आमदार निलेश लंके यांच्यावर येतोय मराठी चित्रपट
२४ ऑक्टोबर रोजी पिंपळनेर येथे होणार नावाची घोषणा
सोलापूर : (विशाल पाटमस)
कोरोना महामारीच्या काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार देवून त्यांचे जीव वाचवणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke)यांच्या कार्यावर मराठी चित्रपटाची निर्मिती होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी पिंपळनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथे चित्रपटाच्या नावाची घोषणा आ. निलेश लंके यांच्याच उपस्थितीत होणार आहे.
पारनेर ही सरसेनानी सेनापती बापट, संत निळोबाराय, अण्णा हजारे अशा थोर महापुरुषांची जन्मभूमी असून याच तालुक्यातील हंगा या छोट्याश्या गावात शिक्षकाच्या घरात जन्मलेले आमदार निलेश लंके यांचे महान कार्य पाहून जनतेने लोकवर्गणी गोळाकरून त्यांना २०१९ ला तब्बल ६० हजार मताधिक्याने विधानसभेत पाठवले. कोविड महामारीत देशातील सर्वात मोठे कोव्हीड सेंटर उभे करून ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवणाऱ्या आमदार लंके यांचा राज्यातच नाहीतर देश विदेशात नावलौकिक झाला. न भूतो न भविष्यती असे त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. जनतेचे केव्हाही कधीही एका फोनवर प्रश्न सोडवणाऱ्या लोकनेत्याच्या जीवनावर चित्रपट यावा ही अनेक कार्यकर्त्यांची आणि जनतेची इच्छा होती.
आमदार निलेश लंके यांच्याशी जवळीक असलेले लेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांना अनेकवेळा निलेश लंके यांच्या जीवनावर चित्रपट बनवावा असे लोक बोलूनही दाखवत होते. दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांनी निलेश लंके यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर २ वर्षे अभ्यास करून फिल्मसाठी स्टोरी पूर्ण केली आणि चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार भूमिका करणार असून चित्रपटाच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग जवळपास पूर्ण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्रीमान योगी या शिवचरित्र ग्रंथाचे ५ दिवस पारायण करून दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता या चित्रपटाच्या स्टोरीचे पूजन आणि नावाची घोषणा करण्यात येणार आहे. आ. निलेश लंके, जि.प. सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या राणीताई लंके यांच्या हस्ते चित्रपटाच्या स्क्रिप्टचे पूजन, चित्रपटाच्या नावाची घोषणा होईल.
त्यामुळे आता आमदार निलेश लंके यांच्यावर येणाऱ्या चित्रपटाची सर्वांनाच आतुरता लागली आहे.
कोण आहेत निलेश लंके?
निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला. लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयटीआय केलं आहे. काहीकाळ ते काही कंपन्यांमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटे हॉटेल देखील सुरु केलं. परंतु काही काळाने ते बंद केलं. त्यांनंतर त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.
शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
निलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली. वयाच्या 15 व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला. हंगा गावची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली. 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.
रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळण्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर सुरु केलं आहे. सर्व सोयी सुविधा असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणाची तसंच उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम देखील इथं आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील ऑगस्ट 2020 मध्ये टाकळी ढाकेश्वरमध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर त्यांनी सुरु केलं होतं. त्याचं उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.