अखेर “त्या” तमाशा कलावंताला मिळाला न्याय
उपसभापती तानाजी चंदनशिवे यांच्या पाठपुराव्याला यश
तमाशात बालम पाचेगावकर म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच असायची. वय झाले असले तरी तमाशाचा फड ते अजूनही गाजवतात, परंतु मागील वर्षी आलेल्या कोरोनामध्ये सर्व तमाशा फड बंद झाले आणि लोकप्रिय असणाऱ्या वयोवृद्ध बालम पाचेगावकर यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला.
सांगोला / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथील लोक कलावंत बालम कांबळे पाचेगावकर हे तमाशात सोंगाड्याची भूमिका करून सर्वांना पोट धरून हसवणारे.. परंतु कोरोनामध्ये तमाशा फड बंद झाल्याने, पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पाचेगावच्या डोंगर कपारी मध्ये शेळ्या राखण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. ही बाब तासगावचे विनायक कदम यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांसमोर आणली. सांगोला तालुक्यातील वर्तमानपत्रानी देखील या वृत्ताला प्रसिद्धी दिल्यामुळे या वयोवृद्ध कलावंतांची व्यथा, वेदना व दुःख सर्वांपर्यंत पोहोचले. वयोवृद्ध असतानादेखील वेळोवेळी पेन्शनसाठी शासनाकडे त्यांनी पाठपुरावा करूनही हाती काहीच लागले नाही. सांगोला तालुका पंचायत समितीचे तत्कालीन उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य तानाजी चंदनशिवे यांनी याबाबत त्यांच्याकडे चौकशी करून व सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सदरचा परिपूूूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यास मंजुरी मिळूनअखेर दुर्लक्षित असणाऱ्या या वृद्ध कलावंताला पेन्शन मंजूर झाल्याने ते अतिशय आनंदून गेले आहेत.
सांगोला तालुक्यातील पाचेगाव या छोट्याशा गावी राहणाऱ्या बालम कांबळे पाचेगावकर हा वयोवृद्ध कलावंत त्याच्या बालपणापासून वेगवेगळ्या तमाशा मंडळातून सोंगाड्याच्या भूमिका दर्जेदारपणे पार पाडून लोकांचे मनोरंजन करीत होता. नावारूपास आलेल्या अनेक तमाशा फडामध्ये त्यांनी काम केले असून तमाशात बालम पाचेगावकर म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच असायची. वय झाले असले तरी तमाशाचा फड ते अजूनही गाजवतात, परंतु मागील वर्षी आलेल्या कोरोनामध्ये सर्व तमाशा फड बंद झाले आणि लोकप्रिय असणाऱ्या वयोवृद्ध बालम पाचेगावकर यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला.
वय झाल्याने दुसरी कोणतीही कामे करता येत नसल्याने पाचेगावच्या डोंगर कडेकपारीत शेळ्या राखण्याचे काम ते करीत होते. आशा कलावंताची माहिती विनायक कदम व येथील जगदीश कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेऊन या कलावंतांची व्यथा-वेदना आणि शोकांतिका वर्तमानपत्र व सोशल मीडियातून लोकांसमोर आणले. बालम पाचेगावकर यांची ही शोकांतिका तत्कालीन सांगोला तालुका पंचायत समितीचे उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य तानाजी चंदनशिवे यांना समजल्यानंतर त्यांनी पाचेगावकर यांच्याशी संपर्क साधला.
पाचेगावकर यांनी वयोवृद्ध कलावंतासाठी असणाऱ्या पेन्शनसाठी २००८ मध्ये प्रस्ताव पाठवून दिल्याचे सांगितले. परंतु २००८ पासून काहीच झाले नाही असे समजल्यानंतर त्यांच्याकडे असणारी सर्व कागदपत्रांची झेरॉक्स तत्कालीन उपसभापती तानाजी चंदनशिवे यांनी आपल्याकडे घेऊन कलावंतांच्या पेन्शन साठी चा रीतसर व परिपूर्ण प्रस्ताव तयार केला. यासाठी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे व उपसभापती यांचे स्वतःचे शिफारस पत्र प्रस्तावासोबत जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर केला व त्यानंतर सातत्याने या प्रस्तावाचा पाठपुरावा केला. ऑगस्ट २०२० मध्ये सादर केलेला प्रस्ताव अखेर कलावंतांसाठी असणाऱ्या पेन्शन समितीने मागील तीन-चार महिन्यांपूर्वी मंजूर केला.
पेन्शन रुपी मानधन वयोवृद्ध तमाशा कलावंत बालम पाचेगावकर यांचे खात्यावर जमा झाले . कलावंत म्हणून पेन्शन जमा झाल्याने पाचेगावकर अतिशय आनंदित झाले असून त्यांनी फोन करून आपल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून पेन्शन मिळवून दिल्याबद्दल सांगोला तालुका पंचायत समितीचे तत्कालीन उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य तानाजी चंदनशिवे यांचे आभार व्यक्त केले.