आजची मुले उद्याचा भारत निर्माण करतील
आज राष्ट्रीय बालदीन, पंडित नेहरू जयंती
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस हा आपण राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा करतो. त्या निमित्ताने सर्व बाल वर्गाला मनस्वी शुभेच्छा !
पंडित नेहरू यांचे असे मत होते की, “आजची मुले उद्याचा भारत निर्माण करतील. आम्ही त्यांना ज्या मार्गाने आणतो त्याद्वारे देशाचे भवितव्य निश्चित होईल !”
बालकांना आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे ! ही मुलेच देशाचे भविष्य आहेत !
देशभरातील मुलांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे !
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला.
महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावली प्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देश्याच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला.
स्वराज्यासाठी त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात लखनौला लाठीमार सहन केला. ते त्यांच्या निर्णयाला शेवट पर्यंत चिकटून राहिले. निस्सीम देशभक्ति मुळे ते १९२९ ला कॉंग्रेस चे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान झाले.
१७ वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले.
देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन, ”पंचशील” हि लाख मोलाची देणगी जगाला दिली. “शांतीदूत” हि पदवी बहाल करून त्यांना सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत हि जाणीव त्यांच्या ठायी होती.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन २७ मे १९६४ रोजी झाले.
*संदर्भ : इंटरनेट