सांगोला आगारातील 25 कर्मचारी निलंबित

15 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठविले

Spread the love

सांगोला : नाना हालंगडे
राज्यात एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सरकारकडून चिरडण्याचा प्रयत्न होत असताना सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई सांगोला येथे करण्यात आली आहे. सांगोला आगारातील तब्बल 25 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर इतर 15 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शेकाप नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन निलंबित कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पगारवाढ आणि पगाराची हमी, विलागिकरण या प्रमुख मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यशासनाने पगारवाढ केली आहे. तरीपण कामावरती हजर न राहणाऱ्या कर्माच्याऱ्यावर निलंबनाची कारवाई करा असे, आदेश दिले आहेत.

त्याअनुषंगाने सांगोला आगारातील 25 जणांना निलंबनाची कारवाई करण्यात आली असून,15 जणांचे निलंबनाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविले आहेत, अशी माहिती आगारप्रमुख पांडूरंग शिकारे यांनी दिली.

विलागिकरणासाठी राज्यभर एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून, सांगोला आगारातील 330 कर्मचारी यामध्ये उतरले आहेत. पगारवाढ केल्याने वरिष्ठांच्या आदेशाने कामावर हजर राहा म्हणून काहीजण हजर राहत आहेत. 290 कर्मचारी कामावर येत नाहीत. त्याअनुषंगाने या आगारातील 25 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 15 जणांवर कारवाई करा म्हणून, वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविले आहेत. यामध्ये चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सांगोला आगारात 330 कर्मचारी आहेत. सर्वांनीच संपात सहभाग घेतल्याने एसटी सेवा ठप्प झाली आहेत. त्यामुळे आगाराचा 1 कोटी 25 लाख रुपयाचा तोटा झालेला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कामावर हजर राहा, म्हणून सक्त सूचना असताना हे कर्मचारी हजर राहत नाहीत, त्यामुळे हे कारवाईचे सत्र असे सुरूच राहणार आहे, अशी माहिती आगारप्रमुख पांडूरंग शिकारे यांनी दिली.

डॉ. देशमुख यांच्याकडे कर्मचाऱ्यांची धाव
निलंबनाचे आदेश प्राप्त होताच निलंबीत कर्मचाऱ्यांनी शेकाप नेते तथा भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी डॉ. देशमुख यांना या प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.

आगारप्रमुख हे जाणून बुजून कारवाई करीत आहेत. जे आगारातील पुढारी आहेत, पुढे पुढे करतात. त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. आंदोलनात आमचे 45 सहकारी गेले.त्यामुळे दुखवठा म्हणून आम्ही कामावर येत नाही. (-एक निलंबित कर्मचारी)
वरिष्ठांच्या आदेशाने एसटी सेवेसाठी रोज कर्मचाऱ्यांच्या डूट्या लावल्या जात आहेत. पण आगारातील 330 कर्मच्याऱ्यापैकी 30 कर्मचारीच हजर राहत आहेत. त्यामुळे आगारातील 25 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. अजून 15 जणांच्या निलंबनाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविले आहेत. या संपामुळे आगाराला 1 कोटी 25 लाख रुपयांचा फटका बसलेला आहे. त्यामुळे जे कोणी गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई ही होतच राहणार आहे. – पांडुरंग शिकारे (सांगोला आगार प्रमुख)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका