इरफान खान : अजरामर हिरो
स्मृतीदिनानिमित्त आठवणी जागवणारा विशेष लेख
• घरचा विरोध पत्करून अभिनयात
इरफान खान यांचं मूळ नाव इरफान उर्फ साहबजादे अली खान असं होतं. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९६७ रोजी जयपूर (राजस्थान) इथं झाला. खरं तर इरफान खान यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा त्यांना चित्रपटात काम करण्यास विरोध होता. आपल्या मुलानं शिकून कुठंतरी नोकरी पत्करावी, असा त्यांचा कयास होता. असं असलं तरी इरफान खान यांची अभिनय क्षेत्राकडं ओढ होती. आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होताच त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या नामांकित संस्थेत प्रवेश घेतला. तिथंच त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. या संस्थेत अभिनयाचे धडे घेत असतानाच सुतपा सिकदर यांच्याशी झालेल्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं आणि पुढे त्या दोघांचं लग्नही झालं.
• इरफान होते अजातशत्रू
खरं तर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत जिवघेणी स्पर्धा आहे. एकमेकांबद्दल फारसं चांगलं बोलणारी मंडळी तिथं कमी आहेत. अशाही वातावरणात इरफान खान यांनी चित्रपट क्षेत्रातील कुणाही व्यक्तीबद्दल वाईट कमेंट केली नाही. त्यांचे असंख्य मित्र चित्रपट क्षेत्रात होते. आपले मित्र किंवा इतरांबद्दल वाईट न बोलणारा हा अजातशत्रू अभिनेता होता. इरफान खान यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सरकारतर्फे गौरवण्यात आले होते.
• मृत्यूनंतर काय होते हे जाणून घ्यायचे होते?
इरफान खान यांना दुर्धर आजार जडल्यानंतरही त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. मृत्यूपूर्वीचे काही महिने त्यांनी आपल्या पत्नी व मुलासमवेत आनंदात व्यतीत केले. दै. दिव्य मराठी वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पत्नी सुतपा सिकदर म्हणतात की, “शेवटच्या क्षणी इरफानची मृत्यूशी एक वेगळीच अटॅचमेंट झाली होती. मरणानंतर काय होते हे त्यांना जाणून घ्यायचे होते? माझे पती मला सोडून गेले किंवा जगातून निघून गेले याबद्दल मला वाईट वाटत नाही. तर ते आमच्यात खूप गुंतून गेले होते याचे मला दु:ख वाटते. माझ्या मुलांचा तो खरा आणि खूप शहाणा मित्र होता. शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही लंडनमध्ये खूप सारी नाटकं, चित्रपट पाहिले. त्यांना बरीच उत्तरे शोधायची होती. मात्र ती अपुरी राहिली.”
• मुलाला म्हणाले ‘मी मरणार आहे’
इरफान खान यांचा मुलगा बाबिलने इरफान हे रुग्णालयात उपचार घेत असताना वडिलांनी कोणती गोष्ट सांगितली याचा खुलासा केला आहे. याबाबतचे वृत्त दै. लोकसत्ताने ‘फिल्म कम्पॅनियन’च्या हवाल्यानं दिलंय. ‘फिल्म कम्पॅनियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, बाबिल म्हणाला की, “त्यांचे निधन होण्याच्या दोन-तीन दिवस आधीपासून मी रुग्णालयात होतो. त्यांना काहीच कळत नव्हतं आणि त्यांनी सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगितली..त्यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं, हसले आणि म्हणाले..’मी मरणार आहे’ आणि मी त्यांना म्हणालो नाही ‘तुम्ही मरणार नाही’. त्यानंतर ते पुन्हा हसले आणि झोपले.”
• इरफान खानचे प्रमुख हिंदी/इंग्रजी चित्रपट
ॲसिड फॅक्टरी (इंग्रजी), एक डॉक्टर की मौत, ज्युरासिक वर्ल्ड (इंग्रजी), द अमेझिंग स्पायडरमॅन (इंग्रजी), द वॉंरियर (इंग्रजी), नेमसेक (इंग्रजी), पानसिंग तोमर, मकबूल, रोग, रोड टु लडाख (लघुपट), लाईफ ऑफ पाय (इंग्रजी), लाईफ इन मेट्रो (इंग्रजी), सच अ लॉंग जर्नी (इंग्रजी), सलाम बॉंबे, स्लमडॉग मिलेनियर (इंग्रजी), हासिल, मदारी.
• दूरचित्रवाणी मालिका
चंद्रकांता, चाणक्य, डर, भारत एक खोज, द ग्रेट मराठा (रोहिला सरदार नजीब-उद-दौलाच्या भूमिकेत)
• मिळालेले मानाचे पुरस्कार
पद्मश्री – २०११, फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार – २००३ (हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी), फिल्मफेअर सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता पुरस्कार – २००७ (लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी), राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता- २०१२ पानसिंग तोमर चित्रपटाकरिता.
अशा या गुणी अभिनेत्यास थिंक टँक लाईव्हतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
(टीम थिंक टँक लाईव्ह)