आज वसुबारस; दीपोत्सवाचा पहिला दिवस

जाणून घ्या या सणाचे धार्मिक महत्त्व

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
आज वसुबारस. दीपोत्सवाचा पहिला दिवस. दिवाळी सणाच्या आमच्या सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा! वर्षातला महत्वाचा सण असलेल्या दिवाळी सणाला आज सुरुवात झाली आहे. वसुबारसचे धार्मिक महत्त्व आहेच, शिवाय कृषी संस्कृतीचाही या सणाशी जवळचा संबंध आहे. जाणून घ्या या सणाचे धार्मिक महत्त्व.

आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पाढती आहे.

धार्मिक महत्त्व
समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्‍त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गाईची पूजा करतात.

गोवत्स द्वादशीचे महत्त्व :
भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात.

१. वेदांनी वर्णिलेले गायीचे महत्त्व!
वेदांनी हिंदूंच्या पाच सांस्कृतिक मानबिंदूत जननी, जन्मभूमी, गंगा आणि गायत्री यांसह ‘गोमाते’ला अनन्यसाधारण स्थान दिले आहे.

२. गायीमुळे होणारी पंचमहाभूतांची पर्यायाने पर्यावरणाची शुद्धी !
‘त्वंमातासर्वदेवानाम् ।’ अर्थात ‘गाय ही सर्व देवतांची माता आहे’, असे म्हटले जाते. परमपित्याने सृष्टीच्या उत्पत्तीकाळात मनुष्याच्या हितासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्त्वरूपी देवतांची निर्मिती केली. गाय या पंचतत्त्वांची माता आहे; कारण गोमाता भूमी, पाणी आणि वायू यांची पुढीलप्रकारे शुद्धी करते.

गोमय (शेण) आणि गोमूत्र हे भूमातेचे स्वाभाविक अन्न आहे. हे अन्न भूमातेला योग्य प्रमाणात मिळाले, तर भूमीही आरोग्यदायी होऊन पुष्कळ प्रमाणात अन्नाचे उत्पादन करील. आज केवळ रासायनिक निक्षेप (शिल्लक राहिलेले अवशेष) आणि कीटकनाशके यांमुळे अन्न, पाणी अन् वायू यांमध्ये प्रदूषण होत आहे. गोमय आणि गोमूत्र यांमध्ये कीटक प्रतिबंधक गुण असतात; मात्र ते मानव, पशू, पक्षी, कीटक-पतंग आणि पर्यावरण यांसाठी बाधक नाहीत. गोमयाच्या साहाय्याने कोणत्याही प्रकारच्या कचर्‍यापासून ‘कंपोस्ट’ पद्धतीने उत्तम खत बनवले जाऊ शकते.

आप : गोमय आणि गोमूत्र भूमीवरील पाणी अन् पावसाचे पाणी यांची शुद्धी करते. गोमयामुळे जलाशयासारख्या पाण्याच्या मोठ्या स्रोतांचे स्थलांतर रोखले जाऊन त्याची शुद्धी होत असते.

तेज : गायीचे तूप हवनाच्या माध्यमातून अग्नीरूपी देवतेच्या मुखामध्ये प्रवेश करून तेजतत्त्वाची शुद्धी करण्यासह आकाशादी सर्व देवतांची तृप्ती करते.

वायू : दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानाची वृद्धी आणि कार्बनचे उत्सर्जन यांवर नियंत्रण केवळ गोमय अन् त्यापासून निर्माण होणारे इंधन यांचा वापर केल्यानेच होऊ शकेल.

आकाश : आज प्रदूषणामुळे मानवाला रासायनिक पाऊस, अतीवृष्टी आणि अनावृष्टी, यांसारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.

गोमूत्र : हे पावित्र्य निर्माण करणारे आहे. गोमूत्र काही रोगांना सरळ नष्ट करते, तर काही रोगांना शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून नष्ट करते.
गायीचे दूध : हे बुद्धीवर्धक, चापल्यवर्धक (स्फूर्तीदायी), रोगप्रतिबंधक आणि शरिराचे पोषण करण्यास संवर्धक आहे.
गायीचे तूप, ताक आणि पंचगव्य : हे सर्व पदार्थ गायीच्या माध्यमातून मानवाला मिळालेला ईश्वरनिर्मित उत्तम आहार आहेत.
गायीचे लाभ ओळखून सर्वांनी तिच्या पालनाची प्रतिज्ञा करणे, ही काळाची आवश्यकता !

रक्षामि धेनुं नित्यं पालयामि धेनुं सदा ।
ध्यायामिधेनुं सम्यक् वन्दे धेनुमातरम् ।।

अर्थ : आम्ही गोमातेचे नेहमी रक्षण करू. आम्ही नेहमी गोपालन करू. तसेच गोरक्षण, गोसंवर्धन आणि गोपालन यांविषयी सतत चिंतन करू. हे गोमाते, तुझ्या वंदनीय स्वरूपाला जनमानसांत पुन्हा प्रस्थापित करू.’

(संदर्भ : विकिपीडिया व इतर)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका