बौध्द असल्याचा अभिमान बाळगा, जनगणनेत बौध्द असाच उल्लेख करा

राजरत्न आंबेडकर यांचे सोलापुरात आवाहन, जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

Spread the love

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : देशात होणाऱ्या जनगणनेत जातीचा कोणता उल्लेख करावा या संभ्रमात समाजबांधव आहेत. जोपर्यंत जातींचा उल्लेख करत राहाल तोपर्यंत जाती नष्ट होणार नाहीत. जातीचा उल्लेख केला नाही तर आरक्षण व राजकीय जागा कमी होतील, असे अंदाज तज्ज्ञ मांडत आहेत. मात्र त्यात तथ्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार पुढे जायचे असेल तर आपली ओळख बौद्ध म्हणून करा. छोट्या मोठ्या आरक्षणाच्या मागे लागून आपली अस्मिता गहाण टाकू नका. बौध्द असल्याचा अभिमान बाळगा, जनगणनेत बौध्द असाच उल्लेख करा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले.

सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी बोलताना राजरत्न आंबेडकर. यावेळी मा. सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके.

राजरत्न आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. सोलापुरात त्यांच्यासमवेत माजी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके, विजय पगारे, जगदीश मागाडे आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेच्या प्रारंभी बुद्धवंदना घेण्यात आली.

गावनिहाय बौद्धांची आकडेवारी संकलित करा
आंबेडकर पुढे म्हणाले की, जनगणनेत बौद्धांची गाव, तालुका व जिल्ह्यानिहाय लोकसंख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. ही माहिती देशपातळीवर तयार होईल. ही माहिती प्रत्येक बौद्ध व्यक्तीला कळाली पाहिजे, यासाठी या मोहिमेत प्रत्येकाने सहभाग नोंदवला पाहिजे. प्रत्येक गावनिहाय बौद्धांची आकडेवारी आपल्याजवळ पाहिजे. ते काम कार्यकर्त्यानी करावे. त्यावरून आपली लोकसंख्या किती आहे, हे कळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा : बौध्द असल्याचा अभिमान बाळगा, जनगणनेत बौध्द असाच उल्लेख करा

धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहा
२०२१ च्या जनगणनेबाबतही अनेक संभ्रम आहेत. जनगणनेचे अर्ज ऑनलाइन भरले जाणार आहेत. त्या अर्जात धर्माचा कॉलम आहे. त्यामध्ये बौद्ध लिहा. सरकारने त्यास एक उपप्रश्न तयार केला आहे. अनुसूचित जातीचे आहात की नाही? या प्रश्नाला होकार दिल्यास तिसरा प्रश्न तयार होतो. अनुसूचित जातींमध्ये कोणती जात? जातीच्या कॉलममध्ये आपली जात लिहावी लागणार आहे. त्यामुळे बौद्ध महार, बौद्ध मांग असा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे धर्माच्या रकान्यात बौद्ध असा उल्लेख केल्यास आपली ओळख बौद्ध अशीच गणली जाईल.

राजरत्न आंबेडकर हे पंढरपूरकडे मार्गस्थ होताना रस्त्यावर एका आंबेडकरप्रेमी चहा विक्रेत्याने त्यांचे स्वागत केले. यावेळी मा. सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके आदी.

पंतप्रधानांनाही बौद्ध राष्ट्रांच्या ताकदीचा अंदाज
भारताला बौद्ध राष्ट्रच मदत करू शकतो, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी आषाढ पौर्णिमेच्या एका भाषणात केले होते. त्यामुळे पंतप्रधानांनाही बौद्ध राष्ट्रांच्या ताकदीचा अंदाज आला आहे. आपण बौद्ध झालो तर, आपल्या शिक्षण, आरोग्याची व्यवस्था बौद्ध राष्ट्रांच्या मदतीने करून घेऊ शकतो. जागतिक पातळीवर बौद्ध राष्ट्रे इतर बौद्ध राष्ट्रांना मदतीस तयार आहेत. देशात बौद्धांची लोकसंख्या मुळातच अधिक आहे. ती जनगणनेतून जगासमोर आणण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.

राजरत्न आंबेडकर यांचे ठिकठिकाणी दुकानदारांकडून स्वागत झाले. यावेळी मा. सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके आदी.

धम्माचे काम राजकीय कामासारखे नाही
बौद्ध धम्म प्रसाराचे काम हे राजकीय कामासारखे नाही. निवडणुका आल्या की राजकीय काम सुरु होते. बौद्ध धम्म प्रसाराचे काम हे दिवसातील चोवीस तास अखंडपणे चालणारे आहे. त्यामुळे बौद्ध धम्माचा प्रसार करणाऱ्यांनी नेटाने कामास लागावे.

राजरत्न आंबेडकर हे पंढरपूरकडे मार्गस्थ होताना शिवप्रेमींकडून त्यांचे स्वागत झाले. यावेळी मा. सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके आदी.

महिलाही मंगल परिणय विधी लावू शकतात
तथागत बुद्धांनी कधीही स्त्री-पुरुष भेदभाव केला नाही. समानतेचा हा त्यांचा संदेश आपण विसरत आहोत. सद्यस्थितीत पुरुष ज्याप्रमाणे मंगल परिणय विधी लावतात त्याचप्रमाणे स्त्रियांनीही मंगल परिणय विधी लावावेत. याची अंमलबजावणी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी करावी.

बाबासाहेब म्हणतात, आरक्षण आयुष्यभर मिळणार नाही
१५ ऑक्टोबर १९५६ रोजीच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा प्रसाराची ब्लू-प्रिंट दिली आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात, हे आरक्षण दहा किंवा २० वर्षांपर्यंतचे आहे. हे काय आयुष्यभर मिळणार नाही. जो पती जगेल की नाही, याची शाश्वती नाही, त्या पतीचे मंगळसूत्र घालण्यात काय अर्थ? छोट्या मोठ्या आरक्षणाच्या मागे जाऊन स्वत:ची ओळख महार, मांग, चांभार करण्याऐवजी बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्या मार्गाने गेले पाहिजे.

कोणतेही पद कायमस्वरूपी नाही
बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय, राज्य अथवा जिल्हा कमिटीमधील सर्व पदे कायमस्वरूपी नाहीत. ती ठराविक काळानंतर बदलतील. त्यामुळे कोणीही केवळ पदासाठी काम करू नये. मी सुद्धा माझे राष्ट्रीय अध्यक्षपद बदलण्याची विनंती राष्ट्रीय कमिटीकडे केली आहे. मात्र कोरोनाकाळामुळे ती प्रलंबित आहे. जिल्हा पातळीवर महिला कमिटी, संस्कार कमिटी, संरक्षण (समता सैनिक दल) कमिटी, पर्यटन (धम्मसहल व अभ्यास) अशी चारस्तरीय कमिटी असतील.

देशात साकारणार बौद्ध विद्यापीठ
देशात बौद्ध धम्माचा अभ्यास, संशोधन, प्रसार करण्यासाठी बौद्ध विद्यापीठ साकारले जात आहे. ६० एकर जागेवर हे बौद्ध विद्यापीठ असेल. याद्वारे शाळा, महाविद्यालये सुद्धा सुरु केली जातील. त्यातील अभ्यासक्रम बौद्ध धम्माला पुढे घेऊन जाणारा असेल. हे बौद्ध विद्यापीठ बौध्दांची अस्मिता बनेल.

राजरत्न आंबेडकर यांनी माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी जावून त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख, पोपटराव देशमुख, नातू डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी चर्चा केली. यावेळी सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा.गौतमीपुत्र कांबळे, माजी सहा.पोलीस आयुक्त भरत शेळके आदी.

भाई गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
राजरत्न आंबेडकर यांनी दुपारी माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी जावून त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख, पोपटराव देशमुख, नातू डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी चर्चा केली. यावेळी सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा.गौतमीपुत्र कांबळे, माजी सहा.पोलीस आयुक्त भरत शेळके, बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दीपक बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, चंचल बनसोडे, गोपाल लांडगे, सुनील काटे, वकील सुनील जगधने, सुनील कांबळे, सुरज बनसोडे, तानाजी बनसोडे आदी उपस्थित होते.

सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना राजरत्न आंबेडकर. यावेळी मा. सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके.

सांगोला भीमनगर येथे समाजबांधवांना मार्गदर्शन
राजरत्न आंबेडकर यांनी सायंकाळी सांगोला भीमनगर येथील बुध्दविहारात झालेल्या कार्यक्रमात समाजबांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी राजरत्न आंबडेकर म्हणाले, आजही संविधानाला विरोध केला जात आहे. जातीयवादी व्यवस्था आजही चालू आहे. याला रोखण्यासाठी बहुजन बांधवानी एक होण्याची गरज आहे. संविधान वाचले तर देश वाचणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बौध्द विचारांना खूप महत्व आहे.

सांगोला भीमनगर येथे समाजबांधवांना मार्गदर्शन करताना राजरत्न आंबेडकर. यावेळी सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा.गौतमीपुत्र कांबळे, माजी सहा.पोलीस आयुक्त भरत शेळके आदी.

यावेळी माजी सहा.पोलीस आयुक्त भरत शेळके, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, बांधकाम समितीच्या सभापती अप्सरा ठोकळे, माजी नगरसेविका विजयाताई बनसोडे, रेश्माताई बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दीपक बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, चंचल बनसोडे, गोपाल लांडगे, सुनील काटे, वकील सुनील जगधने, सुनील कांबळे, सुरज बनसोडे, तानाजी बनसोडे आदी उपस्थित होते.

बौद्ध असाच उल्लेख करा : प्रा. गौतमीपुत्र कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती करून आपल्याला केवळ माणसात आणले असे नव्हे तर आधुनिक जगाचे आदर्श सदस्य बनवले. त्यांनी गुलामगिरीतून मुक्त होण्याचे तत्वज्ञान मांडले. मात्र आज सर्वांना पुन्हा एकदा जातीत बांधण्याचे काम जनगणनेद्वारे होत आहे. धर्मांतरीत बौद्धांनाही आपली पूर्वाश्रमीची महार, मांग जात लिहिण्यास भाग पाडले जात आहे. १९९० साली धर्मांतरीत बौद्धांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवताना एक चूक झाली. ती म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मही अनुसूचित जातीत गृहित धरण्यात आला. त्यामुळे आंबेडकरी जनता, कार्यकर्ते यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जणगणनेत धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहावे. जातीच्या रकान्यात बौद्ध लिहू नये. असे लिहिल्यास आमदारकी, खासदारकी, शिक्षण किंवा नोकरीत कोणतेही संवैधानिक हक्क डावलले जाणार नाहीत. जनतेतील संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही सेक्युलर मुव्हमेंटतर्फे लवकरच गोलमेज परिषद घेत असून त्यात समाजातील वकिल, अभ्यासक, कार्यकर्ते यांना बोलावले जाईल. या परिषदेतून आम्ही खरी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडू, असे प्रतिपादन सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे केले.

आदरणीय राजरत्न आंबेडकर.
संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी तरुण मंडळ पदाधिका-यांकडून राजरत्न आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी सांगोला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजरत्न आंबेडकर यांनी अभिवादन केले. संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी तरुण मंडळाने राजरत्न आंबेडकर यांचा विशेष सत्कार केला. यावेळी राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर व बांधकाम समितीच्या सभापती अप्सरा ठोकळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, शिवप्रेमी तरुण मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब भाकरे, इंजि. रमेश जाधव, बाळासाहेब शिंदे, कमरुद्दीन काझी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी आभार मानले, सूत्रसंचालन वकील आनंद बनसोडे यांनी केले.

सोलापूर जिल्हा कार्यकारिणीही जाहीर
सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत राजरत्न आंबेडकर यांनी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीही जाहीर केली. नावे पुढीलप्रमाणे : राजश्री गायकवाड (जिल्हाध्यक्ष), भय्यासाहेब बनसोडे (उपाध्यक्ष, अकलूज), रामजी गायकवाड (सचिव, दक्षिण सोलापूर), दिपाली लोंढे (कोषाध्यक्ष, सोलापूर), दत्ता कांबळे (तालुकाध्यक्ष, अक्कलकोट), दिलीप गायकवाड (संघटक, दक्षिण सोलापूर), सिद्धार्थ थावरे (तालुकाध्यक्ष, अकलूज), अजय शेवडे (संघटक, मंगळवेढा), सचिन बनसोडे (तालुका उपाध्यक्ष, अक्कलकोट), शुभांगी गायकवाड (उपाध्यक्ष, बार्शी), ज्ञानेश्वर गवळी (अध्यक्ष, उत्तर सोलापूर), सचिन उबाळे (संघटक, सांगोला), जगन्नाथ शिंदे (अध्यक्ष, माढा).

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या

गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ डिकसळमध्ये साकारणार ‘भाईंची देवराई’; १० ऑगस्ट रोजी शुभारंभ

डॉ. आंबेडकर आणि धुळ्यातील लांडोर बंगला

सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ

चिमुकलीचे गीत ऐकून बाबासाहेब झाले होते मंत्रमुग्ध

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका