आंबेडकरी दिशेने वाटचाल करणारी कविता
डॉ. गिरीश मोरे यांचा खणखणीत लेख
‘तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे ‘ हा सारीपुत्र तुपेरे यांचा कवितासंग्रह थिंक टॅंक पब्लिकेशन, सोलापूरच्या वतीने प्रकाशित होत आहे. मुखपृष्ठावर डाव्या हातात पुस्तक असलेला, उजव्या हाताचे एक बोट उंचावून सूर्याकडे निर्देश करणारा एक पुतळा दिसतो. समोर पक्षांची रांग विहारत चालली आहे. शिक्षित-अशिक्षित अशा कोणासही कळेल की हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. सूर्य उगवतीचा आहे की मावळतीचा? हा प्रश्न महत्त्वाचा नाही कारण तो सूर्य आहे, हे महत्त्वाचे. त्याखाली तळात ‘ तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे ‘ असे विधानवजा शीर्षक आढळते. मुखपृष्ठ आणि शीर्षकावरून सहज लक्षात येऊ शकते की या संग्रहातील कविता आडपडदा न ठेवता ‘ आंबेडकरी दिशा ‘ व्यक्त करणारी आहे.
योगीराज वाघमारे आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे यांच्या ग्रंथांचे आज प्रकाशन
ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे लिखित ललितग्रंथ “पत्रास कारण की..” आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे लिखित काव्यसंग्रह “तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे ” या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन आज बुधवार, २५ जानेवारी रोजी होत आहे. रंगभवन येथील समाजकल्याण सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. थिंक टँक पब्लिकेशन्सने हे दोन्ही ग्रंथ प्रकाशित केले आहेत. हा ग्रंथ प्रकाशन समारंभ ज्येष्ठ कथाकार बा. ना. धांडोरे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सोशल कॉलेजचे प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी असतील. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ लेखक डॉ. शेरअली शेख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. डी. शिंदे, बौद्ध साहित्याचे अभ्यासक डॉ. संघप्रकाश दुड्डे मार्गदर्शन करतील. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन थिंक टँक पब्लिकेशन्सचे संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी केले आहे.
कवी सारीपुत्र तुपेरे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. कवितेने सूचकतेचा आधार घेऊन व्यक्त व्हावे असा रूढ संकेत असतो. हा संकेत किती टक्के पाळायचा हे ज्या त्या कवीचे स्वातंत्र्य असते. ‘तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे..’ हा संग्रह हा संकेत झुगारणारा आहे. कवीने प्रतिमा आणि प्रतीकांना या संग्रहात क्लिष्ट पातळीवरून सुबोध पातळीवर आणले आहे. संग्रहाचा आरंभच मुळी एक नम्र निवेदनाने होतो. कवी म्हणतो, “बाबासाहेब, तुम्ही आमच्यासाठी जीवाच्या पलीकडे आहात. आम्ही तुमची लेकरे आहोत. म्हणूनच तुम्हाला एकेरी बोलतोय क्षमा असावी.”
याशिवाय पुढील पृष्ठावरील अर्पणपत्रिकासुध्दा स्पष्ट आशय व्यक्त करते. “‘अस्मितादर्श’ आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र. गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालखंडापासून आजपर्यंत दलित, शोषित, वंचित समुहातील नवोदित कवींना लेखनाची प्रेरणा देणाऱ्या अस्मितादर्शला सविनय सादर”. कवीचे निवेदन, अर्पणपत्रिका, मुखपृष्ठ आणि कवितासंग्रहाचे शीर्षक यावरून कवीची भूमिका किती स्पष्ट आणि निर्धारित आहे, हे लक्षात येते.
भारत आणि एकूणच जग जागतिकीकरणाच्या रेट्यात वावरत आहे. सबंध जगातील माणूस हा काही समान समस्यांतून जात आहे. पृथ्वीवरील वाढते तापमान आणि प्रदुषण, नवनव्या विषाणूंमुळे निर्माण होणारी महामारी, महासत्तेसाठी चाललेली स्पर्धा, महायुध्दसदृश्य वातावरण, आर्थिक मंदी आणि ग्लोबल बेकारी असे किती तरी प्रश्न जागाला भेडसावत आहेत. एकूणच आपण ग्लोबल होत आहोत. असे असले तरी भारतीय माणूस परंपरेने चालत आलेल्या रूढी सोडताना दिसत नाही. अजूनही धार्मिक आणि जातीय अहंकार जोपासला जात आहे. या पार्श्वभूमीवर सारीपुत्र तुपेरे यांची कविता आंबेडकरी दिशेची आवश्यकता व्यक्त करते.
कवी सारीपुत्र तुपेरे हे मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत. ते प्राध्यापक आहेत. आंबेडकरी चळवळीत वावरणारे आहेत. प्रागतिक मूल्यांची जाणीव बाळगणारे आहेत. त्यामुळे सभोवतालच्या घडामोडींचा अत्यंत संवेदनशीलतेने ते वेध घेतात. आज अंधारलेले असले तरी ‘सूर्य उद्या उगवणार आहे’ हा आशावाद ते व्यक्त करतात. ते स्वसह वंचित आणि उपेक्षितांचे जगणे टिपत जातात. आपल्या इतिहास आणि भूगोलाचा शोध घेतात. त्यातून अज्ञान, अविद्येचा आणि तृष्णेचा अंधकार नाहीसा करण्याचा निर्धार व्यक्त करतात.
गौतम बुध्द, सावित्री-जोतीराव फुले, राजर्षी शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांना सोबतीला घेतात. त्याशिवाय माणूस म्हणून आपली ओळख निर्माण करता येत नाही, याचे भान ते व्यक्त करतात.
आंबेडकरी साहित्यात ‘सूर्य’ ही प्रतिमा ठळक रूपात आली आहे. ‘तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे’ या संग्रहातही ‘सूर्य’ ही प्रतिमा सातत्याने आली आहे. उदा. ‘उद्याचा सूर्य उगवेल'(पृ.२४), ‘शतकानुशतकाचा अंधार नाहीसा करणारा प्रज्ञासूर्य'(पृ.४८) , ‘सूर्य उद्या उगवणार आहे’ (पृ.६४), ‘ हे शब्दच पाहतील सूर्य उद्याचा’ (पृ.७८) या अभिव्यक्तीत ‘सूर्य’ ही प्रतिमा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी येते त्याबरोबरच ती स्वातंत्र्य आणि प्रकाश याचेही सूचन करते.
भारतीय समाजव्यवस्थेत कोणत्याही व्यक्तीला तिचे स्वतःचे जगणे जगता येत नाही. कुणी तरी त्याच्या सोयीसाठी आखलेले जीवन हे परावलंबी असते. त्यावर इतरांचा अंकुश असतो. प्रचलित शिक्षणव्यवस्थाही अशीच आहे. त्यासाठी पुढील काळात प्रत्येकाने स्वत्व संपादन केले पाहिजे. म्हणून कवी म्हणतो, “उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा / प्रकाश सर्वत्र पडेल / वर्गात मी येईन तेव्हा / प्रत्येक बेंचवर सावली मात्र / तुमचीच मला भेटेल” (पृ.२४) या रचनेत अंधारमुक्ती, बंधमुक्ती, दुःखमुक्ती आहे त्याप्रमाणे स्वातंत्र्याची आशाही आहे.
मुळात आंबेडकरी दिशा हे सारीपुत्र तुपेरे यांच्या कवितेचे केंद्र आहे. ‘तुझ्या बोटाच्या दिशेने’, ‘रूप भिमाचे’, ‘जयभीम मित्रा’ आणि ‘प्रिय बाबासाहेब’ या कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारे चिंतन व्यक्त करणाऱ्या आहेत. ‘प्रज्ञासूर्य ‘ ही प्रतिमा मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला बुध्दीचा, ज्ञानाचा, प्रतिभेचा आणि प्रज्ञेचा अवकाश उघड करणारी आहे.
‘अंधार’ ही प्रतिमा केवळ निसर्गातील एका घटनेचे सूचन म्हणून येत नाही. हा अंधार गुलामगिरीचा, अज्ञाचा, पारतंत्र्याचा आणि बहिष्कृतपणाचा आहे. तो नष्ट करण्यासाठी आंबेडकरी दिशा उपयुक्त ठरते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये या दिशेत सामावलेली आहेत. म्हणून कवी बाबासाहेबांना उद्देशून म्हणतो, ” भीमा…तू दाखवलेस मुक्त आभाळ स्वातंत्र्याचे / व्यापक आकाश समतेचे / विश्व व्यापक गगन बंधुभावाचे ” (पृ.१०)
सारीपुत्र तुपेरे यांच्या कवितेत आंबेडकरी दिशेत दृग्गोचर झालेला बुद्धविचार येतो. बुद्ध हा सम्यक जीवनाचा मार्ग आहे. लोकांनी बुद्धाला धर्मात अडकवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धविचार संशोधित करून दिला. त्यामुळे बुद्ध हा केवळ बौध्दांचा नाही तर तो सर्वांचा आहे, अशी भूमिका कवी घेतो. बुद्ध दुःखमुक्तीचा मार्ग दाखवतो. तो प्रतित्यसमुत्पाद दाखवतो. तो सत्याची दिशा रेखांकित करतो. ‘बुद्ध चालत आहे’ या कवितेत भूत आणि वर्तमानातील बुध्दविचाराची स्थिती व्यक्त झाली आहे.
जेतवन, पिंपळपान, रोहिणी नदी, सारनाथ, बुद्धगया, दीक्षाभूमी, श्रावस्ती ही नावे उच्चारली की बुद्ध आठवतो. मिलिंद, सारीपुत्त, मोगलायन आणि अंगुलीमाल आठवला की बुद्ध समजतो. कवीला वाटते बुद्ध हा आजच्या स्तुपात आहे, विहारात आहे एवढेच नाही तर तो अणू रेणूतून चालत आहे. तो विपस्सना शिबिरात नाही. बुद्धाचे हे सातत्य समजल्यामुळे कवी म्हणतो,” माणूस म्हणून जागविणारा / बुध्द माझा सांगाती ” (पृ.३३)
आंबेडकरी दिशेत बुद्ध, कबीर आणि फुले हेही सामावलेले आहेत. ‘सावित्री जोतीराव फुले’ यांचे कर्तृत्व आजही प्रेरणा देणारे आहे. स्त्रीचे शिक्षण, तिचे स्वातंत्र्य, आणि तिची अस्मिता कवी सारीपुत्र तुपेरे यांना महत्त्वाची वाटते. त्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेला संघर्ष ते शब्दात मांडतात.
‘सावित्रीच्या कपाळावरील आडवं कुंकू’ या कवितेत आडव्या लाल कुंकवाला सौभाग्याचे प्रतीक न मानता स्त्रीशिक्षण आणि स्त्रीचा संघर्ष याची साक्ष देणारे प्रतीक बनवले आहे. त्यातील ‘उभी रेषा’ आणि ‘आडवी रेषा’ या प्रतिमा समाजव्यवस्थेतील दोन विरोधी टोक व्यक्त करतात. ‘उभी रेषा’ ही जातीय-धार्मिक उतंरड आणि स्त्रीशोषणाचे सूचन करते तर ‘आडवी रेषा’ ही सरळ रेषेतील समता, स्वातंत्र्य, शिक्षण, स्वाभिमान यांचे सूचन करते. त्यामुळे सावित्रीबाईंपासून प्रेरणा घेऊन शिक्षित झालेल्या स्त्रीविषयी कवी म्हणतो, “सरळ रेषेत / आली स्त्री / तिचे जीवन / सावित्रीच्या कपाळावरील / आडव्या रेषेसारखं ” (पृ.३७) कुंकवाच्या लाल आडव्या रेषेला कवीने नव्या आशयात आणले आहे.
‘तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे’ हा संग्रह आंबेडकरी दिशेने वाटचाल करताना काही प्रश्नांची दखल घेतो. ‘फॅंड्री’ या चित्रपटातील जब्या या व्यक्तिरेखेने मारलेल्या दगडाकडे कवी अन्याय, गुलामी आणि विषमतेविरुध्दचे प्रतीक म्हणून पाहतो. ग्लोबल होणारी माणसे जात सोडत नाहीत. खैरलांजी, सोनई आण जवखेडा यांसारख्या घटना घडवल्या जातात. सत्याच्या मार्गाने चालणाऱ्यांचा खून होतो. धार्मिक उन्माद वाढत आहे. मूकमोर्चातही दहशत जाणवते. नकली देशप्रेम, नकली राष्ट्रवाद आणि नकली पुरोगामीत्व वाढत आहे. गावातली जातीयता संपायला तयार नाही. अशा किती तरी प्रश्नांचा भवताल कवीने कवितेत मांडला आहे. तो मांडताना कवी हताश होत नाही. अंधार नष्ट करणारा सूर्य कवीच्या सोबतीला आहे. त्यामुळे ही कविता संवेदनशीलता वाढवित जाते.
एकूणच ‘तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे..’ हा सारीपुत्र तुपेरे यांचा कवितासंग्रह आंबेडकरी दिशा व्यक्त करतो. दुर्बोध रचना टाळून सम्यक मूल्यांची पेरणी करतो. भारतीय सांविधानिकता जोपासण्याचे आवाहन करतो. जागतिकीकरणातही आपण पारंपरिकता सोडत नाही याचा अत्यंत संयमी धिक्कार करतो. माणूस म्हणून वाढण्याची अपेक्षा व्यक्त करतो. मानवी समाज हा उभ्या नव्हे तर आडव्या रेषेत उभारला जावा याचे स्वप्न पाहतो. प्रज्ञादीप आणि प्रज्ञासूर्याचा सांगाती होण्याचा निर्धार व्यक्त करणारी ही कविता त्यामुळेच महत्त्वाची ठरते.
संदर्भ
१. तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे : डॉ. सारीपुत्र तुपेरे, थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर, पृ.७९, किंमत : १००/-
– डॉ. गिरीश मोरे
प्राध्यापक, मराठी विभाग ,
राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
moregirish12@gmail.com, मोबा.९८२२४९३१७१