एल. आर. बाली : आंबेडकरी भाष्यकार

मिलिंद मानकर (नागपूर) यांचा विशेष लेख

Spread the love

भारताचे प्रसिद्ध लेखक, विचारवंत, झुंजार पत्रकार, अंतर्बाह्य निखळ आंबेडकरवादी व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे एल. आर. बाली. ‘भीमपत्रिका’च्या माध्यमातून ते आंबेडकरी विचारांचा जागर देश-विदेशात पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य गेल्या पन्नास वर्षांपासून करीत आहेत. आज २० जुलै रोजी बाली हे वयाच्या ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्ताने हा विशेष लेख..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला ज्यांनी संपूर्ण आयुष्य तन – मन – धनाने समर्पित केले त्यात भारताचे प्रसिद्ध लेखक, विचारवंत, विद्वत्ताप्रचुर प्रभावी वक्ता, लढवय्या आंबेडकरी अलख ‘भीमपत्रिका’कार एल.आर. बाली यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. बाली यांचा जन्म पंजाब प्रांताच्या नवाशहर दोआबा (आताचे शहीद भगत सिंह नगर) या ठिकाणी २० जुलै १९३० रोजी झाला. बाबासाहेबांच्या प्रेरणेने ते आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित झाले. यासाठी त्यांनी १९५६ साली सरकारी नोकरीचा (क्लास – वन ऑफिसर) राजीनामा दिला. यामुळे त्यांचे नातलग त्यांच्यावर फार नाराज झाले होते. पण बालींनी त्याची पर्वा न करता आपले कार्य मोठ्या जिद्दीने सुरू ठेवले.
मजबूत बांधा, भव्य कपाळ, सतेज मुखमंडळावरील मिश्किलपणा, प्रेमळपणा, निगर्वी, मृदुभाषी, खंबीर नेतृत्व, विलक्षण बुद्धिमत्ता, पराकोटीची आकलनक्षमता, अभ्यासूवृत्ती आणि कर्तव्यपरायणता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तेजस्वी पैलू आहेत.

 

बाली यांची जन्मभूमी पंजाब असली तरी त्यांची खरी कर्मभूमी नागपूर शहर राहिले आहे. नागपूरला त्यांनी अनेकदा भेटी दिल्या. याच नागनगरी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे मित्र मिळाले. अनेक सभा – संमेलनाला त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. अंबाझरी गार्डनमध्ये भरलेल्या अ.भा. बौद्धधम्म शिखर संमेलनात (६ ते १० डिसेंबर १९७५) त्यांचा सहभाग होता. विशेष सांगण्याजोगी बाब म्हणजे त्यांच्या प्रगल्भ भारदस्त लेखणीतून उतरलेले ‘डा. अम्बेडकर जीवन और मिशन ‘ या चरित्राचे प्रकाशन नागपुरातून झाले. कृष्णा विश्वनाथ पाटील, रा. रामबाग यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा ग्रंथ आंबेडकरी जनतेसमोर १९७४ साली आणला. ही नागपूरकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे.

‘डा. अम्बेडकर जीवन और मिशन ‘ या ग्रंथाचे लेखनकार्य बाली यांनी तुरुंगात केले. ते म्हणतात “ विद्रोहाचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रामाणिक आणि उपयोगी जीवनगाथा राष्ट्रभाषा हिंदीत उपलब्ध नाही ही गोष्ट मला नेहमी बेचैन करीत असे. १९६४-६५ साली रिपब्लिकन पार्टीच्या अ.भा. मोर्चात मला अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले. त्यावेळी मला बाबासाहेबांची जीवनगाथा लिहिण्याची संधी अन् प्रेरणा मिळाली.”

बाबासाहेबांची जीवनगाथा लिहिण्यासाठी बाली यांनी देश – विदेशातून माहिती गोळा केली. बाबासाहेबांचे साहित्य गोळा करण्यासाठी त्यांनी भारतातील जवळपास सर्वच प्रांत पालथे घातले. अनेक व्यक्तींची भेट घेतली आणि अनेक वाचनालयात अभ्यास केला. बाबासाहेबांनी लिहिलेल्या अनेक प्रकाशित – अप्रकाशित ग्रंथांचे वाचन केले. त्यांची भाषणे गोळा करण्यासाठी कठोर संघर्ष केला, कालांतराने बाली यांच्या जीवनाचे ते एकमेव ध्येय बनले. बाली साहेब शिस्तप्रिय, अंतर्बाह्य निखळ आंबेडकरवादी व्यक्तिमत्त्वाचे धाडसी पत्रकार आहेत. त्यांनी ‘ भीमपत्रिका’च्या माध्यमातून देश – विदेशात आंबेडकरी विचारांचा जागर पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य केले.

गत ५० वर्षापासून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनच्या प्रसार अन् प्रचाराचा महान कार्याला संपूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणाने आपल्या खांद्यावर धुरा वाहिली. हिंदी भाषेव्यतिरिक्त त्यांची इंग्रजी आणि पंजाबी भाषेत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांव्यतिरिक्त त्यांची ‘डा , आम्बेडकर ने क्या किया ?’, ‘गांधी और आम्बेडकर’, ‘पूना पैक्ट’, ‘वाल्मीकि जयंति और भंगी जाति’, ‘भगवान बुद्ध की कल्याणकारी शिक्षाएं’,  ‘बुद्ध और उनके धर्म का भविष्य’, ‘आंबेडकर इज्म’सह अनेक पुस्तकांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. अलीकडेच त्यांचे ‘आंबेडकरी होने का अर्थ’ नावाने आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यांच्या काही पुस्तकांवर गदा आली. परंतु त्यांनी त्याची पर्वा न करता आपले विचार सडेतोड जगासमोर खंबीरपणे मांडले.

बाली यांचे आज शरीर थकले असले तरी मन मात्र आंबेडकरी विचारात एकजीव झाले आहे. आंबेडकर विचार नसानसात भिनले आहेत. त्यांच्या अतुलनीय समाजप्रबोधनामुळे संपूर्ण दलित, शोषित, वंचित बहुजन समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात तीळमात्र शंका नाही. त्यांना आंबेडकरी चळवळीचा योद्धा समजले जाते. त्यांच्या कार्यात पत्नी आणि मुलांचेही योगदान आहे. बाली यांनी काश्मीर ते केरळपर्यंत अनेक दौरे करून हजारो सभांना मार्गदर्शन केले. युवा वर्गात लेखक आणि मिशनरी तयार केले. त्यांच्याच प्रेरणेने देश – विदेशात अनेक बुद्धविहार आणि आंबेडकर भवनाची निर्मिती करण्यात आली. ज्यात जालंधर पंजाबचे भव्यदिव्य ‘आंबेडकर भवन’ त्यांच्या स्थायी आठवणीच्या रूपात डौलाने उभे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचे ते एक चालते – बोलते स्मारकच म्हणावे लागेल.

‘डाक्टर भीमराव अम्बेडकर, जिन्हे बाबासाहेब के नाम से पुकारा जाता है, मेरे एक मात्र शास्ता और मार्गदर्शक हैं’ असे ओजस्वी गौरवोद्गार काढणारे आदरणीय एल आर बाली आज दि. २० जुलैला वयाच्या ९१ वर्षात पदार्पण करीत आहेत. विद्यमान आत्मकेंद्रित स्पर्धेत आंबेडकर चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी बाली सारखे समर्पित, निष्ठावान अनुयायांची नितांत गरज आहे. सुदृढ आरोग्य, निरामय जीवनासाठी मंगलकामना!

– मिलिंद मानकर, नागपूर
(मो. 8080335096)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका