अशी झाली माझ्या प्रशिक्षणाची सुरुवात

'मागे वळून पाहताना - १' : इ. झेड. खोब्रागडे (माजी जिल्हाधिकारी)

Spread the love

इ. झेड. खोब्रागडे हे भारतीय प्रशासकीय सेवेतून जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. संविधानामुळे प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर त्यांनी लोकहितासाठी केला. खोब्रागडे यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल अहेरी प्रांतातून झाली. समाजातील सर्वसामान्य लोक-शोषित-वंचित-उपेक्षित समाजघटकांप्रति समर्पित भाव बाळगून खोब्रागडे यांनी निष्ठेने, निडरपणे लोकहिताचे कार्य केले. त्यांची ही आदर्शवत प्रशासकीय वाटचाल “मागे वळून पाहताना” या लेखमालेंतर्गत क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत. यातील हा पहिला भाग नक्की वाचा. – टीम थिंक टँक लाईव्ह

लोकसेवा आयोगाच्या राज्य नागरी सेवा परीक्षेत यश आले आणि उपजिल्हाधिकारीपदी पहिल्याच प्रयत्नात 1982 मध्ये निवड झाली. ओ.एन.जी.सी.ची मुंबई येथील वर्ग 1 ची नोकरी सोडून वर्धा जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी मार्च 1983 ला रुजू झालो. पूर्वी तलाठी यांच्या व्यतिरिक्त तहसीलदार, एस.डी.ओ., जिल्हाधिकारी यांना पहिल्यांदा भेटत होतो. खरं सांगतो, मी उपजिल्हाधिकारी झालो होतो तरी तेव्हा मनात भीती आणि न्यूनगंड होता. या अधिकाऱ्यांबाबत आजही सर्वसामान्य, शोषित, वंचित, दुर्बल समाज घटकांच्या लोकांच्या मनात भीती आहेच. अपवाद वगळता, या अधिकाऱ्यांकडून आपुलकीची, संवेदनशीलतेची वागणूक व मार्गदर्शन मिळतेच असे नाही. बोलणे तसे वागणे घडत नाही.

आर.डी.सी. यांनी प्रशिक्षण कार्यक्रम दिला आणि सोबत एका शिपायाची नेमणूक केली. परंतु, शिपाई माझ्यासोबत नसायचाच. त्याच्या दृष्टीने मी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असल्यामुळे महत्त्वाचा नसावा. तक्रार करणे वगैरे ध्यानीमनी आलेच नाही.

देवळी येथे तलाठी प्रशिक्षण सुरू झाले. वर्धेवरून रोज एस.टी.ने मी ये-जा करायचो. बसायला जागा मिळायची नाही. ब-याचदा तहसील कार्यालयातील तलाठी मीटिंग हॉलमध्ये मुक्काम असायचा. तेथेच झोपायचा. माझे कोणतेही नाते नव्हते तरी अशावेळी एकनाथराव कांबळे हे टिफिन पाठवायचे. खरं तर माझ्यापासून त्यांना कोणताही फायदा, लाभ नव्हता हे माहीत असूनही माझी काळजी घ्यायचे. शक्य आहे, तलाठ्याने सांगितले असावे. महसूल खात्याबाबत तहसीलदार काही सांगायचे नाही. त्यांच्याकडे बसलो की मिठा पान आणि चहा मात्र द्यायचे. त्यांनी प्रशिक्षण देण्याचा प्रश्नच नव्हता. मी एकदम नवीन परंतु उपजिल्हाधिकारी म्हणून मानसन्मान मिळत होता. आपले पद महत्त्वाचे आहे, असे वाटायचे. मनापासून प्रशिक्षण घेत होतो. तलाठ्याने खूप चांगले शिकविले, शेतात घेऊन जात असे, शिकवत असे. तलाठी दप्तर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. खूप चांगले, अभ्यासू व प्रामाणिक तलाठी लाभले होते. त्याचा फायदा शेवटपर्यंत आणि आताही होतो आहे.

या काळात आपुलकी, माणुसकीचे धडे निरीक्षणातून शिकत गेलो. वर्ष 2006 मध्ये जिल्हाधिकारी वर्धा म्हणून रुजू झालो तेव्हा देवळीचे एकनाथराव कांबळे यांची आठवण झाली आणि भेटलोसुद्धा. जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. काही काम असेल तर हक्काने सांगा म्हटलं, तेव्हाही त्यांनी मला कोणतेही काम सांगितले नाही. तलाठ्याची ही विचारपूस केली. भेट झाली. राजस्व निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती. आनंद वाटला. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला अशी माणसं भेटलीत, ती कासमस्वरुपी आठवणीत राहली आहेत.
इतर आठवणी क्रमशः लिहीत राहीन.. ही आठवणींची लेखमाला नक्की वाचत राहा..

– इ. झेड. खोब्रागडे (भा.प्र.से. नि.)

इ. झेड. खोब्रागडे यांच्या अनेक आठवणी आणि प्रशासकीय अनुभव जाणून घेण्यासाठी “आणखी एक पाऊल”, “प्रशासनातले समाजशास्त्र”, ” आपले संविधान” हे महत्त्वपूर्ण ग्रंथ नक्की वाचा. (ग्रंथासाठी संपर्क : 9923756900)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका