आधुनिक शिक्षण क्षेत्रात पाली भाषा आणि साहित्याचा अभ्यास महत्त्वाचा : डॉ. प्रफुल्ल गडपाल

सोलापूर : विशेष प्रतिनिधी
भाषा विज्ञानाच्या माध्यमातून नवनिर्मितीच्या अंगाने पाली भाषेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. रोजगाराभिमुख संगणकीय भाषा क्षेत्रात पाली भाषेचे महत्त्व वाढत आहे, त्या दृष्टीने पाली भाषेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. पाली भाषा व्याकरण परंपरेत संशोधनाच्या क्षेत्रात मोठी संधी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संस्कृत विद्यापीठ लखनऊ येथील डॉ. प्रफुल्ल गडपाल यांनी केले.
ते ‘जागतिक पाली भाषा गौरव दिना’ निमित्त “आधुनिक भाषा, साहित्य क्षेत्रात पाली अभ्यासाचे महत्त्व” या विषयावर बोलत होते.
मा.कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाड्.मय संकुलातील पाली विभागाने जागतिक पाली भाषा गौरव दिनानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
१७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पालि भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षिय मनोगतात ते म्हणाले की, पाली साहित्यातील पाली भाषा आणि त्या साहित्यातून मानवी जीवनावर रुजवणारी मूल्ये यांचे लेखन झाले आहे. भारतीय संस्कृतीच्या अभ्यासातून जनसामान्यांसमोर असे दिशा देणारे साहित्य आले पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उत्तम कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि वक्त्यांचा परिचय प्रा. विजयकुमार झुंबरे यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी संकुलातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
पाहा खास व्हिडिओ