आज विद्यार्थी दिन; आजच्याच दिवशी डॉ. आंबेडकरांचा झाला होता शाळा प्रवेश
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सर्व विद्यार्थी मित्रमैत्रीणींना विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्या रजिस्टरला ‘१९१४’ या क्रमांकासमोर आजही त्यांची स्वाक्षरी असून, हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.
‘विद्यार्थी दिवस’ उपक्रमाअंतर्गत सर्व शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन आदी उपक्रम आयोजित करण्यात येतात.
भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस भारतीय इतिहासातील वैचारिक, समानतेची, बधुत्वाची, शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल मानली जाते.
महामानव डॉ. आंबेडकर हे शाळाप्रवेशाने स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधी शोषित, दलितांचे नि वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. त्यांच्या संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे व म्हणूनच हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभरात “विद्यार्थी दिन” म्हणून साजरा केला जात आहे.
“विद्यार्थी दिन” हा दिनविशेष विद्यार्थ्यांचे प्रश्न वा समस्या ऐरणीवर मांडण्यासाठी महत्त्वाचा समजला जावा अशी अपेक्षा आहे.
स्वतःच्या सर्वांगिण विकासासाठी, स्वतः मधील सर्व ज्ञान-कला-कौशल्ये ही शिक्षणरुपात स्वतःहुन, स्वयंप्रेरणेने वा मार्गदर्शनाने विकसित करणे म्हणजेच विद्यार्जन करणे होय. विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास करणे हे भारतीय शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षणाच्या या मुख्य उद्दिष्टाशी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर यांनी प्रामाणिक राहण्यासाठी, काय करायला हवे याचा गांभीर्याने विचार शासनाने आजच करायला हवा
“विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास” या उद्दिष्टापासून भारतीय शिक्षण अजूनही कोसो मैल दूर आहे ही आजच्या दिवसाबाबत मांडण्यासारखी मूळ समस्या आहे.
शिक्षण घेवून आदर्श भारतीय नागरिक तयार होणे हे शिक्षण प्रक्रियेतले मुख्य आउटपुट साध्य होण्यासाठी विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होणे सर्वांत महत्त्वाचे ठरते.
हे साध्य होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेवून त्या समस्यांचे निराकरण करणे हा भारतीय शैक्षणिक विकासाला अनेक महत्वाच्या पैलूंपैकी अधिक महत्त्वाचा पैलू आहे आणि यावर आजच विचार करण्याची नितांत गरज आहे.
आज या विद्यार्थी दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या समस्या थोडक्यात पाहु या !
१) शैक्षणिक अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख हवा. त्या अभ्यासक्रमाला व्यावहारिक मूल्य हवे. आजचे पुस्तकी ज्ञान व्यवहारात कुचकामी ठरते ही मूळ समस्या आहे.
२) अभ्यासक्रम ठरविताना ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील विद्यार्थ्यांचा विचार व्हायला हवा. ग्रामीण व शहरी भाग यांचा सूवर्णमध्य वेधणारा आजचा अभ्यासक्रम नाही ही सुध्दा महत्त्वाची समस्या आहे.
३) “काय शिकावे ?” या अभ्यासक्रमाच्या जोडीला, “कसे शिकावे ?” हा उप-अभ्यासक्रम सुध्दा असणे अत्यंत आवश्यकच आहे. “कसे शिकावे?” हा भागच बहुतेकांना आत्मसात होणे दूरच पण ज्ञात ही होत नाही हे भारतीय शिक्षणाचे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.
४) स्वयं अभ्यास पद्धतीचे तंत्रशुध्द ज्ञान देणारा भाग अभ्यासक्रमातच हवा. वाचन क्षमता वाढवून संदर्भ ग्रंथांचा सुयोग्य वापर करायला शिकविणे हा भाग यात महत्त्वाचा समजला जावा.
५) शाळा वा कॉलेजच्या दैनंदिन वेळा ठरवितांना विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेचा विचार व्हावा. शिक्षण क्षेत्र हे बौध्दिक क्षेत्र असल्याने, अवधान केंद्रित करण्याची क्षमता लक्षात घ्यायला हवी. शाळा वा कॉलेजचा दैनंदिन कालावधी तासांमध्ये वाढविल्यास त्या तासांचा शारिरीक ताण आपोआपच मनावर येवू बौध्दिक ताण वाढतो. अत्यंत करमणूक प्रधान व आवडता चित्रपट असला तरीसुद्धा आपली सलग तीन तास बैठक क्षमता नसते. पाच मिनिटांत वाचली जावू शकणारी पोस्ट आपल्याला लांबलचक वाटून आपण ती वाचायचीच टाळतो तर दैनंदिन शालेय कालावधी तासांमध्ये वाढ करुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे भले करायचे की आणखी काही, याचा ही अत्यंत गांभीर्याने विचार व्हायलाच हवा.
६) विद्यार्थ्यांना पुस्तके वा तत्सम महत्त्वाची शैक्षणिक साधने कमी खर्चात सर्वत्र उपलब्ध असावीत.
७) शाळा वा कॉलेज या दोन्ही ठिकाणी परिपूर्ण भौतिक सुविधा असाव्यात. या भौतिक सुविधांत विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य यांचा विचार व्हायला हवा. पाणी, मध्यान्ह भोजनगृह वा कँटिन तसेच स्वच्छता गृह यांची सोय असावीच. शालेय मध्यान्ह भोजन हे सकस नि आरोग्यदृष्ट्या समतोल असणारे, ताजे व निर्जंतुक हवे.
८) शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तर ओझ्याची समस्या चावून चोथा झाली तरीसुद्धा सक्षम उपाययोजना करण्यात आलेली नाही.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुनश्च विनम्र अभिवादन !