‘अखंड होळकरशाही’ : राजघराण्यांच्या 220 वर्षांच्या कारकिर्दीचा वेध

पत्रकार उज्ज्वलकुमार माने लिखित ग्रंथ

Spread the love

सोलापूर येथील माझे स्नेही श्री. उज्वलकुमार माने यांनी नुकतेच “अखंड होळकरशाही ” शिर्षकाचे पुस्तक प्रकाशित केले असून माने सरांनी नुकतेच मला पुस्तक पाठवले आहे. पुस्तक हातात पडताच मुखपृष्ठ, शेवटचे पृष्ठ, पुस्तकाची बांधणी, कागद, मांडणी बघून भरुन पावलो.मुखपृष्ठावर सुंदर असे अखंड होळकरशाही नाव घेवून सुभेदार मल्हारराव महाराज होळकर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर आणि वैभवशाली इंदुरचा राजवाडा घेतलेला आहे तर शेवटच्या पेजवर “प्राहोमेशोलभ्या श्री कर्तुःप्रारब्धात” ही होळकर राजघराण्यांची राजमुद्रा घेतली आहे

तर पुस्तकातून होळकरांच्या गादीवर बसलेल्या एकूण 14 राज्यकर्त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न लेखक श्री. उज्वलकुमार माने यांनी केलेला असून यासाठी त्यांनी दोन वर्षापूर्वी होळकर राज्याच्या इंदुर, महेश्वर, महिदपूर, भानपूरा सह अन्य ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. खरे तर एखादा ऐतिहासिक विषय हाताळतांना घडना घडलेल्या ठिकाणी जावून लेखकाने वास्तव समजून घेतल्यास ऐतिहासिक घटना लिहिताना कोणतेही व्यत्यय येत नाहीत आणि उज्वलकुमार माने यांनी होळकर राजघराण्यांच्या प्रमुख ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. त्याचे फोटो ही त्यांनी पुस्तकात दिलेले आहे.

अखंड होळकरशाही हे होळकर राजघराण्यांच्या 14 राज्यकर्त्यांची एकत्रित माहिती देणारे पहिले ऐतिहासिक पुस्तक असावे असे माझे व्यक्तीगत मत असून यापूर्वी श्री. मधूसुदनराव होळकर यांनी ‘होलकरो का इतिहास’ हा मोठा ग्रंथ लिहिलेला होता. तदनंतर एकत्रित माहिती कुणीही दिलेली आढळत नाही. होळकरांच्या 220 कारकिर्दीचे वर्णन लिहिण्यासाठी हजारो पाने कमी पडतील. मात्र श्री. माने यांनी पुस्तकातून ओळख आणि काही ठिकाणी तपशीलवार माहिती दिलेली आहे. मराठा कालखंडाची सुरवात करताना त्यांनी शहाजीराजे भोसले यांच्यापासून सुरू करीत त्यांनी भोसले, पेशवे, होळकर यांच्यासह औरंगजेब बादशहा, अहमदशहा अब्दाली, सुरजमल जाट, जाँन माल्कम, छत्रसाल बुंदेला, राणोजी शिंदे, रघुजी भोसले, रावरंभाजी निबांळकर, महादजी शिंदे, फत्तेसिंह भोसले यांचाही परिचय पुस्तकातून करुन देण्यात आल्याने पुस्तकाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. यात विविध ऐतिहासिक साधनांचा संदर्भ घेतलेला असून तटस्थपणे मांडणी केलेली दिसते.

अनेक घराण्यांचा इतिहास विशद करताना लेखक झुकते माप देत असतात मात्र इथे तो प्रकार घडलेला नाही एकूण मराठा कालखंडात घडलेल्या राजकीय, सामाजिक घटना आणि त्याचे परिणाम या पुस्तकात वाचायला मिळतात. सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनातील अनेक घटनांचा उल्लेखही प्रस्तुत पुस्तकात असून सदरील पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे वाचनीय असून 283 पृष्ठे असलेल्या या पुस्तकाची किंमत 400 रुपये असून आय.एस.बी.एन नंबर असलेले पुस्तक पुणे येथील यशोदीप पब्लीकेशन्स या संस्थेने प्रकाशित केलेले आहे.

पुस्तकासाठी मदत करणाऱ्या सर्वांचाच लेखकाने विनम्रपणे उल्लेख केलेला आहे. यापूर्वी उज्वलकुमार माने यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहलेले असून त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शक ठरणारे पुस्तकही लिहिलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या अखंड होळकरशाही या पुस्तकास मानाचा मुजरा!

– रामभाऊ लांडे
(अभ्यासक होळकर राजघराणे )
मो. 9421349586

पुस्तकासाठी संपर्क
श्री. उज्वलकुमार माने
मो.9922424619

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका