‘आपुलकी’ची प्रेरणा घेऊन सोनंद येथील पुरुष बचत गटाने घालून दिला वेगळा आदर्श!
दिवाळीनिमित्त १०० कुटुंबाना फराळाचे वाटप
सांगोला / डॉ. नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील सोनंद येथील सद्गुरू स्वयंसहायता बचत गट या पुरुषांच्या बचत गटाला 11 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गटाने दिवाळीला सोनंद गावातील 100 गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ व महिला भगिनींना भाऊबीज म्हणून साड्या भेट देण्याचा उपक्रम राबवला. कोरोनासारख्या आपत्तीने भल्याभल्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, त्यात आशा हातावर पोट भरणाऱ्या लोकांचे हाल तर न सांगण्याजोगी आहेत. जिथे दोन वेळच्या जेवणाला गाठ घालने मुश्कील झाले आहे तिथे दिवाळीचे गोड-धोड करणे फार लांबची गोष्ट आहे. ही बाब ध्यानात घेऊन सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानने राबविलेल्या उपक्रमाची गटांमधील सर्व सदस्यांनी चर्चा करून गावातील अशा गरजू कुटुंबांना गटामार्फत फराळ देण्याचा निर्णय घेतला.
तसेच गावातील दानशूर व्यक्तींना नवीन साड्या देण्याचे आवाहन केले. बघता बघता नवीन शंभर साड्या जमा झाल्या. फराळ म्हणून प्रत्येक कुटुंबास पाऊण किलो शेव चिवडा, पाऊण किलो मोतीचूर लाडू, अर्धा किलो चकली, अर्धा किलो शंकरपाळी असा संपूर्ण कुटुंबाला पुरेल एवढा अडीच किलोचा फराळ देण्यात आला.सदर कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सदस्यांनी त्यांना तो पोहोच केला. अचानक मिळालेला हा सुखद धक्का सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. त्यामुळे सदस्यांनाही केलेल्या कामाचे चीज झाल्याचे वाटत होते. संपूर्ण गावांमध्ये फिरून दिवसभर फराळ व साडी वितरण सदस्यांनी अगदी खाणेपिणे विसरून पार पाडले.
गेली अकरा वर्षे पारदर्शक कारभार करणाऱ्या पुरुषांच्या गटाने आत्तापर्यंत अनेक समाज उपयोगी कामे केल्याची माहिती गटाचे चालक राहुल टकले यांनी दिली. त्यामध्ये मुलांना स्वातंत्र्यदिनी खाऊ वाटप करणे. याचबरोबर गावांमध्ये दोन वर्षापूर्वी नाम फाऊंडेशन व पाणी फाऊंडेशनच्या मार्फत झालेल्या जलसंधारणाच्या कामासाठी एकरकमी 75000 रुपये डिझेल साठी दिले. तसेच गटातील एखाद्या सदस्याचे आकस्मिक निधन झाल्यास त्याचे कर्ज माफ करण्याचे कामही बचत गटाने केले आहे. आज पर्यंत त्याचा लाभ कै. प्रकाश सपाटे ,कै.समाधान जवंजाळ ,कै.संजय यादव यांच्या कुटुंबीयांना झाला आहे. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणे,आकस्मिक वैद्यकीय खर्चासाठी पन्नास हजार रुपये बिनव्याजी देणे यासारखे उपक्रमाचा गटातील सदस्यांनी घेतला आहे, या सर्व उपक्रमा सोबत आपली सामाजिक बांधिलकी जोपासणारा गरजू कुटुंबीयांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
यासाठी राहुल टकले गुरुजी, संतोष काशीद,बाळासो साळुंखे, धनंजय भिंगे, राजकुमार बाबर सर, संजय काशीद, माणिक देशमुख सर ,सोमनाथ सपाटे सर, संतोष जाधव सर, डॉ.प्रमोद काशीद,सुहास काशीद, अमर टकले सर, प्रमोद कोडग सर, जावेद मुलांनी मेजर, दिगंबर साळुंखे सर, इक्बाल मुलानी, दत्तात्रय ठोकळे,चिंतामणी ठोकळे, सुनील काशीद, विशाल सोनंदकर, कुमार गुरव सर, अरविंद बाबर, महादेव रानगर सर, दत्तात्रय सुरवसे गुरुजी, विलास म्हेत्रे गुरुजी, ओंकार काळे, सहील तांबोळी, किरण ठोकळे, नवनाथ फडतरे, सूर्यकांत कांबळे, बडू चव्हाण,भगवान सूर्यवंशी, रत्नंजय भिंगे, अंकुश कुंभार, विशाल सोनंदकर याच बरोबर उष:काल बचत गट,सद्गुरु फंड बी. सी. योजनेच्या सर्व सदस्यांनी व गटा बाहेरील ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले.