अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड
75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. 75 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.
सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते.
सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असे सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे-
बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे