..अन् डिकसळ शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या

चित्रांमधून शिक्षणासह जनजागृतीचा प्रयत्न

Spread the love

सांगोला/नाना हालंगडे
सध्याच्या कोरोना काळात विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान आणि बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 15 व्या वित्त आयोगातून अभ्यासाचं गाव ही संकल्पना राबविण्यात सुरूवात केली आहे. गावातील या शाळेच्या मुक्या भिंतीवर शैक्षणिक अभ्यासक्रम सप्तरंग संगतीत रेखाटले असून, त्यामुळे आता भिंती बोलू लागल्या असून, बालकांना खेळत बागडत शिक्षण घेता यावे म्हणून हा उपक्रम केला असल्याचे मुख्याध्यापक श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले.

कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. याचा लहान मुलांना मोठा फटका बसला आहे. त्यांचे शिक्षण जैसे थे अवस्थेतच राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या हसण्याबागडण्याच्या वयात हसत खेळत शिक्षण मिळावे म्हणून येथील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी एकत्र येत अभ्यासाचे गाव ही नवीन संकल्पना राबविली या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना भिंती चित्राव्दारे शिक्षण दिले जाणार आहे. शाळेच्या भिंतीवर शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक व नैसर्गिक असे संदेश रेखाटले आहेत. याव्दारे शिक्षण आणि जागृती दोन्हीही साधली जाणार आहे.

मुलगा – मुलगी एक समान, द्यावे त्यांन शिक्षण छान, शिक्षणाला नाही बंधने वयाची सजगतेमुळे होईल प्रगती देशाची आता मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीन, सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करीन, किमान एक झाड लावेन व जतन करेन, याच बरोबर बेटी बचाओ, बेटी पढाओ सुविचार, परिपाठ फलक, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, कोरोना जागृती, लसीकरण जागृती, छोटा भिम, निसर्ग सौंदर्य देखावे, प्राणी आपले मित्र, भारताचे संविधान, माझी दिनचर्या, सुर्यमाला, एक ते दहा अंक, संपूर्ण इंग्लिश एबीसीडी, दोन ते तीस पर्यंतचे पाढे, मराठी जोडाक्षरे, तंबाखुमूक्त शाळा फलक, इंग्रजी शब्द, प्राणी, पक्षी, फळे, फुले, विविध सुविचार, शाळा श्रेणी, जलचर प्राणी, स्वच्छतेचे संदेश, झाडे लावा झाडे जगवा सिम्बॉल, अन्न हे पूर्ण ब्रम्ह, इंग्रजी महिणे, वस्तुमान, कोनाचे प्रकार, जलचक्र, विविध चित्रे, संगणकाचे भाग, वाहनाचे चित्रे, वाद्याचे चित्रे, वाहन चालविण्याचे नियम, पाळीव प्राणी, विविध सुविचार व सुभाषिते, आठवड्याचे वार, शिवरायांचे शिष्टमंडळ, समानाथी विरोधार्थी शब्द, ग्रामस्थांनी सनद, पालक शिक्षक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शालेय पोषण आहार मेनू यांच्यासह अन्य व्यंगचित्रे येथे रेखाटलेले आहेत.

सुमारे तीन हजार लोकसंख्येचे डिकसळ हे गाव तालुक्यातील व जिल्हयातील शेवटचे गाव आहे. दोन जिल्हयाच्या सिमेवर हे वसलेले आहे. गावामध्ये सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आता ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून पंधराव्या वित्त आयोगातून एक लाख रूपये या शाळा सुशोभिकरणासाठी देण्यात आले. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून नाविन्यपूर्ण अशा साकारलेल्या संकल्पनेने गावाला शोभा आणलेली आहे. शिवाय जनजागृती ही होत आहे. गावातील शाळेमधील या बोलक्या भिंती उपक्रमातून शिक्षण देत नव्या पिढीला आधार देत आहेत. यातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. तसेच गावाचा चेहरामोहराही बदलणार आहे. त्यामुळे या डिकसळ जिल्हा परिषद शाळेच्या भिंती आता बोलू लागल्या आहेत.

भिंतीवर ऐतिहासिक, पर्यावरण माहितीसह सामाजिक संदेश चितारले असून, चित्रामधूनच शिक्षणासह जनजागृती होत आहे. आता उद्या 15 जूनपासून शाळाही सुरू होणार आहेत. आज 14 जून व उद्या 15 जून रोजी 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही होणार आहे. ही नटलेली, थटलेली शाळा आता सर्वांना हवीहवीशी वाटू लागली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका