आरक्षणाचे ‘आरक्षण’

युवा लेखक प्रतीक आविष्कार यांचा विशेष लेख

Spread the love

तळागाळातील लोकांना समपातळीवर शिक्षण व इतर क्षेत्रातील विकासाची संधी मिळावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली “आरक्षण” ही महत्त्वपूर्ण तरतूद लाखो जणांसाठी सहाय्यभूत ठरत आहे. प्रकाश झा दिग्दर्शित “आरक्षण” हा चित्रपट देशातील आरक्षणाची स्थिती व दृष्टिकोनाबद्दल महत्त्वपूर्ण संदेश देतो. सामाजिक वास्तव उजागर करणा-या “आरक्षण” या चित्रपटाबाबत मांडणी करणारा प्रतीक आविष्कार यांचा हा लेख.

खूप दिवसांपासून ‘आरक्षण’ सिनेमा बघू म्हणत होतो; पण बघणं काही झालं नाही. वर्ष म्हणलं तरी चालेल. इंजिनिअरिंगला असल्यापासून हा सिनेमा बघू म्हणतोय: पण बघणं होत नव्हतं. शेवटी एका महिन्यापूर्वी सिनेमा बघितला. हा सिनेमा जितका स्टोरी, कंटेंटसाठी बघितला तितकाच तो सैफअली खानसाठी देखील बघितला. कारण त्याचा स्वॅग, त्याचा ऑरा इतर नट-नटांपेक्षा खूप वेगळा आहे. सहजच त्याचं जरी नीट निरीक्षण केलं तरी त्याची बोलण्याची स्टाईल, आवाज यावरून त्याचा स्वॅग दिसून येईल. म्हणून स्टायलिश ऍक्टिंग करणारा सैफ या सिनेमातील भूमिकेत कसा उतरतो हे पाहायचं होतं. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे ‘कमर्शिअल सिनेमा विथ सोशल मेसेज’ बनवणे हे प्रकाश झा यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी ते वेळोवेळी दाखवले आहे. राजनीती, सत्याग्रह किंवा आरक्षण या सिनेमांद्वारे त्यांनी वेगळेपण दाखवले आहे.

जर आपल्याला मागासलेल्या वर्गाला सुधरावयाचे असेल, त्यांच्या समाजाची प्रगती करायची असेल तर त्यांना नीट प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे, विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप्स दिल्या पाहिजेत, शिक्षणाच्या सोयी-सुविधा नीट पुरविल्या पाहिजेत, त्यांना स्पर्धेसाठी तयार केले पाहिजे. मग कशाला पाहिजे आरक्षण? हा असा फिल्मचा व्हूव्ह आहे. पण प्रत्यक्षात बेसिक काम नीट झालेलं नसल्यामुळे आज देशाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून देशातील ‘ती’ लोकसंख्या जी केवळ जन्मामुळे मागासलेली आहे त्यांच्यासाठी कमीत कमी एक दरवाजा तरी उघडला पाहिजे. त्यांना जगात टिकण्यासाठी एकतरी संधी दिली पाहिजे म्हणून आज आरक्षणाची गरज आहे आणि ते लागू देखील केले गेलेले आहे.

या फिल्ममध्ये विविध प्रश्न, सामाजिक वास्तवता दाखविली आहे. या फिल्मनुसार, आरक्षण आल्यामुळे शिक्षणाचा बाजार झाला, जनरल कॅटेगरीची स्पर्धा वाढली. स्पर्धा वाढली की मेरीट वाढलं आणि मग मेरीटसाठी ट्यूशन, क्लासेस, कोचिंग यांनी शिक्षणाचा बाजार सुरू केला. आता ते ही शिक्षणच देत आहेत; पण त्यासाठी लागणाऱ्या फीसला मर्यादा नाही. ओपनच्या सीट कमी असल्याने ती सीट आपल्या पाल्याला मिळण्यासाठी लोक कितीही मोठी किंमत मोजायला तयार झाले आहेत. सांगायचं झालं तर, मेडिकलच्या एका जागेसाठी पालक ट्यूशन फीच्या नावाखाली चार-पाच लाख रुपये खर्च करतात. एवढे पैसे खर्च करून सीट मिळाली तर ठीक नाहीतर पुढच्या शिक्षणाचा खर्च अजून वेगळाच. हे चित्र देशात सगळ्या भागात दिसून येते.

पण मग आता यावर उपाय म्हणून आरक्षण बंद करायचं का? नाही. आरक्षण तर हवंच. नाहीतर वरच्या वर्गातील लोक परत पैशाच्या जोरावर सगळे सीट आपल्या पाल्यांसाठीच विकत घेऊन ठेवतील. यात तोटा फक्त खालच्या वर्गाचा नाही तर वरच्या वर्गाचा देखील आहे. कारण वरच्या वर्गातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत नाही व ते एवढं महागाचं शिक्षण ऑफोर्ड करू शकत नाहीत. म्हणून आरक्षण महत्त्वाचं आहे. जर ते नसेल तर शिक्षण फक्त श्रीमंतासाठीच असेल जसे स्वातंत्र्यापूर्वी वरच्या वर्गातील लोकांसाठी शिक्षणाची मुभा होती. म्हणून हा बाजार थांबण्यासाठी पहिले कॉलेजमध्ये प्रॉपर शिकवलं पाहिजे. बेसिक गोष्टीपासून सर्व महत्त्वाच्या गोष्टी, उपकरणे कॉलेजमध्ये असावीत. तरचं ट्यूशन, कोचिंग क्लासेस चालणार नाहीत. आपल्या देशात कॉलेजात काहीच उपलब्ध नाही म्हणून ट्यूशनवाले हवे तितके पैसे आकारतात. बरं एखाद्यावेळी समजू शकतो की छोट्याशा गावात सोई-सुविधा नाहीत पण त्याच गावात ट्यूशनवाले सर्व सुविधा देतात त्याचं काय? म्हणून देशाची शिक्षणव्यवस्था सुधारली पाहिजे.

राहिला प्रश्न आरक्षणाचा, जर आपण देशाचा इतिहास पाहिला तर सर्वांना शिक्षणाची परवानगी नव्हती. विशिष्ट वर्गांना शिक्षणाची परवानगी होती. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे केले. त्यात परत अन्याय होऊ नये म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण ही संकल्पना पुढे आणली. ती तितकीच गरजेची आहे. कारण आपण हजार-हजार वर्षे त्यांचे हक्क हिसकावून बसलेलो आहोत, निदान आता तरी त्यांना तो हक्क मिळालाच पाहिजे. म्हणून आरक्षण गरजेचे आहे. पण ही संकल्पना काही राज्यात लोकांना मान्य नाही. अजूनही काही राज्यात जातीयवाद जिवंत आहे. तसा तो सर्व देशात आहे; पण काही राज्यात जास्त प्रमाणात जिवंत आहे. त्या राज्यात लोकांना आरक्षण पटत नाही. त्यांच्या मते, त्या विशिष्ट वर्गातील लोक आमच्या मुलांबरोबर शिकणार, एक वर्गात शिक्षण घेणार. हे त्यांना मान्य नाही. म्हणजेच बरोबरी मान्य नाही. पण, आरक्षण किंवा इतर कायदे व्यवस्थित असल्याने आरक्षण अजून टिकून आहे. यामुळे आरक्षण गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरसुद्धा आपल्याला आरक्षणाचा खरा अर्थ कळला नाही. आरक्षण म्हणजे रिझर्व्हेशन नसून ते कास्टचे रीप्रेझेंटेशन आहे. कारण देशाच्या एवढ्या विकासानंतर जर ही परिस्थिती असेल तर आरक्षण गरजेचे आहे आणि त्याहीपेक्षा त्याचा अर्थ जाणणे गरजेचे आहे.

ह्याच मुद्द्यावर ‘आरक्षण’ ही फिल्म साकारली आहे. जो जातीयवाद समाजात आहे तो या फिल्ममध्ये दाखवला आहे. जातीयवाद मुद्द्यावरून फिल्ममध्ये होणारे आंदोलन, मुलांची भांडणे किंवा तो कँटीनचा सीन हे सर्व सीन फिल्ममध्ये छान मांडले आहे. कँटीनचा सीन खूप महत्त्वाचा आहे. त्यातील डायलॉग हे खूप महत्त्वाचे आहेत. त्या सीनमध्ये सैफ आणि प्रतीक बब्बर दोघे शाब्दिक भांडणे करत असतात. प्रतीक हा वरच्या वर्गातील असतो आणि त्याला आरक्षणाचा मंजूर झालेला कायदा मान्य नसतो आणि त्यावरून तो वाद घालत असतो. “क्या होगा अब हमारा? जब वो काम करेंगे, तो उनका काम हमेही करना पडेगा. पढाई-लिखाई छोडके हमे उनकी तरह जुते पॉलिश करने पडेंगे.” या डायलॉगवरून आपल्याला द्वेष दिसून येतो. सहज जरी बोलला असला तो तरी ते त्याच्या मनात रुजलेलं आहे, हे दिसून येतं. परत त्या दोघांचा मेरिटवरून वाद होतो, ” पता है तुम्हे मौका क्यू नाही दिया गया कॉम्पिटीशन का? क्यूकी तुम लॉग डरते हो कॉम्पिटीशनसे.” यावर सैफचा रिप्लाय,” करेंगे मुकाबला मेरिटसे भी तुम्हारा, मगर रेस की स्टार्टिंग लाईन एक होनी चाहीये सबके लिये.” यावरून आपल्याला डायरेक्टरचे व्हीजन कळते. समाजातील अभ्यासलेले बारकावे दिसून येतात. हे डायलॉग नुसते डायलॉग नसून ते समाजाचा आरसा आहेत. ही फिल्म म्हणजे समाजाचे वास्तव आहे. खूप बारीक-सारीक बारकावे या फिल्ममध्ये दिसून येतात. सगळे बारकावे लेखात सांगता येणार नाहीत त्यासाठी ती फिल्म आवर्जून बघा.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा आदर करून जातीयवाद कमी करण्यासाठी व सर्वास समान हक्क-शिक्षण हे तत्त्व अंगिकारुया.

– प्रतिक आविष्कार
टेंभुर्णी, जि. सोलापूर

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका