीय नातेसंबंध हे विषयही यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. महाराज हे भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे छुपे हस्तक आहेत का? पंच महाभूत हे थोतांड आहे का? यावर चर्चा झडत आहेत.

(Advt.)

चालते-बोलते वेदान्त
कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गालगत कणेरी मठ आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन केंद्रात या प्राचीन तीर्थस्थान असलेल्या मठालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे साधू, संत, महंत तसेच अनंत नामवंत दर्शनासाठी येत असतात. जगद्गुरु काडसिद्धेश्वर हेमांडपंती शिल्पकलेचे भव्य शिवमंदिर येथे आहे. मठ सर्व जाती-धर्मांसाठी खुला करणारे श्री मुप्पीन सिद्धेश्वर स्वामी म्हणजे चालते-बोलते वेदान्त असे म्हटले जाते.

मठाची सूत्रे अदृश्य काडसिद्धेश्वर यांच्याकडे
मोठी भूसंपदा, अर्थसंपदा असलेल्या मठाची सूत्रे अलीकडे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडे एकवटली आहेत. मठावर प्रामुख्याने लिंगायत समाजाचा प्रभाव असला तरी सर्व धर्मीय लोक येथे दर्शन, पर्यटनासाठी येत असतात. यातून मोठी उलाढाल होत असते.

राजकीय नेतेमंडळीचाही वावर
अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी १९७७ साली सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशनची स्थापना केली. नंतर मठात शिक्षण, पर्यटन, कृषी, ग्रामीण संस्कृतीचे संग्रहालय, गोशाळा, सांस्कृतिक उपक्रम, रुग्णालय असा पसारा वाढत गेला. येथील गोशाळा मोठी आहे. रमणीय परिसरात पर्यटक, भाविक यांच्या बरोबरीने राजकीय नेतेमंडळी यांचाही वावर वाढला. स्वाभाविक मठ – स्वामी यांना विशेष महत्त्व आले.

४०० विविध प्रकारच्या भारतीय देशी गाई
कणेरी मठात सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद करणारा उपक्रम राबवला जातो. त्याच्या जोडीनेच मठामध्ये ४०० विविध प्रकारच्या भारतीय देशी गाई आहेत. त्यात प्रामुख्याने लाल कंधारी, देवणी आणि खिल्लारी या गाईंचा समावेश आहे. गाईपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण; गोमूत्रापासून विविध पदार्थ मठात तयार केले जातात. दरवर्षी गो परिक्रमा आयोजित केली जाते.

पशुपालक ‘गायो विश्वस्य मातरम्’ अशा घोषवाक्य असलेल्या टोप्या घालतात. गोमूत्र व शेणापासून खतनिर्मिती केली जाते. गोमूत्रापासून आरोग्य विषयक औषधी तयार केल्या जातात. काडसिद्धेश्वर स्वामी गाय संवर्धनाचे महत्त्व सांगत असतात. पंचमहाभूत महोत्सवात गोसंवर्धनावर विशेष भर दिला जात आहे.

कणेरी मठ म्हणजे कोल्हापूरची रेशीमबाग
कणेरी मठामध्ये विविध जातीपाती, पंथाचे लोक दर्शनासाठी येतात. विविध पक्षांचे नेतेही येत असतात. दहा वर्षांपूर्वी मठाची राजकीय अशी कोणती प्रतिमा नव्हती. अलीकडच्या काळात मठामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, हिंदुत्ववादी संघटनाच्या प्रतिनिधींचा ठळकपणे वावर वाढला आहे. कणेरी मठ म्हणजे कोल्हापूरची रेशीमबाग असे वर्णन टीकाकार करताना दिसतात. काडसिद्धेश्वर स्वामी हे भाजपचे लोकसभेचे भावी उमेदवार असल्याचे म्हटले जाते. त्याचा स्वामींनी इन्कार केला असला तरीही चर्चा थांबताना दिसत नाही.

महाराज भाजपात जाणार?
या जन्मात तरी मी राजकारणात जाणं शक्य नाही अशा स्पष्ट शब्दात कणेरी येथील सिद्धगीर मठाचे स्वामी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी आपल्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला आहे.

एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. गेले वर्षभर काडसिद्धेश्वर स्वामी हे भाजपच्यावतीने लोकसभेचे उमेदवार असतील, ते राज्यसभेवर जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी भव्य असा ‘सुमंगल’ महोत्सव आयोजित केल्यानंतर तर महाराज भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला ऊत आला. त्यांची भाजपशी वाढती जवळीक आणि हे सगळे निवडणुकीसाठीच सुरू असल्याची चर्चा जनमाणसांत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांनीच आता आपण या जन्मी तरी राजकारणात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले, “या महोत्सवाच्या पहिल्याच बैठकीत मी हे स्पष्ट केले की, महाराज हा महोत्सव घेत आहेत म्हणजे काही तरी आहे अशी चर्चा आता बाहेर सुरू होणार. परंतु तसे काहीही नाही असे मी त्याचवेळी स्पष्ट केले होते. मी संन्यासी आहे आणि संन्यासत्व हे जगात श्रेष्ठ मानतो. त्यामुळे आतापर्यंत मला अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊ केली, राज्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मी सर्वांना नम्रपणे नकार दिला. कारण मी एकीकडे सर्वसंगपरित्याग करून आलो असताना पुन्हा मी या सगळ्यामध्ये अडकणे योग्य नाही असे मी मानतो.”

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका