खासगी माध्यमांत करिअरच्या मुबलक संधी : सुरेश वांदिले
विद्यापीठाच्या 'जागर पत्रकारितेच्या' व्याख्यानमालेत केले प्रतिपादन
सोलापूर : प्रतिनिधी
पत्रकारितेत करियरला मोठा वाव आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारितील कार्यालयांत नोकरीच्या संधी उपलब्ध असल्या तरी तेथे म्हणाव्या तेवढ्या जागा उपलब्ध नसतात. मात्र, दुसरीकडे खासगी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांत नोकरीची हमखास व मुबलक संधी मिळते, असे प्रतिपादन ‘लोकराज्य’चे माजी संपादक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संंचालक सुरेश वांदिले यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे पत्रकार दिनानिमित्त ‘जागर पत्रकारितेचा’ या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. शनिवारी माजी माहिती संचालक सुरेश वांदिले व दै. ‘सोलापूर तरुण भारत’चे संपादक विजयकुमार पिसे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित होते. गुगल मिट या अॉनलाईन प्लॅटफॉर्मवरुन हा कार्यक्रम झाला.
सुरेश वांदिले हे ‘माध्यमांतील करियरच्या संधी’ या विषयावर बोलताना पुढे म्हणाले की, देशातील विविध विद्यापीठांकडून, माध्यम प्रशिक्षण देणा-या संस्थांकडून काळानुरुप बदल स्विकारत पत्रकारितेचे प्रशिक्षण दिले जात आहे. फॅशन डिझायनिंग कम्युनिकेशन, स्पोर्टस् जर्नालिझम, बिझनेस कम्युनिकेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल जर्नालिझम असे असंख्य नानाविध अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. त्यातून कौशल्ययुक्त पत्रकार घडवले जात आहेत. कालसुसंगत अभ्यासक्रमांमुळे माध्यमांना असलेली प्रशिक्षित पत्रकारांची गरज पूर्ण होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारितील कार्यालयांत नोकरीच्या संधी उपलब्ध असल्या तरी तेथे म्हणाव्या तेवढ्या जागा उपलब्ध नसतात. मात्र दुसरीकडे खासगी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांत नोकरीची हमखास व मुबलक संधी मिळते. पत्रकारितेच्या क्षेत्रात करियर करु इच्छिणा-यांनी स्वत:तील कौशल्ये विकसित करावीत. वाचन व लेखनाचा व्यासंग वाढवावा. आधुनिक माध्यम युगात तंत्रस्नेही पत्रकारांना खूप मागणी आहे. माध्यमांची ही गरज ओळखून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्ये विकसित करावीत.
संपादकीय पान हा वृत्तपत्राचा आत्मा – विजयकुमार पिसे
दै. ‘सोलापूर तरुण भारत’चे संपादक विजयकुमार पिसे यांनी ‘संपादकीय पानाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पिसे म्हणाले की, संपादकीय पान हा प्रत्येक वृत्तपत्राचा आत्मा असतो. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जी महत्त्वाची बातमी असते ती त्या दिवसातील महत्त्वाची घटना असते. वृत्तपत्राच्या एकूण मजकुरावर जसे त्या त्या दिवसांतील वास्तवाचे, घटना-घडामोडीचे प्रतिबिंब उमटलेले असते, त्याच प्रमाणे संपादकीय पानही वर्तमान स्थितीचे द्योतक असते. संपादकीय पानातील मजकुराची निवड हा संबंधित वृत्तपत्राचा संपादक करीत असतो. बातम्या ह्या वाचकांना माहिती देऊन मोकळ्या होतात. मात्र संपादकीय पान हे वाचकांना मतनिर्मितीच्या प्रक्रियेत मदत करीत असते. संपादकीय पानावरील मजकूर वाचून वाचक आपली मते बनवू शकतात, एवढी ताकद संपादकीय पानाची असते. संपादकीय पानावर अग्रलेख, साईड आर्टिकल, सुविचार, सुभाषिते, वाचकांची पत्रे आदी मजकुराचा समावेश असतो. संपादकीय मजकुराची निवड अतीशय गांभिर्याने केली जाते. लोकमान्य टिळक, प्र.के. अत्रे, निलकंठ खाडीलकर आदी संपादकांनी आपल्या अग्रलेखातून संपादकीय पानांचा दर्जा उंचावला.
यावेळी सुरेश वांदिले व विजयकुमार पिसे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी केले. यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे, ऋषिकेश मंडलिक उपस्थित होते.
रविवारी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत दै. पुढारीचे न्यूज ब्युरो चीफ विजयकुमार देशपांडे हे ‘न्यूज ब्युरोची कार्यपद्धती’ या विषयावर तसेच १२.०० ते १.०० या वेळेत ज्येष्ठ संपादक राजा माने हे ‘राजकीय वार्तांकन’ या विषयावर बोलतील.