एकनाथ गायकवाडांनी केला होता माजी मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव

निधनाने धारावी झोपडपट्टी हळहळली

Spread the love

काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावान नेते एकनाथ गायकवाडांच्या निधनानं काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसलाय. एकनाथ गायकवाड यांनी परिस्थितीशी संघर्ष करीत राजकीय पटलावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींसारख्या दिग्गज नेत्याचा गायकवाडांनी दारुण पराभव केला होता. तेव्हापासून गायकवाडांची देशपातळीवर दखल घेण्यात आली.

• धारावी झोपडपट्टी इलाख्याचे मसिहा
एकनाथ गायकवाड यांचा जन्म १ जानेवारी १९४० रोजी साताऱ्यात झाला होता. मुंबईतील धारावी झोपडपट्टी इलाख्यातून त्यांनी आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली. अडलेल्या-नडलेल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडू लागले. त्यांचा जनाधार वाढू लागला. झोपडपट्टी इलाख्याचे ते मसिहा बनले. मुंबईसारख्या त्यातही स्लम एरियात स्वत:चं राजकीय अस्तित्व निर्माण करणं तेवढं सोपं नव्हतं. तिथंल्या गुंड, दादा लोकांना ते पुरून उरले. समाजाची सेवा अविरतपणे करीत राहिले. धारावी झोपडपट्टीतील प्रत्येकाला ते नावानिशी ओळखत असत.

• राजकारणातील गरुडझेप
काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं. गायकवाड यांनी दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून विजय संपादन केला होता. दक्षिण-मध्य मुंबईतून दोनवेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी २०१४ मध्ये त्यांचा पराभव केला होता. गायकवाड हे शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये सक्रिय होते.

• आंबेडकरी विचारांचा होता प्रभाव
एकनाथ गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना प्रमाण मानून राजकारण केले. ते काँग्रेसमध्ये असले तरी आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक, धम्मकार्यात ते हिरिरीने सहभागी होतं.

• माजी मुख्यमंत्र्यांचा केला होता दारुण पराभव
धारावी हा एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला समजला जातो. ते धारावीमधून ३ वेळा विधानसभेवर निवडून गेले. याच मतदारसंघात २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा पराभव केल्यानं काँग्रेस पक्षात त्यांचं स्थानही वाढलं. २००९ मध्ये काँग्रेस पक्षाने पुन्हा त्यांना संधी दिली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे सुरेश गंभीर यांचा ७५ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर गायकवाड हे काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. मनोहर जोशींचा पराभव केल्याने गायकवाड यांच्या राजकीय करिअरचा ग्राफ वाढला.

• दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरही वर्चस्व
लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर प्रत्येक राजकीय पक्षाचे लक्ष असते. हा मतदारसंघ अटीतटीची निवडणूक घडवणारा असतो. दोन-तीन निवडणुकांचा अपवाद सोडला तर, दक्षिण-मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. या मतदारसंघातील जवळपास ६० ते ७० टक्के भाग हा झोपडपट्ट्यांनी, मध्यमवर्गीय आणि कामगार वसाहतींनी व्यापलेला आहे. काही ठिकाणी तुरळक उच्चभ्रू वस्ती आहे. या समीकरणानेच हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने राहिला. याच मतदारसंघातून २००४ व २००९ असे दोन वेळा विजयश्री खेचून एकनाथ गायकवाड हे लोकसभेत पोहोचले.

• ना. वर्षा गायकवाडांनी सांभाळला राजकीय वारसा
एकनाथ गायकवाड यांची कन्या व विद्यमान शालेेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वडिलांच्या हयातीतच राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. जनतेने वडिलांना जेवढा जनाधार दिला तेवढाच जनाधार हा वर्षा गायकवाडांना मिळत गेला. एकनाथ गायकवाड यांचे राज्यभरात चाहते आहेत. त्यांच्या निधनाने त्यांचे कार्यकर्ते, चाहते, आंबेडकरी समूहावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियातून त्यांच्या आठवणी जागविण्यात आल्या.

टीम थिंक टँक लाईव्ह

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका