आरक्षण नाही तर मतदान नाही
हटकर समाज महासंघाचे अध्यक्ष भीमराव भुसनर यांनी केले आवाहन
फलटण (विकास बेलदार) : धनगर व तत्सम जमातीतील बांधवांनो हिच योग्य वेळ आहे आपल्या हक्काच्या आरक्षणाबद्दल बोलण्याची, असे मत पैलवान तथा हटकर समाज महासंघ भीमराव भुसनर अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, “हटकर समाज महासंघातर्फे आव्हान करतो, आता शांत बसु नका. झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी योग्य संधी मिळाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी शहरात,गावोगावी बैठका घेतील.
त्यावेळी प्रत्येकांनी पुढे येऊन स्पष्ट बोलायचं आहे. आरक्षण नाही तर मत नाही. आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण सर्वांनी विविध संघटना, राजकीय पक्ष, समाजातील नेते मंडळी च्या माध्यमातून विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे, उपोषणं, चक्काजाम आंदोलने तरीही मायबाप सरकारला जाग आली नाही.
शेजारच्या राज्यात आरक्षणाची अंमलबजावणी होत आहे. मग महाराष्ट्रातच असं का? याला जबाबदार आपल्या राज्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी आहे. राज्य सांगतंय केंद्र सरकारचं हे काम आहे आणि केंद्र सरकार म्हणतंय हे काम राज्य सरकारचं आहे. म्हणजे नेमकं कोणाला नावं ठेवायचे. स्पष्ट जाणवते. हे आपली दिशाभूल करत आहेत. काही हरकत नाही. आपण आता एक विचार पक्का करुया. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी मिळून बहिष्कार टाकुया. काही लोकांना माझं मत पटणार नाही पण आपल्याला हे केल्या शिवायपर्याय नाही. किती दिवस संघर्ष करायचा देश स्वतंत्र होऊन जवळपास 74 वर्ष झाली.
अजून न्याय मिळाला नाही. आपले आयुष्य संघर्ष करण्यातच गेली काही मिळाले नाही. निदान येणाऱ्या पिढीसाठी तरी करुया. आदिवासी समाजाला आरक्षणाचा किती फायदा झाला बघा. शासकीय नोकरीत त्यांचे मुलं आणि आपली मुलं हुशार असुन बेरोजगार झाले. त्यामुळे आपण स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार टाकला ना नेते मंडळी वाटेल ते करतील.
सदर महाराष्ट्रातील समाज बांधवांनी या गोष्टीचा विचार करावा.आप आपल्या भागातील नेते मंडळीना स्पष्ट बोला आम्ही निवडणुकवर बहिष्कार टाकणार आहे. बघा नेते मंडळी कसे समजुत काढण्याचा प्रयत्न करतात. भूलथापांना बळी पडू नका. मी माझ्या भागात कोणत्याही पक्षाचा नेता येवू द्या. स्पष्ट सांगणार आहे. आजपर्यंत तुम्ही आम्हाला का न्याय दिला नाही. जो पर्यंत अंमलबजावणी नाही तोपर्यंत मतदान नाही. तुम्ही पण सुरुवात करा नक्कीच बदल घडल्या शिवाय राहणार नाही.”