अजनाळेत ग्रामपंचायतीचा अक्षम्य हलगर्जीपणा
लाखो रुपयांचे जलशुद्धीकरण यंत्र बासनात
अजनाळे : सचिन धांडोरे
शासन, प्रशासन हे जनतेच्या पैशावर चालत असते. योजना, नेत्यांचा खर्च सुध्दा जनतेच्या पैशातून होत असतो. जनतेच्या पैशातून मंजूर झालेल्या योजनेची केवळ उदासीनतेमुळे कशी वाट लागू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून अजनाळेतील या प्रकाराकडे पाहता येईल.
अजनाळे गावाला शुद्ध पाणीपुरवठा मिळावा या हेतूने समाज कल्याण सभापती संगिताताई धांडोरे यांनी समाज कल्याण विभागातून लाखो रू.खर्च करुन गावात तिन ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र बसवले. परंतु अजनाळे ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे हे जल शुद्धीकरण यंत्र पाण्याविना बंद अवस्थेत असून त्यामुळे हे जलशुद्धीकरण यंत्र असून अडचण नसून खोळंबा अशी दयनीय अवस्था जलशुद्धीकरण यंत्राची झाली आहे.
तरी ग्रामपंचायतीने याची तात्काळ दखल घेऊन जलशुद्धीकरण यंत्राला पाणीपुरवठा करावा अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे तालुका अध्यक्ष समाधान धांडोरे यांनी केली आहे.
सुजाता ताई देशमुख यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडल्यानंतर यांनी प्रथम गावात विकास कामांचा धडाका लावला. परंतु अवघ्या काही महिन्यातच विकासकामांची गती कमी झाल्याचे पहावयास मिळाले. ग्रामपंचायतीचे योग्य नियोजन व कर्मचाऱ्यावर वचक नसल्यामुळे जलशुद्धीकरण यंत्र गेल्या चार महिन्यापासून धूळखात पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने फक्त नावाच्या पाट्या लावून बिले काढून घेण्यापुरतेच हे जलशुद्धीकरण यंत्र बसवले आहेत का? अशी चर्चा गावामध्ये केली जात आहे.
सरपंच उपसरपंच, व सर्व सदस्यांनी पाणीपट्टी वसुली गावातील पाणीपुरवठा बंद करून केली. परंतु जलशुद्धीकरण गेल्या चार ते पाच महिन्यापासून बंद आहे. तरी सुध्दा साधी चौकशीही केली नाही. ग्रामपंचायतीने तात्काळ जलशुद्धीकरण यंत्राला पाणी पुरवठा करावा अशी मागणी गावातुन जोर धरु लागली आहे.