अनिकेत आणि मी एकच, आबासाहेबांसोबत माझी तुलना करू नका
डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आवाहन

सांगोला/नाना हालंगडे
भावी आमदार किंवा इतर शब्द माझ्या नावापुढे लिहू नयेत. आबासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व आभाळाएवढे होते. त्यांच्या पायाच्या धुळीएवढाही मी नाही. माझी आबासाहेबांसोबत तुलना करू नका. विधानसभेचे तिकीट कोणाला द्यायचे हे तुम्हाला विचारून पक्ष ठरवेल. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अनिकेत आणि मी एकच आहोत, असे प्रतिपादन पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.
सांगोला तालुक्यातील धायटी येथे शेतकरी कामगार पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब देशमुख यांची रयत शिक्षण संस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा तसेच त्यांच्या सौभाग्यवती डॉ. निकिता देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.
जंगी मिरवणूक
डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे धायटी गावात आगमन होताच सभास्थळापर्यंत त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. वाजत गाजत सभेच्या ठिकाणापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. शेकाप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
लम्पीचा विळखा
यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात लम्पी आजाराने मोठा विळखा घातला आहे. 70 हून अधिक जनावरांचा यामध्ये मृत्यू झाला आहेे. जनावराचा मृत्यू झाल्यास सरकार केवळ तीस हजारांची तुटपंची मदत करते. मात्र हेच जनावर विकत घेण्यासाठी 80 हजार ते एक लाख रुपये खर्च करावे लागताात. सरकारने एवढी अत्यल्प रक्कम देऊन शेतकऱ्यांचा अपमान करू नये. तालुक्यामध्ये 90% लसीकरण झाले असले तरी लम्पी आजाराचा धोका टळला नाही. या आजारापासून आपली जनावरे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत. याबाबत आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फे लवकरच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.
आबासाहेबांसोबत माझी तुलना करू नका
भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेबांचे व्यक्तिमत्व आभाळाएवढे होते. त्यांच्यासोबत माझी तुलना करणे चुकीचे आहे. आबासाहेबांच्या धुळीच्या कणाएवढा हे मी नाही. त्यांचे कर्तृत्व खूप मोठे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझी त्यांच्याशी तुलना करू नये असे मला प्रामाणिकपणे वाटते. मला अजून काम खूप करायचे आहे. ते मी करत राहणार आहे.तुम्हा सर्वांच्या बळावर हे मी काम पूर्ण करेेन. डॉक्टर अनिकेत देशमुख आणि मी आम्ही दोघे एकच आहोत. विधानसभेेची उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल. हे ठरवताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना व तुम्हा सर्वांना पक्ष विचारात घेईल. तुमची मते विचारात घेऊनच ही उमेदवारी घोषित करण्यात येईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अनिकेत व माझ्याबाबत मनात कोणतेही गैरसमज ठेवू नयेत, अशी मी कळकळीची विनंती करतो.
जि.प., पंचायत समितीच्या तयारीला लागा
येत्या काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांना आपणाला तयारीने व ताकतीने सामोरे जायचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तिकिटांचे वाटप करताना सर्व कार्यकर्ते व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहमतीनेच तिकिटांचे वाटप होईल. ही आबासाहेबांची शिकवण आहे. या शिकवणीनुसारच आम्ही सर्वजण काम करीत आहोत. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तुम्हा सर्वांच्या ताकतीने आगामी काळातील सर्व निवडणुका आपण जिंकू.
काही दिवसांपूर्वीच सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवड प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी आमदार या दोघांचीही चांगली साथ लाभली हे विसरता येणार नाही. सांगोला सूतगिरणीची ही वाटचाल अशीच ताकतीने होत राहील.
शहाजीबापूंच्या इलाख्यात ठाकरेंचा बॉम्ब, लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती