ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

“प्रिय कब्बू… सुषमा अंधारे यांची लेकीसाठी भावूक पोस्ट”

विभक्त पतीच्या गलिच्छ राजकारणाचा संदर्भ

Spread the love

“बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!”

थिंक टँक न्यूज नेटवर्क
शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ तथा आंबेडकरी नेत्या सुषमा अंधारे यांनी काही वेळापूर्वीच आपल्या लाडक्या लेकीसाठी अत्यंत भावनिक अशी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या लेकीचे बालपण पुन्हा एकदा जागे केले आहे. हे सांगत असतानाच आपल्याला जेव्हा विरोधक नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शेवटचा मार्ग म्हणून चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात असे सांगत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचा संदर्भ दिला आहे.

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज दिवसभर प्रसिद्धी माध्यमांमध्ये वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे यांच्या बाबतच्या बातम्यांचा बोलबाला होता. दिवसभर सुषमा अंधारे यांनी हा सर्व माहोल पाहून आपले पूर्वाश्रमीचे आयुष्य आठवले. त्यांची लाडकी लेक कब्बू हिच्यासाठी अत्यंत भावनिक अशी मनाला साद घालणारी फेसबुक पोस्ट लिहिली.

या फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणतात की…

प्रिय कब्बू,

तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं.. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता.

पण अख्ख कुटुंब पाठीशी उभा राहिलं.. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले.

बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!

तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात.

बाबासाहेब लिहितात, ” जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील.

पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..!
भय , भ्रम , चरित्र हत्या हि मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा ” : डॉ बाबासाहेब आंबेडकर”
असे सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिली आहे.

सुषमा अंधारे यांचे पूर्वाश्रमीचे पती एडवोकेट वैजनाथ वाघमारे आज अचानक मीडियाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आले. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळेच मी सुषमा अंधारे यांच्या सोबत घटस्फोट घेतला. येत्या चार दिवसात सुषमा अंधारे यांच्या विविध कारनाम्यांचा मी पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश करणार असल्याची घोषणाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या लेकीसाठी अत्यंत भावनिक अशी पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. आपल्याला जेव्हा नामोहरम करायचे असते तेव्हा विरोधक वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतात. शेवटचे अस्त्र म्हणून चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात असे सांगत सुषमा अंधारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका विधानाचा संदर्भ देत आपल्या चाहत्यांना भावूक साद घातली आहे.

“सुषमा अंधारे राष्ट्रवादीत गेल्यानेच मी घटस्फोट घेतला”

शहाजीबापूंच्या इलाख्यात ठाकरेंचा बॉम्ब, लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका