उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं.. म्हणून त्यांना सत्तेतून खाली खेचलं
माजी राज्यपाल कोश्यारींचा धक्कादायक खुलासा
नाना हालंगडेे : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल, विशेषतः उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं.. माझा अपमान केला.. म्हणून ईश्वराने त्यांना सत्तेतून खाली उतरवलं..” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर आगपाखड केली आहे. ठाकरे हे खूपच शांत स्वभावाचे आहेत. ते मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते, त्यानं घोड्यावर बसविण्यात आले होते, असे कोश्यारी म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल, विशेषतः उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी मराठी, हिंदी तसेच इंग्रजी माध्यमांच्या पत्रकारांना मुलाखती दिल्या. त्यावेळी त्यांनी हे खुलासे केले आहेत.
विविध प्रश्नांना उत्तरे देताना महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, “राज्यपाल (Governor) नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते पाच पानी पत्र पाठवलं नसतं, तर मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशींवर सही करणार होतो.”
“विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीची शिष्टमंडळं माझ्याकडे यायची. मी त्यांना एकदा सांगितले की, हे पहिले पाच पानी पत्र बघा. पाच पानी पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. हा कायदा, तो कायदा म्हणत धमकावत आहात.”
“पत्रात शेवटी लिहिलं होतं की, पुढील १५ दिवसांत मंजूर करा. कुठं लिहिलं आहे की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतात की हे एवढ्या दिवसांत मंजूर करा म्हणून. हे कुठं लिहिलंय संविधानात. ते पत्र पाठवलं नसतं, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी १२ आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशींवर सही करणार होतो.”
“उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगलेच होते. पण त्यांचे सल्लागार कोण होते? शिवसेनेचे आमदार माझ्याकडे येऊन आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे हे शकुनीमामांच्या चक्रव्यूहमध्ये अडकले आहेत, असे सांगायचे. माहिती नाही की, त्यांना कोणते शकुनीमामा मिळाले होते.”
“उद्धव ठाकरे यांचे लोकच माझ्याकडे येऊन बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण होते, मला माहिती नाही. उद्धव ठाकरे तर सज्जन माणूस आहेत, बिचारे राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. ते कसे अडकले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का. पंधरा दिवसांत मंजूर करा, असं पत्र लिहिलं म्हणून मी बोललो. माणूस सज्जन नसता, राजकारणी नसता. राजकारणातील शरद पवार यांच्यासारख्या ट्रिक माहिती असत्या तर असे पत्र लिहिलं असतं का. चार ओळीचं पत्र लिहून पाठवलं असतं, तर मला सही करावीच लागली असती.”
मोदींची कामे सुसाट
यावेळी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. मोदी यांचे काम सुसाट असते. ते पंतप्रधान आहेत हे देशाचे भाग्य आहे, असा गौरव केला.
मला विमानातून खाली खेचलं
एका प्रश्नाला उत्तर देताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा वापर करून मला विमानात बसू दिले नाही. मला नाईलाजास्तव विमानातून खाली उतरावे लागले. हा या पदाचा अपमान होता. मात्र, अशा पापांची फेड करावीच लागते. त्यांना ईश्वराने मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आहे.
महाराष्ट्र ही संतांची, देवांची भूमी आहे. या भूमीत तीन वर्षे, चार महिने मला राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, असे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.