अजिंठा लेण्यांच्या शोधाला २०२ वर्षे झाली पूर्ण
आजच्याच दिवशी लागला होता शोध
भारत देशातील एेतिहासिक वारसास्थळांमध्ये अव्वल असलेल्या औरंगाबादनजिक १०० ते ११५ कि.मी.वर असलेल्या अजिंठा लेण्यांना भेट देणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यात परदेशी नागरिकांची संख्या मोठी आहे.

• ब्रिटिश अधिका-यानं लावला शोध
ही गोष्ट आहे भारत देशावर ब्रिटिशांची सत्ता असलेल्या काळातील. ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात शिकारीसाठी भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिका-यानं एका वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिलं. त्याच्या पाठोपाठ तो हळूहळू या गुंफेमध्ये पोहोचला. स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना आहे २०० वर्षांपूर्वीची. म्हणजेच २८ एप्रिल १८१९ हाच तो दिवस. स्मिथनं येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपलं नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचं आजही अंधुकपणे दिसून येतं. हा शोध लागेपर्यंत हा अमूल्य ठेवा सुमारे दीड हजार वर्षे जगाच्या दृष्टिनं अज्ञातच होता. असं असलं तरी स्थानिकांना याची ओझरती माहिती होती, मात्र त्याचं महत्त्व कळलं नव्हते. आतासारखी तेव्हा माहिती व्हायरल करणारी माध्यमं नव्हती.

• लेणी अज्ञात का राहिली?
भारतातील बौद्ध धम्माची पिछेहाट झाल्यामुळंच ही लेणी दुर्लक्षित झाली. त्या काळात तिथं लोकवस्तीही नव्हती. तिथं घनदाट जंगल पसरत गेलं. ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथनं लेणीचा शोध लावल्यानंतरही पुढील काही वर्षे तिथं काहीच काम झालं नाही. ब्रिटिश सरकार दरबारी याची नोंद झाली. अहवाल तयार झाले. अभ्यास सुरू झाला. १८४४ साली ईस्ट इंडिया कंपनीनं कॅप्टन रॉबर्ट गिलची नियुक्ती लेण्यांच्या संरक्षणासाठी केली. गिल हा मोठा चित्रकार होता. त्यानं लेणीची अवस्था पाहिली. तिथं झाडे-झुडुपे, वटवाघळांची वस्ती, वानरांचा वावर होता. त्यानं प्रत्येक गुंफा स्वच्छ केली. एक एक रहस्य उलगडत गेलं. त्यानं त्या चित्रांची प्रतिकृती काढायला सुरुवात केली. अजिंठ्यावरचा दुर्मिळ चित्रग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहे.

• हिनयान, महायान प्रवाह
मध्ययुगातील अनेक चिनी बौद्धधर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवासवर्णनांत या लेण्यांचा उल्लेख केलाय. जंगलाने वेढलेल्या असल्याने या लेणी अज्ञात होत्या. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण झाली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हिनयान कालखंडात कोरली गेली असावीत, असा अंदाज आहे. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारचा आहे. या लेण्या स्तूप रुपांत आहेत. यातून तथागत गौतम बुद्धांची परंपरा उजागर होते. १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत, असा अंदाज आहे. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसते. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर लेण्यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी नंतर दुर्लक्षित गेली.

• वाटसरुंना मिळत होती विश्रांती
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, मंदिरेसुद्धा रहदारीच्या मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते. यातून विचारांचा प्रसार तर होतच होता शिवाय, वाटसरुनां आसराही मिळत होता.
• चैत्य व स्तूप : बौद्ध विचारांचे प्रतिबिंब
अजिंठा लेण्या ह्या बौद्ध विचारांचं प्रतिक आहेत. लेण्यांची निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारांत लेण्यांची निर्मिती केलीय. या लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते. जातक कथांच्या आधारे यामध्ये प्रसंग कोरल्याचे दिसते. या लेण्या म्हणजे शिल्पकलेचा उत्कृृष्ट नमुना आहेत. यातील चित्रांमधून मानवी भावभावना अगदी ठळकपणे व्यक्त होतात. बौद्ध धम्मात हीनयान आणि महायान हे दोन संप्रदाय होते. हीनयान संप्रदायाच्या लेण्यांमध्ये चैत्यगृह पहायला मिळते, मात्र महायानपंथीय लेण्यात चैत्यगृहांचा समावेश नसतो. चैत्यगृह म्हणजे स्तूप असलेले मंदिर होय.

• युनेस्कोकडून जागतिक वारसास्थानाचा दर्जा
‘युनेस्को’ने १९८३ मध्ये अजिंठा लेणीस जागतिक वारसास्थान म्हणून घोषित केले आहे. या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसास्थळाचा मान आहे. जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली, त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले. चित्र-शिल्पकलेचा नितांत सुंदर अनुभव देण्याऱ्या या लेण्यांमधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पाहावयास मिळतात. अजिंठ्याची निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारांत लेण्यांची निर्मिती केलीय. या लेण्यांमधील भिंती आणि छतांवरील चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते. दहाव्या आणि अकराव्या लेण्यातील सातवाहनकालीन चित्रकलेतून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. एका चित्रात अनेक लोकांचा समूह चित्रित करण्याची या चित्रकारांची हातोटी विलक्षण आहे.

• चित्तवेधक लेण्या
अजिंठा लेण्या ह्या गुंफामध्ये विकसित करण्यात आल्या आहेत. यातील २६ क्रमांकाच्या गुंफेत मोठमोठ्या, सुंदर मूर्ती आढळतात. रंगीत भित्तीचित्रं अपूर्णावस्थेत आहेत. १९ क्रमांकाच्या गुंफेच्या विस्तीर्ण दर्शनी भागात धनुष्याकृती गवाक्षे ओळीनं पहायला मिळतात. तिथं एक संपूर्ण चैत्यगृह असून त्याच्या एका टोकाला उभी बुद्धमूर्ती आहे. येथील बैठी नागराजाची मूर्ती आणि त्याच्यासोबत असलेली स्त्री दासी विशेष नोंद घेण्याजोगी आहे. सोळा क्रमांकाची गुंफा हे एक मोठे विहार आहे. तीत गुंफा बनविणाऱ्या राजाची आणि मंत्र्यांची नावं कोरली आहेत. उपदेश करण्यात मग्न असलेली विशाल बुद्धमूर्ती येथे पाहता येते. त्याच्या आजुबाजूला दासीही आहेत. १, २, १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफांमधील भित्तीचित्रांना कोणतीही हानी न पोहोचल्यानं तेथील चित्रे सुस्पष्ट व सजीव वाटतात. प्रथम क्रमांकाच्या गुंफेत असलेले विख्यात बोधीसत्व पद्मपाणी म्हणजे कोमल दयेचे अदभूत रेखाचित्रण आहे. येथील सुंदर मूर्तीच्या नाजूक हातात कमलपुष्प दिसते.
– डॉ. बाळासाहेब मागाडे (सल्लागार संपादक-थिंक टँक लाईव्ह)