अवकाळीग्रस्तांची फरफट, निसर्गासोबतच नेत्यांनीही फटकारले

सोलापूर जिल्ह्यात 40 हजार हेक्टराची झाली माती

Spread the love

जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक २१ हजार ३५६ हेक्टर फळबाचे नुकसान झाले असून त्यामध्ये द्राक्ष व डाळिंब बागांची संख्या जास्त आहे. शासकीय मदतीसाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी, अपेक्षा होती, मात्र त्या सर्वांनी विश्वासघात करत अवकाळीपेक्षाही मोठा झटका दिला आहे.

सांगोला / नाना हालंगडे
अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील ८४३ गावांमधील ४० हजार ७८४ हेक्टर क्षेत्रातील पिकांना मोठा फटका बसला आहे. बाधित शेतकर्‍यांची एकूण संख्या ६९ हजार ५७१ इतकी आहे. जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, माढा या तीन तालुक्यांमध्ये पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक २१ हजार ३५६ हेक्टर फळबाचे नुकसान झाले असून त्यामध्ये द्राक्ष व डाळिंब बागांची संख्या जास्त आहे. शासकीय मदतीसाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी, अपेक्षा होती, मात्र त्या सर्वांनी विश्वासघात करत अवकाळीपेक्षाही मोठा झटका दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात २५ हजार शेतकर्‍यांचे द्राक्षबागांचे ८० हजार एकर क्षेत्र आहे. द्राक्षबागांमध्ये छाटणी होऊन काही ठिकाणी पोंगा व फुलोरा अवस्थेत असलेल्या आणि नव्याने फुटवा फुटण्याचा मोसम असताना, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षघडांमध्ये पावसाचे पाणी शिरून घडकूज रोग पसरला. डावणी, भुरी, करपा, मणीगळ, बुरशी,यांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो टन द्राक्षे अक्षरशः रस्त्यावर टाकून देण्याची वेळ शेतकर्‍यांच्यावर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गीसारख्या द्राक्षबागांमुळे सधन बनवलेल्या गावात खराब झालेली द्राक्षे रस्त्यावर फेकली जात आहेत.अन्य गावांमध्येही हेच चित्र दिसत येते.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याबद्दल शासनाने जाहीर केलेली अनुदानाची रक्कम अलीकडेच शेतकर्‍यांना मिळालेली आहे. मागील संकटातून कसेबसे बाहेर पडत असताना यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टी होऊन, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदाराना पुनश्र्च शासनाकडून अनुदान स्वरूपातून तत्परतेने दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या शिष्टमंडळाने, भाजपचे आ.सुभाष देशमुख, द्राक्ष बागायतदार संघाच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, सचिव गौस अहमद शेख, शंकर येणेगुरे, सकलेश लिंगाडे, बाळासाहेब कस्तुरे, कुंडलिकराव माने, संघाचे व्यवस्थापक दिलीप माने आदीनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन बागायतदारांच्या व्यथा मांडल्या व मांगण्यांचे निवेदनही सादर केले.

शेजारच्या सांगली, पुणे, नगर, नाशिक भागात नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे झाले आहेत. सोलापुरात मात्र पंचनामे झालेले नाहीत. ते पंचनामे तत्परतेने करण्यात यावेत. शेती नुकसानीला शासनाकडून त्वरीत मदत उपलब्ध करून देण्यात यावी. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तडे गेलेल्या द्राक्ष बागांचे बेदाणे बनविण्यासाठी, कांदा चाळ अनुदान योजनेप्रमाणे बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारण्यास अनुदान द्यावे अशा मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

परंतु शासनाच्या निकषानुसार जर एका दिवशी ६५ मिलीमीटर पाऊस झाला तर ती अतिवृष्ठी झाल्याचे गृहीत धरून त्यातील शेती नुकसानीला शासनाकडून मदत मिळू शकते अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नुकसानग्रस्त द्राक्षबाग शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणारे व निवेदनाद्वारे विविध मागण्या करणारे अस्वस्थ झाले आहेत. नुकसान अतिवृष्ठीमुळे नव्हे तर सातत्याने पडलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल अतिवृष्ठीचा निकष बाजूला ठेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानीच्या तुलनेत भरपाई देण्याचा निर्णय शासकीय पातळीवर घेण्यात यावा अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघटनानी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात तालुकानिहाय पंढरपूर, बार्शी, माढा, मंगळवेढा, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला, अक्कलकोट, माळशिळशीरस येथे अनुक्रमे ९६४६,९५७१.७,८५०६,३२६५,३२२५,२६०५,१२४२.४,४८८.५,९३७,८०२,४९६.२, हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.

फळबागा वाचविण्यासाठी खते, रोगप्रतिकारक औषधांचा खर्च दुप्पट तथा एकरी अडीच ते तीन लाखापर्यत गेला आहे.खर्च भागण्यापुरता तरी द्राक्षाला भाव मिळेल का? यांची चिंता आता शेतकर्‍यांना भेडसावत आहे. डाळिंब बागांची स्थितीही केविलवाणी झाली आहे. तेल्या आणि मर रोगांचा प्रादुर्भाव कायम असताना अवकाळी पावसाने संकटात आणखी भर पडली आहे.काढणीला आलेला कांदा, अवकाळी पावसाने भिजल्यामुळेही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिरायत शेतीचे झालेले नुकसान ६०३ हेक्टर क्षेत्रात आहे.

सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीसाठी तातडीने पंचनामे करा,म्हणून मी पालकमंत्री भरणे यांना आठ दिवसापूर्वी भेटलो. पण यांनी काही दाखल घेतली नाही. शेजारच्या सांगली जिल्ह्यात हे पंचनामे सुरू आहेत. अधिकारी एका दिवसात 65 मिलिमीटर पाऊसाची नोंद पाहिजे, अशी अट घालत आहे. पण शेतकरी पुरता झोपला आहे. यासाठी आंदोलनच करणार आहे. – ॲड. सचिन देशमुख, जि. प. सदस्य, सोलापूर

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका