ज्ञानसूर्याचे दर्शन घडविणारे मामुट्टी

डॉ. आंबेडकरांची अजरामर भूमिका निभावणारे सुपरस्टार मामुट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल स्टोरी

Spread the love

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता मामुट्टी यांनी २१ वर्षांपूर्वी जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटात बाबासाहेबांची सशक्तपणे भूमिका उभी केली होती. शूटिंगदरम्यान ते जेव्हा बाबासाहेबांसारखा पोशाख परिधान करायचे तेव्हा शेकडो लोक त्यांच्या चरणरजाला स्पर्श करून मनोभावे वंदन करायचे. पडद्यावर ज्ञानसूर्याचे मूर्तिमंत दर्शन घडवून त्यांनी व्यक्तिरेखेचे सोने केले. आज, ७ सप्टेंबर मामुट्टी वयाच्या ७३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्ताने…

सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेता मामुट्टी यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात ७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांचे खरे नाव मोहम्मद कुट्टी असे आहे. आपल्या २५ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जवळपास तीनशेपेक्षा जास्त तेलुगू सिनेमात काम केले. धीरम तेंदुन्ना थीरा, रुम्मा, कोट्टायमयय कुंजाचान, कनलकटू, सागरम साक्षी, मिशन ९० डेज असे त्यांचे आजवर गाजलेले चित्रपट आहेत. १९७१ साली ते पहिल्यांदा पडद्यावर झळकले. त्यांच्या व्यावसायिक फिल्म कॅरियरला १९७९ पासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९८२ ते १९९६ या पाच वर्षाच्या कालावधीत नायकाच्या रूपात १५० पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी अभिनय साकारला. मामुट्टींनी हिंदीत बाबासाहेबांच्या जीवनावरील चित्रपटात काम केले. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा चित्रपट त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. चित्रपट देशभर तुफान गाजला. इंग्रजी भाषेतही तो तयार झाला. चित्रपटात १९०१ ते १९५६ असा सुमारे ५५ वर्षाचा काळ घेतला गेलाय.

धम्मदीक्षेच्या चित्रिकरणासाठी उभारलेला शामियाना.

स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यांना कराव्या लागणाऱ्या निम्न दर्जाच्या कामापासून चित्रपटाची सुरुवात होऊन बाबासाहेबांच्या धर्मांतरापर्यंतच्या सर्व ठळक आणि महत्वपूर्ण घटना यात दाखविण्यात आल्या. त्याची प्रभावीपणे मांडणी करण्यात पटकथाकार साहित्यिक दया पवार, य.दि. फडके, पत्रकार अरुण साधू, सुनी तारापोरवाला यांनी अफाट मेहनत घेतली. मामुट्टीच्या श्रेष्ठतम अभिनयासोबतच मोहन गोखले, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी यांची मोलाची साथ, श्रवणीय संगीत, कर्णमधुर गीते आणि अव्वल दिग्दर्शन यामुळे चित्रपट कमालीचा दर्जेदार बनला. ‘कबीरा कहे हे जग अंधा’ हे गीत आजही कानाला हळुवारपणे स्पर्श करून जाते. डॉ. जब्बार पटेलांना १९८९ साली बाबासाहेबांवर चित्रपट तयार करण्याची स्फूर्ती मिळाली. त्यावेळी ते एनएफडीसीसाठी एक लघुपट बनवित होते. बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, हा विषय एका स्वतंत्र चित्रपटाचा आहे. तिथूनच या चित्रपटाच्या जन्माची सुरुवात झाली. डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेत मामुट्टी आहेत हे कळल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. त्यांच्या निवडीमागची कथा फारच रंजक आहे.

धम्मदीक्षेच्या चित्रिकरणासाठी जमलेला जनसमुदाय.

डॉ . जब्बार पटेलांना डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेला शोभण्यासाठी करारी व्यक्तिमत्व असणारा आंबेडकरांसारखाच भारतीय आणि ब्रिटिश उच्चारण्याचा प्रभाव असणारी, बोलीभाषा बोलू शकणारा कलाकार हवा होता. त्यानुसार त्यांनी शे-दोनशे कलाकारांची ऑडिशन घेतली. त्यातून ‘रॉबर्ट डे निरो’ या हॉलिवूडच्या सुपरस्टारला निवडण्यात आले. पण चित्रपटात अमेरिकन इंग्रजी भाषेऐवजी आंबेडकरांच्या तोंडी असलेली भारतीय आणि ब्रिटिश उच्चारणाचा पगडा असलेली इंग्रजी भाषा वापरावी लागणार हे कळताच रॉबर्ट दि निरो शर्यतीतून बाहेर पडले. त्याचवेळी एका मासिकात मामुट्टी यांचे सुरेख छायाचित्र पटेलांच्या नजरेत भरले. जोहरी नजरेने मामुट्टी यांच्या रूपातील हिरा त्यांनी अचूक हेरला. पटेलांनी छायाचित्र ‘स्कॅन’ केले. मामुट्टींची मिशी काढली आणि त्याला काळा चष्मा लावून छायाचित्रात बदल केला. ताबडतोब आपल्या मनातली इच्छा मामुट्टीला बोलून दाखवली. मामुट्टींना पहिल्यांदा हसू आले. कारण आंबेडकरांच्या भूमिकेसाठी मिशी काढावी लागणार होती. ‘आपण पुन्हा कधीतरी एकत्र सिनेमा नक्की करू, पण यावेळी नको’ असे सांगून मामुट्टीने नकार दिला. तेव्हा जब्बारांसमोर त्यांची मनधरणी करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. पटेलांनी चित्रपटाचे महत्व त्यांना समजावून सांगितले. चित्रपटाने आपल्या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.

शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी, दीनदलितांचा कैवारी, प्रकांड पांडित्य, प्रखर देशप्रेम, बुद्धप्रेमी आणि डॉ. जब्बार पटेलांच्या अतीव आग्रहास्तव मामुट्टींनी ही भूमिका स्वीकारायला होकार दिला. मामुट्टींनी पडद्यावर हुबेहूब ज्ञानसूर्याचे मूर्तिमंत दर्शन घडवून त्यांनी आपल्या व्यक्तिरेखेचे सोने केले.

धम्मदीक्षेच्या चित्रिकरणावेळची छायाचित्रे.

सुमारे आठ कोटी खर्च करून हा बहुचर्चित चित्रपट आठ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर २००० साली भारतीय जनतेसमोर आला. हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये सुरुवात करून पुढे एकूण आठ भारतीय भाषांमध्ये तो प्रदर्शित झाला. माझी अभिनय क्षमता आणि डॉ. आंबेडकरांच्या शरीरयष्टीशी जुळणारी माझी शरीरयष्टी पाहूनच मला ही भूमिका दिली असावी, असे मामुट्टी एका मुलाखतीत म्हणाले. डॉ. आंबेडकरांनी लंडनच्या ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठातून शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांची युवावस्थेतील व्यक्तिरेखा अभिनित करताना मला त्याचा निश्चितच विचार करावा लागला. ऑक्सफर्डधर्तीच्या इंग्रजी व्यक्तीकडून विशेष उच्चारणाचे धडे किमान २५ तास तरी गिरवले असतील, असे मामुट्टी म्हणतात.

दलित समाजातील लोक जेव्हा जेव्हा चित्रीकरणात सहभागी होत तेव्हा तेव्हा मामुटीला बाबासाहेबांच्या वेशात पाहून सदगदित व्हायचे. त्यांचे डोळे पाणावत. मामुट्टी म्हणतात, “जेव्हा मी डॉक्टरसाहेबांची भूमिका करीत होतो. सेटवर त्यांच्यासारखी वेशभूषा – रंगभूषा करीत होतो यावेळी शेकडो व्यक्ती माझ्या चरणाला स्पर्श करून मला वंदन करायच्या. तेव्हा मी भारावून जात असे. पण त्याचवेळी माझ्या मनात ही पण जाणीव असे की ते ज्या पायांना वंदन करतात ते पाय जरी माझे असले तरी ते केवळ प्रतीक आहेत. त्यांच्या वंदनेमागे जी श्रद्धा होती ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आहे.”

या चित्रपटातील धम्मदीक्षा सोहळ्याचे शूटिंग नागपुरात १९९७ साली झाले. अंबाझरी गॉर्डनच्या बाजूला भव्य पटांगणात हुबेहूब १४ ऑक्टोबर १९५६ सारखे धम्ममय वातावरण त्या दिवशी तयार झाले होते. लाखो जनसमुदाय यावेळी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होता. या शूटिंगदरम्यान मीसुद्धा उपस्थित होतो. जिकडे – तिकडे ‘बाबासाहेब करे पुकार, बुद्ध धम्म का करो स्वीकार’ या घोषणेने आसमंत निनादला होता. मामुट्टी आणि डॉ. जब्बार पटेल हेलिकॉप्टरमधून घिरट्या मारीत होते. मामुट्टी जसे धम्म मंचकावर विराजमान झाले तसे टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. हा चिरस्मरणीय प्रसंग आजही नागपूरकरांच्या काळजात घर करून आहे.

मामुट्टींना उत्कृष्ट अभिनयाबद्दल तीन राष्ट्रीय पुरस्कार, चार राज्य पुरस्कार आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्याच्या श्रेणीत आठ फिल्म फेअर पुरस्कार आजतागायत मिळाले आहेत. १९९८ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ने गौरवान्वित केले. तिसरा राष्ट्रीय सन्मान त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाने मिळवून दिला. देशातील अनेक संस्थाशी ते एकजीव झाले आहेत. मामुट्टींना अभिनयासोबतच गाड्यांचे प्रचंड वेड आहे. त्यांचेकडे एक दोन नव्हे तर तब्बल ३६९ गाड्या आहेत. काही वर्षापूर्वी त्यांनी देशातील पहिली मारुती ८०० कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या कारसाठी त्यांनी वेगळे गॅरेज बनवले आहे. स्वतः गाडी चालवणे त्यांना अधिक आवडते.

कोचीच्या महाराजा कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. एर्नाकुलम गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास केला. मंजेरीत दोन वर्ष वकिलीचा अभ्यास केला. त्यांचा विवाह १९८० साली सुल्फथ सोबत झाला. त्यांच्यापासून त्यांना मुलगी सुरुमी आणि मुलगा दुल्कार सलमान जन्मास आले. प्रेमळ, दयावान, सौजन्यशील आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचे धनी मामुट्टी आज, ७ सप्टेंबरला वयाच्या ७३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दीर्घायुष्यासाठी मंगलकामना..

-मिलिंद मानकर, नागपूर
मो. 8080335096

आमच्या WhatsAap Group मध्ये ज्वाईन व्हा : https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका