ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका
तर देशात दिवसाला सापडतील 14 लाख रुग्ण; केंद्र सरकारचा नागरिकांना इशारा
थिंक टँक न्यूज नेटवर्क/ नाना हालंगडे न्यूज
सरकारने नागरिकांना कोरोनाचा (Coronavirus) नवीन प्रकार ओमिक्रॉनबद्दल सावध करत सांगितले की, ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका. जरी याची लागण झालेल्यांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असली तरी तो झपाट्याने लोकांमध्ये पसरत आहे.
सरकारने जगात आफ्रिका आणि युरोप तसेच ब्रिटनसारख्या देशांचा दाखला देत भारतातील नागरिकांना सावध केले आहे. होईल तितकी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या देशांमध्ये जिथे कोरोनाचे नवीन रुग्ण विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत, तिथे असेच चालू राहिले तर अजून काही दिवसांत आवश्यक ते निर्बंध लादण्याचीही शक्यता आहे.
कोरोना टास्क फोर्सचे डॉ. पॉल म्हणाले की, ब्रिटनच्या लोकसंख्येनुसार दररोज येणाऱ्या केसेसची भारताच्या लोकसंख्येशी तुलना केली, तर भारतात दररोज 88 हजार ते 14 लाखांपेक्षा जास्त असू शकते. दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील संक्रमितांची संख्या दररोज 4 लाखांच्या पुढे गेली होती. ते म्हणाले की, सध्या ब्रिटन आणि इतर देशांमध्ये नवीन संसर्ग सौम्य स्वरूपाचे आहेत आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही दबाव नाही.
कर्नाटकात पहिल्या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनंतर, देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉन प्रकरणांची संख्या एकूण 113 वर गेली आहे. यामध्ये शुक्रवारी महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या आठ, केरळ आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन प्रकरणांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या 40 आणि दिल्लीत 22 झाली आहे.
भारतातील वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ओमिक्रॉनबाबत इशारा देताना सांगितले की, प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर भार वाढणे स्वाभाविक आहे.
देशातील 24 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 5 टक्क्यांहून अधिक आहे, अशी चिंता व्यक्त करत चाचण्यांचं प्रमाण वाढवून ती लवकरात लवकर 5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यावर भर दिला जाणार आहे. यासह, ओमिक्रॉन प्रकाराने संक्रमित झालेल्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे, असे सांगण्यात आले.