आपुलकीने दिली मायेची ऊब
ब्लँकेट वाटप करून केला वर्धापन दिन साजरा
सांगोला/ नाना हालंगडे
झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब देत आपुलकी प्रतिष्ठानने आपला तिसरा वर्धापन दिन साजरा केला.
सांगोला येथे गेल्या तीन वर्षापासून सामाजिक कार्य करत असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 31 डिसेंबर रोजी मिरज येथील अंध शाळेतील विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा त्याचबरोबर “दारू नको दूध प्या” हा कार्यक्रम आयोजित केला होता.
परंतु कोरोनाच्या वाढत्या निर्बंधांमुळे “जाणीव आपल्या जबाबदारीची” या ब्रीदवाक्याचे पालन करत ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रद्द करून वासुद रोड, मिरज रोड व शहर परिसरात विविध व्यवसायानिमित्त झोपडी करून राहत असलेल्या गोरगरीब नागरिकांना तसेच रात्री उघड्यावर झोपणाऱ्यांचा शोध घेऊन ब्लँकेट वाटप करून त्यांना मायेची ऊब देऊन आपला तिसरा वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सहसचिव शरणप्पा हळळीसागर, हरिभाऊ जगताप, अरविंद डोंबे, अरविंद केदार, सुरेशकाका चौगुले, महादेव दिवटे, रमेश देवकर, संजय गव्हाणे, पांडुरंग केदार, उमेश चांडोले आदी उपस्थित होते.