अनिष्ट रूढी विरोधात बंडाचा आदर्श : महर्षी धोंडो केशव कर्वे

स्मृतिदिन लेख

Spread the love

भारतामध्ये ज्या काळात संततिनियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता. अशा या काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संततिनियमनाचा महत्त्व पटवून देण्यासाठी र. धो. कर्वे व त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन. त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवाविवाह पासून झाला आणि त्याची परिणीती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले. धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव र. धो. कर्वे हे होत. त्यांनीदेखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.

भारतामध्ये ज्या काळात संततिनियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता. अशा या काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संततिनियमनाचा महत्त्व पटवून देण्यासाठी र. धो. कर्वे व त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले. या काळामध्ये त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं. समाजाकडून त्यांची उपेक्षा केली गेली. सहजासहजी त्यांचा हा विचार समाजाने या काळामध्ये स्वीकारला नाही. मात्र त्यांचा हा विचार नक्कीच स्पृहणीय होता. काळाची पावले ओळखणारे असे हे समाजसुधारक होते.

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली येथील मुरूड या गावी झाला.

शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या १४व्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे १९१४ पर्यंत त्यांनी ही नोकरी केली.

अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. १८९१ ते १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

वयाच्या १४ वर्षीच अण्णांचे लग्न झाले होते. १८९१ मध्ये त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या. त्या वेळी अण्णांचे वय ४५च्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट त्या काळाला मानवणारी नव्हती.

अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता. अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते.

बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु.७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री.

महर्षी कर्वे यांनी १९०७ साली पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.

महर्षी कर्वे यांचे ९ नोव्हेंबर १९६२ रोजी निधन झाले.

संदर्भ : इंटरनेट

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका