एसटीचा संचित तोटा ८ हजार २० कोटी रुपये

१३ दिवसाच्या संपाने पुन्हा तोट्यात वाढ

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
एसटीची आर्थिक कागदपत्रे पहा. जमेची बाजू ९६६५१.४ कोटी तर खर्चाची बाजू १०४६७१.७ कोटी आहे. अर्थातच तोटा आहे आणि तो ८०२०.३ कोटी आहे. झाले तर मग एस टी तोट्यात आहे. परंतु तोट्यात जाताना खर्चाच्या बाजू काय काय आहे ते निट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की प्रवाशी कर, टोल, डिझेल व घसारा या शिर्षकाखाली किती पैसे आहेत.

प्रवाशी कर ११५२४.८ कोटी आहे, टोल १५४१.७ कोटी आहे आणि घसारा ३३१५.१ कोटी आहे. हे तिन्ही आकडे एकत्रित घेतले तर सुमारे १६३८१.५ कोटी होतात.
आता हे आकडे वेगळे का घेतले? तर घसारा हा काय कुणाला प्रत्यक्ष द्यायला लागत नसतो. समजा एका गाडीची पहिल्या दिवसाची किंमत अमूक रुपये आहे. तर तिचे आयुष्य ठरलेले असते आणि त्यानुसार घसारा दरवर्षी खर्चाच्या बाजूला येत राहतो. म्हणजे प्रत्यक्षात पैसे कुणाला द्यायला लागत नाहीत. मात्र मालमत्ता त्या प्रमाणात कमी होत जाते. शिवाय एखाद्या वस्तूचे आयुष्य संपले किंवा मालमत्तेत तिची किंमत शून्य झाली तरी वस्तू वापरात असू शकते. उदा.फर्निचर, इलेक्ट्राॅनिक वस्तू

आता आपण टोल कडे येऊया
मूळात रस्ते इथल्या सामान्य माणसाच्या वतीने सरकारच्या मालकीचे आहेत. म्हणजे खरे तर सामान्य माणसाची मालकी रस्त्यांवर आहे. सरकारने आपले नाकर्तेपण लपवण्यासाठी रस्ते बिल्डरांना दिले. हे जे बिल्डर आहेत, ते कोणी साधू महात्मे नाहीत बरं का. ते व्यावसायिक आहेत. त्यांनी पैसा कमवण्यासाठीच ही कंत्राटे घेतली आहेत. रस्ते बनवून दिले आणि टोल वसुलीचे हक्क मिळवले. त्यांनी लावलेल्या पैशाच्या कितीतरी पट पैसा टोलमधून वसूल होतो. तो त्यांच्या हुशारीचा, अकलेचा, धाडसाचा आणि व्यवसायाचा तगादा आहे. परंतू रस्ता सरकारचा आहे. सरकार सामान्य माणसाचे आहे. व्यावसायिकाने आपल्या आर्थिक फायद्यासाठी सरकारकडे करार करून काम मिळवले आहे. तर मूळ मालकाकडून टोलची वसुली का केली जाते ? “तू असशील मुळ मालक. रस्ता तुझाच आहे. परंतू मला टोल दिल्याशिवाय तू रस्त्यावर येऊ शकणार नाहीस. ही तर चक्क धमकी झाली. माझीच मोरी परंतू मलाच मुतायला चोरी.

एसटी नावाच्या सरकारी सेवेला टोलच्या जिझीयातून मुक्ती मिळालीच पाहिजे.
आमदार, खासदार, मंत्री वगैरे लोकांना टोलमुक्ती कशासाठी ?
एस.टी.चा प्रवास टोलमुक्त व्हायला हवा. त्यामुळे एसटीचे हजारो कोटी रुपये वाचतील. त्यातूनही कर्मचा-यांना द्यायला काही पैसे उपलब्ध होतील.

एसटीकडे अवाढव्य जमीन आहे. तिथे काॅम्प्लेक्स वगैरे उभारता येऊ शकतात. तालुक्याच्या ठिकाणी बरीच सरकारी कार्यालये खाजगी जागेत आहेत. एसटीच्या स्थानकाचे नियोजनबद्ध बांधकाम झाले,तर ही कार्यालये त्या जागेत स्थलांतरीत करता येतील. स्टॅन्डवर उतरुन पुन्हा दुस-या ठिकाणी जायला नको. शिवाय सरकारी खात्यांची बिले निटपणे येत राहतील किंवा ॲडजस्ट होत राहतील. त्यातूनही तोटा कमी होत जाईल.

महाराष्ट्र सरकारच्या एकूण बत्तीस महामंडळांपैकी एकतीस महामंडळे वेतन आयोगाप्रमाणे वेतन घेतात. सर्वांत श्रीमंत असलेल्या सिडको महामंडळाला काही श्रीमंत आहे, म्हणून वेतन आयोगापेक्षा जास्त पगार नाहीत मग सतत सेवेत असणा-या एकट्या एसटी महामंडळालाच वेतन आयोगाच्या कक्षेत का आणायचे नाही ? त्यांनी सामान्य माणसाला दिलेल्या व नेहमी देत आलेल्या सेवेचा विचार करा आणि त्यांना वेतन आयोगाच्या कक्षेत आणा.

सामान्य माणूस अजूनही एसटी कर्मचा-यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेला दिसत नाही. त्याने एसटी बंद पडल्यानंतर काय होईल, याची कल्पना करून पाहावी. एसटी नसेल तर प्रवास आपल्या आवाक्यात राहणारच नाही. आजचा पाचशेचा प्रवास एसटी नसेल तेंव्हा दोन हजाराचा होईल. एसटीच्या स्टॅन्डवर किमान सावली असते. ऊन पाऊस यांच्यापासून संरक्षण असते. खाजगी गाडीसाठी तुम्ही किती वेळ उघड्यावर थांबणार? समजा एखादी गाडी मुंबईला जाते आहे. तर आपण मधल्या स्थानकांवर एसटीने सहज जाऊ शकतो. परंतू खाजगी बस गाडीने नाही.कारण एसटी सेवा आहे,ती नेईल परंतू खाजगी व्यवसाय आहे, त्याला अधिक भाडे देणारा हवाय. आपल्यामध्ये आता कुठे ग्रामीण भागातल्या शिक्षणाला वेग आलाय. त्याच्या पाठीमागेही एसटीच आहे. उद्या सवलतीचे पास बंद झाले, तर अर्धी मुले काॅलेज सोडतील हे परवडणार आहे का आपल्याला? हे परवडणार आहे का महाराष्ट्राला? मानापमान, पैशाची सहज न होणारी उपलब्धता, युनियनच्या अविवेकी मागण्या आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची घाणेरडी वृत्ती या सर्वांना टाळून एसटी वाचली पाहिजे.एस टी चा कामगार वाचलाच पाहिजे.

पैसे सहज उपलब्ध होत नाही. आणि होणारही नाही. मोजक्या उद्योगपतींना नऊ लाख करोड की काय ते एनपीए करून माफ करणारे लोक याच देशात राहतात. हाच देश चालवतात. तोच देश, त्याच देशाच्या बॅंका एवढी जमीन बाळगणा-या एसटीला कर्ज का देऊ शकत नाहीत? का एसटी पण विकायची आहे काय?

प्रत्येक गावातून पुढाऱ्यांच्या खाजगी बसेस धावताहेत पण हे नुकसनीतील मार्गावर बसेस चालवणार नाहीत. तेथे मात्र एसटी हवी सरकार जेष्ठ नागरिकांना, विद्यार्थी,पत्रकार, आमदार,खासदार यांना बसच्या भाड्यात सवलत देते. हा भार एस टी वरच का आहे.खाजगी बसेसला हे लागू होत नाही का ?
(माहिती संकलन इंटरनेट)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका