‘ऋषितुल्य प्रज्ञावंत’ केळुसकर गुरुजी
'बुद्धचरित्र'कार केळूसकर गुरुजी जयंती निमित्त मिलिंद मानकरांचा विशेष लेख
कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावी केळूसकर गुरुर्जीचा २० ऑगस्ट १८६० रोजी जन्म झाला. कालांतराने शिक्षणासाठी ते मुंबईला आले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या केळूसकरांना उच्च शिक्षण घेण्याची उत्कट मनोकामना होती. मात्र घरच्या गरिबीमुळे त्यांना शिक्षणाचा त्याग करून नोकरी पत्करावी लागली. सुरुवातीला डोंगरी भागातील इस्त्रायली शाळेत तदनंतर विल्सन हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापन केले. १८९४ साली गुरुजींचे निकटवर्ती लक्ष्मण पांडुरंग नागवेकर यांनी ‘अध्यात्मिक ज्ञानरत्नावली’ हे मासिक सुरू केले. त्याचे संपादक गुरुजी होते. या मासिकातून गुरुजींनी बरेचसे उद्बोधक लेखनकार्य सातत्याने केले. चरित्रलेखनासोबत त्यांनी ‘जगतवृत्त’, ‘दीनबंधू’, ‘इस्त्रायली पाक्षिक’ यांसारख्या नियतकालिकांतून विविधांगी विषयावर लिखाण केले. त्यामुळे त्यांची ‘विवेकवादी वक्ते’ म्हणून ख्याती पसरली होती.
१८९५ साली त्यांनी ठाणे वक्तृत्वोत्तेजक सभेच्या पंधराव्या समारंभात ‘सामाजिक सुधारणा” या विषयावर निबंध वाचला. लेखमालिकेसोबतच गुरुजींनी संत तुकाराम महाराजांवर चरित्रपर लेख लिहिले. ही लेखमालिका १८९६ साली ‘तुकारामबाबांचे चरित्र’ या शीर्षकाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. तुकाराम महाराजांवरील गुरुजींचा हा मराठी भाषेतील पहिला विस्तृत चरित्रग्रंथ ठरला. तुकाराम महाराजांच्या चरित्रग्रंथांसोबतच केळूसकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेही पहिले समग्र चरित्र ‘क्षत्रियकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाने १९०७ साली प्रसिद्ध केले. अशा या प्रतिभावंताचे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी सुरुवातीपासूनच अतूट गुरू शिष्याचे ऋणानुबंध जुळले. या दोघा गुरु-शिष्यांची भेट मुंबईत चर्नी रोडवरील उद्यानात झाली.
बाल भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना घरातील जागेच्या अडचणीमुळे सार्वजनिक उद्यानात अभ्यास करण्यासाठी जात असे. एकेदिवशी भीमराव अभ्यासात होते. त्यांचे भीमरावांकडे आकर्षित झाले. दोघांत मित्रत्वाचे मधुर संबंध निर्माण झाले. १९०७ साली भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांच्या सत्काराच्या सभेत केळूसकर गुरुजींनी गुणगौरवपर भाषण करून त्यांना प्रोत्साहन दिले आणि स्वतः १८९८ साली लिहिलेले भारदस्त ‘बुद्धचरित्र’ भीमरावाला भेट दिले. भीमरावाच्या पाठीवर मायेच्या ओलाव्याचा हात ठेवून आशीर्वाद दिला. हेच ‘बुद्धचरित्र’ पुढे भीमरावांचे प्रेरणास्त्रोत ठरले.
भीमरावाने महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे म्हणून केळूसकर गुरुजींनी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडे शिफारस केली आणि भीमरावाला दरमहा पंचवीस रुपयांची शिष्यवृत्ती द्यावयास लावली. भीमरावाने अमेरिका – इंग्लंड देशात उच्च शिक्षण घेऊन आपल्या गुरुवर्याच्या परिश्रमाचे चीज केले. बाबासाहेबांच्या विद्यार्थीदशेतला अडचणीचा जीवनक्रम, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील केवळ अस्पृश्य म्हणून कटू अनुभव, जे खडतर जीवन त्यांच्या वाट्याला आले त्याचे मार्मिक, हृदयस्पर्शी दर्शन केळूसकरांनी भारतीय समाजासमोर ८८ वर्षापूर्वी ‘भिमराव रामजी आंबेडकर’ या शीर्षकाखालील लेखात चितारले. हा लेख ‘प्रबुद्ध भारता’च्या १४ एप्रिल १९६२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
बाबासाहेब तसे कोकणातील आंबडवे ( ता . मंडणगड ) गावचे. कोकणाशी त्याचं घनिष्ठ ऋणानुबंध आहे. सिंधुदुर्गही याला अपवाद नाही. विद्यार्थीदशेत वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावच्या केळूसकर गुरुजींनी भीमरावाला बुद्धांचे चरित्र भेट म्हणून दिले होते. याचेही आंबेडकरांवर फार मोठे संस्कार झाले. पडवे – माजगाव ( ता. सावंतवाडी ) येथील एका गरीब दलिताचा खटला लढविण्यासाठी बाबासाहेब आले होते. त्यांची ही भेट जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरली. त्यांचा पावन पदस्पर्श सिंधुदुर्ग, सावंतवाडी आणि मालवणला झाला. दुर्दैवाने मात्र ते केळूसकर गुरुजींच्या ‘केळूस’ या जन्मगावाला भेट देऊ शकले नाही. केळूसकर गुरुजींनी आत्मचरित्रही लिहिले आहे. प्रसिद्ध चरित्रकार, विचारवंत धनंजय कीर यांनी लिहिलेल्या केळूसकरांच्या चरित्रात ते वाचायला मिळते, कीर यांनी केळूसकरांचे वर्णन ‘ऋषितुल्य प्रज्ञावंत’ असे केले आहे. केळूसकरांची सर्जनशील लेखणी व कार्य पाहता ते यथार्थ आहे. असा हा प्रज्ञावंत लेखक १४ ऑक्टोबर १९३४ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.
– मिलिंद मानकर,
मणी ले आऊट , गोपालनगर , नागपूर मो. 8080335096