आमदारांचा बाप ड्रायव्हर हवा होता!

पत्रकार विलास बडे यांचा खणखणीत लेख

Spread the love

गेल्या काही दिवसात 35 पेक्षा जास्त एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या. अनेक पोरं पोरकी झाली. त्या पोरांचे तळतळाट आणि आयाबहिणीच्या पुसलेल्या कुंकवाचे डाग खुर्चीला लागण्याआधी सरकारनं जागं व्हावं म्हणून हे लिहितोय.

दररोज ६७ लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या १ लाख कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी निकराचा लढा सुरु केलाय. विलिनीकरणाच्या एकमुखी मागणीसह तो संपात उतरलाय. आज हा कर्मचारी संघटनांच्या झुली झुगारून नागवा उभा आहे स्वतच्या हिंमतीवर एखाद्या योद्ध्यासारखा. संघटनांवरचा अविश्वास ही सगळ्याच पुढाऱ्यांना मोठी चपराक आहे.

एसटी महामंडळ तोट्यात आहे, सामान्य प्रवासी वेठीला धरला जातोय अशा कारणांची ढाल करून सामान्यांचा पाठिंबा मिळू नये ही खेळी खेळली जातीय. कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जातीय. अवमान याचिका दाखल केली जातीय. संप मोडून काढण्याचे हे सरकारी प्रयत्न समजण्याइतकं दुतखुळं कुणी राहिलं नाही. सत्ता कुठलीही असतो ती निबर असते हे पुन्हा अधोरेखित होतंय.

एसटी महामंडळ तोट्यात गेलं, ते एसटी कर्मचाऱ्यांनी पार्ट्या केल्या, कष्टात कसूर केली म्हणून नाही. तर त्याच्या कष्टावर पुढाऱ्यांनी पोटं भरली म्हणून. बस खरेदीपासून टायरपर्यंतचं सगळं ‘काही’ लोकांनी सहज पचवलं म्हणून. सरकारांनी एसटीच्या जीवावर आपल्याला मतांची बेगमी मिळावी अशी धोरणं राबवली म्हणून. मग प्रश्न आहे त्याचा फास कर्मचाऱ्यांच्या गळ्याला का?

एसटीचा तोटा 12 हजार 500 कोटींवर गेला म्हणून पुढारी त्यांना पगारवाढ नाकारतात. सरकारमध्ये विलिनीकरणाला टाळाटाळ करतात. मग राज्यावर पाच लाख कोटी रूपये कर्ज असताना आपली पगारवाढ करून घेताना पुढाऱ्यांना राज्याच्या तिजोरीची चाड नव्हती का? जर महागाईनं तुमची लाखात गुजराण होत नाही तर मग महाराष्ट्राला प्रामाणिक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी १२-१५ हजारात पोट कसं भरायचं?

एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची गरीबांची लाईफलाईन आहे. ऐन दिवाळीत एसटी बंद पडल्यानं यावर्षीची दिवाळी लोकांना प्रचंड यातनांसह साजरी करावी लागतीय. पण कोण पुढारी आणि त्याचे घरचे एसटीने प्रवास करतात? त्यांना कसे कळणार सामान्यांचे हाल आणि व्यथा?

30 वर्षं नोकरी करून 30 हजार पगार. तोही कधीच वेळेवर नाही. त्यासाठीही झगडावं लागतं. त्यांनी आपली कुटुंबं कशी जगवायची? पोरांना कसं शिकवायचं? पोराबाळांची लग्नं कशी करायची? लालपरीच्या सेवेकऱ्याला भाकरीचे वाळलेले तुकडे खाऊन जगताना पाहून पोटात कालवाकालव होते.

खेड्यातल्या माणसांसाठी एसटीचं महत्व अनन्यसाधारण आहे. वर्षानुवर्षं गावात एसटी घेऊन येणाऱ्या ड्रायव्हर, कंडक्टरसोबत गावातल्या माणसांचं एक नातं जुळलेलं असतं. मुक्कामी गाडीवरचे ड्रायव्हर, कंडक्टर तर त्या गावचे होऊन जातात. हे बिचारे ऊन, वारा, पाऊस काहीही असो गावाला अविरत सेवा देतात. गावाकडच्या रस्त्यांवरून रोज सेवा देणारे ड्रायव्हर, कंडक्टर आज आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडताहेत. त्याचा सामान्यांना प्रचंड ञास होतोय. पण सरकारला ञास होत नाही हे दूर्दैवं. उत्तर प्रदेशात गाडीखाली शेतकरी चिरडून मारले. आपल्या सरकारच्या संवेदना जाग्या झाल्या. महाराष्ट्र बंद झाला. इथं घरात आपली लेकरं तळतळून, हतबल होऊन आत्महत्या करताहेत. पण सत्तेच्या संवेदना जाग्या होत नाहीत.

एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मुंबई पुण्यात प्रायव्हेट गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला 15 ते 20 हजार पगार आहे. एसटी चालवणाऱ्यांना १२ हजार हा कसला न्याय? 30 वर्षं नोकरी करून 30 हजार पगार. तोही कधीच वेळेवर नाही. त्यासाठीही झगडावं लागतं. त्यांनी आपली कुटुंबं कशी जगवायची? पोरांना कसं शिकवायचं? पोराबाळांची लग्नं कशी करायची? लालपरीच्या सेवेकऱ्याला भाकरीचे वाळलेले तुकडे खाऊन जगताना पाहून पोटात कालवाकालव होते. त्यांची अगतिकता अस्वस्थ करते. भाकरीच्या हतबलतेपोटी होणाऱ्या आत्महत्या शिवशाहीच्या बाता मारणाऱ्यांना लांच्छनास्पद आहेत. कारण रयतेच्या डोळ्यातील अश्रूंनी अस्वस्थ होणारी शिवरायांची शिवशाही होती. कष्टाचा मोबदला मागितला म्हणून, पोटासाठी संप केला म्हणून पोटावर निलंबनाचे रट्टे मारणारी सत्ता शिवशाही कशी असू शकेल?

विलास बडे (सुप्रसिध्द पत्रकार)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका