थिंक टँक : नाना हालंगडे
ऐतिहासिक दस्तावेजांनुसार, जगातील पहिली सीरियल किलर पुरुष नव्हे तर एक स्त्री होती. ती अत्यंत सुंदर होती…पण ती एक विषकन्या होती. तिने रोमन सम्राटाच्या इशाऱ्यानुसार राजपरिवारातील अनेक सदस्यांसह जवळपास 100 जणांची निर्घृण हत्या केली.
54 मध्ये रोममध्ये सम्राट नीरोची राजवट सुरू झाली होती. इतिहासात नीरो त्याचे क्रौर्य व पाशवीपणासाठी ओळखला जातो. नीरो वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सम्राट झाला होता. त्याचे साम्राज्य ब्रिटनपासून सीरियापर्यंत पसरले होते. असे मानले जाते की, नीरोची आई अॅग्रिपीना हिनेही क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
तिच्याच अपार प्रयत्नांमुळे नीरो अवघ्या 16 व्या वर्षी सम्राट झाला होता. आता तुम्हाला वाटेल की, आम्ही तुम्हाला नीरोची कथा का सांगत आहोत? तर त्याचे कारण म्हणजे जगातील पहिल्या सीरियल किलरने याच नीरोच्या इशाऱ्यानुसार अनेकांना यमसदनी पाठवले होते.
लुकास्टा नीरोने आपल्या काळात अनेकांची हत्या केली. या कामात त्याला विषकन्या ‘लुकास्टा द गॉल’ने मोलाची साथ दिली. लुकास्टा केवळ नीरो व त्यांच्या मातोश्री ज्यूलिया अॅग्रिपीनाच्या इशाऱ्यावर काम करत होती. तिचे काम रोमच्या वातावरणात विष कालवण्याचे होते. ती अत्यंत विषारी होती. यामुळे आपल्या शत्रूचा काटा काढण्यासाठी नीरो व त्याच्या आईने या विषकन्येचा वापर केला.
लुकास्टा स्वतः तयार करत होती विष
इतिहासात राजघराण्यातील बंडाळ्यांवर नेहमीच खमंग चर्चा रंगते. त्या काळात एकमेकांना मारण्यासाठी विषाचा चपखलपणे वापर केला जात होता. नीरोची आई अॅग्रिपीना हिनेही या विषाच्या जोरावर आपल्या मुलाला सिंहासन मिळवून दिले. याकामी लुकास्टाने तिची सर्वोतपरी मदत केली. ती या विषारी कामात अत्यंत निपुण होती. ती जेवढी सुंदर होती, तेवढीच विषारी होती. असे म्हणतात की, ती असे विष तयार करायची की, त्याचा केवळ वास घेऊन समोरचा माणूस यसमदनी पोहोचत असे. लुकास्टाला विष बनवण्याच्या अनेक पद्धती माहिती होत्या. कुणाला व कसे विष देऊन ठार मारायचे हे या विषारी मुलीला चांगलेच ठावूक होते.
राणी अॅग्रिपीनाच्या सांगण्यावरून लुकास्टाने रोमचा सम्राट क्लॉडियसचाही खून केला होता. नीरोपूर्वी रोमवर सम्राट क्लॉडियसचे राज्य होते. अॅग्रिपीनाने एका सूनियोजित कटाद्वारे स्वतः क्लॉडियसशी लग्न करण्याचा घाट घातला आणि त्यानंतर आपला मुलगा नीरोला सत्ता मिळवून देण्यासाठी सम्राट व त्याच्या मुलाची हत्या केली. असे म्हणतात की, लुकास्टने राजाला विषारी मशरूम देऊन ठार मारले होते.
क्लॉडियसच्या मृत्यूनंतर नीरोने रोमचा ताबा घेतला. पण संपूर्ण राजघराण्याचा त्याला विरोध होता. त्यानंतर लुकास्टाच्या विषाने सर्व काम केले. लुकास्टाने विविध प्रकारचे विष तयार करून राजघराण्यातील तब्बल 100 जणांचा बळी घेतला. ही प्रक्रिया बरीच वर्षे चालली. पण 9 जून 68 रोजी नीरोने आत्महत्या केली आणि त्यानंतर त्याचे सर्वच सहकारी जनतेच्या रोषाला बळी पडले. लुकास्टा देखील त्यापैकी एक होती.