निर्भीड आणि आक्रमक पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाळासाहेब मागाडे यांचा महत्त्वपूर्ण लेख

Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता ‘समुहाकडून समाजाकडे’ वाटचाल करण्याच्या विचारसरणीवर आधारलेली असल्याचे स्पष्ट दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख घटनाकार, घटनातज्ञ, कायदेपंडित, अर्थतज्ञ अशा अनेक अंगांनी जगाला परिचित आहे, परंतु, पत्रकार डॉ. आंबेडकर म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही काही पोटभरू किंवा प्रचारकी पत्रकारिता नव्हती, तर तिला समाजोद्धाराचे पर्यायाने राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान लाभलेले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे होते. त्यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून ओळखली जाते. धर्मशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक, द्रष्टे विचारवंत, विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी केलेली पत्रकारिता आजही प्रेरक ठरेल अशीच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता ‘समुहाकडून समाजाकडे’ वाटचाल करण्याच्या विचारसरणीवर आधारलेली असल्याचे स्पष्ट दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख घटनाकार, घटनातज्ञ, कायदेपंडित, अर्थतज्ञ अशा अनेक अंगांनी जगाला परिचित आहे, परंतु, पत्रकार डॉ. आंबेडकर म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही काही पोटभरू किंवा प्रचारकी पत्रकारिता नव्हती, तर तिला समाजोद्धाराचे पर्यायाने राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान लाभलेले होते. या बाबीकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकतर जाणीवपूर्वक कानाडोळा केला किंवा पारंपरिक मानसिकतेमुळे या पत्रकारितेची दखल घ्यावी, असे त्यांना वाटले नसावे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.

विषमतावादी व्यवस्थेतून बहिष्कृत वर्गाला सामाजिक उन्नतीसाठी प्रवृत्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता जाज्वल्य व आक्रमक होती. त्यांच्या विविध अग्रलेखातून तसेच लेखांतून हे स्पष्टपणे दिसून येते. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ”बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती तसेच बिनमोली संपादकी काम करण्यास स्वार्थ्यत्यागी असा दलितातील माणूसही लाभला नाही. बहिष्कृत भारताच्या संपादकाच्या प्रौढ लिखाणास दबून गेल्याने म्हणा किंवा सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे म्हणा, बाहेरच्या लोकांचा त्यास मिळावा तितका पाठिंबा मिळाला नाही. अशा स्थितीत ‘बहिष्कृत भारत’चे 24-24 रकाने लिहून काढण्याची सारी जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली.”

थोडक्यात, बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ ही पत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. या पत्रांमधून डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेतील आक्रमकता” या विषयावर त्यामुळेच मांडणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरा म्हणजे समाज सुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत दुसर्‍या बाजूला माणसाला माणूसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांच्या पत्रातून केला जात होता. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला ‘मूकनायक’च्या रूपाने नवा आवाज मिळाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी केलेली मांडणी ही देशाला नवी दिशा देणारी होती. त्यांच्या अग्रलेखांतून त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेवर कोरडे ओढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता
डॉ. बाबासाहेब यांनी ‘मूकनायक’, ‘जनता’, ‘प्रबुध्द भारत’, ‘समता’ या नियतकालिकांतून निर्भीड, कणखर, झुंजार पत्रकारिता केली. डॉ. आंबेडकरांनी ‘मूकनायक’ (1920), ‘बहिष्कृत भारत’ (1927), ‘जनता’ (1930) आणि ‘प्रबुद्ध भारत’ (1956) अशा चार वृत्तपत्रांची निर्मिती केली. डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता ही विषमतेच्या तत्त्वांविरूद्ध होती. स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या मूल्यांचा विचार डॉ. आंबेडकरांनी समाजपरिवर्तनाच्या कारणासाठी केलेल्या पत्रकारितेत मूलभूत असाच होता. या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक पुनर्रचना करून एकसंघ समाज स्थापन करणे हे डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत होते. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनामध्ये समता, बंधूता, न्याय या मूल्यांची भर पत्रकारितेतही घातली आहे. दलित-शोषितांच्या भावभावनांना वाचा फोडण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या वृत्तपत्रांचा जन्म झाला.

मूकनायक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. त्याद्वारे मूक असलेल्या दलित समाजाला जाणीव जागृती निर्माण करून बोलते केले. ‘मूकनायक’च्या पहिल्या अंकात डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविल्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वृत्तपत्रासारखी अन्य भूमीच नाही.’

बहिष्कृत भारत : 19 व 20 मार्च 1927 रोजी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन महाडला झाले. ही परिषद झाल्यापासून तेरा दिवसांच्या अवधितच हाती आलेल्या निधीच्या बळावर ‘बहिष्कृत भारत’ हे पत्र सुरू केले. ‘पुन:श्‍च हरि: ॐ’ अशा अग्रलेखाने या अंकाची सुरूवात झाली. महाडचा सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी व पर्यायाने दलितांची वैचारिक जागृती करण्यासाठी ‘महाड धर्मसंगर’ व ‘हिंदूंची, सरकारची व अस्पृश्यांची जबाबदारी कोणती’ याविषयीचे विवेचन या तीन अग्रलेखांतून केले. माणुसकीच्या सत्याग्रहासाठी प्रसंगी हिंसा होणे अयोग्य असले तरी आत्मसंरक्षणासाठी भ्रूणहत्येत कोणीच हरकत घेत नाही. या सर्व वादावर आधारित ‘सत्याग्रहाची सिद्धी’ व ‘पर्वती सत्याग्रह’ हे अग्रलेख लिहिले. ‘बहिष्कृत भारत’मध्ये अग्रलेख, आजकालचे प्रश्न, प्रासंगिक विचार, विचारविनियम, विविध विषयसंग्रह, आत्मपरिचय, आमची जखम, अभिप्राय, वर्तमानसार’ आदी सदरे होती.

जनता व प्रबुद्ध भारत : ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ ही दोन्ही पाक्षिके बंद पडल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी समता संघाची स्थापना केली. त्यांनी या संस्थेमार्फत ‘समता’ या पाक्षिकाचे प्रकाशन केले. पुढे ‘जनता’चे ‘प्रबुद्ध भारत’ असे 4 फेब्रुवारी 1956 रोजी नामांतर करुन डॉ. आंबेडकरांनी ‘प्रबुद्ध भारत’चे अंक प्रकाशित केले. बुद्धांचा व विकासाचा मंत्र देणाऱ्या गौतमबुद्धांची कमळावर विराजमान असलेली प्रतिमा ‘प्रबुद्ध भारत’च्रा मुखपृष्ठावर होती. बौद्ध धम्म स्वीकारासंबंधीचे लेख, बुद्ध जीवनावरील कथा, बुद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा यातून मोठ्या प्रमाणात झाल्राचे दिसून येते. डॉ. आंबेडकर जयंती विशेषांक, बुद्ध जयंती विशेषांक, शाहू जयंती विशेषांक असे विशेषांक काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेतील आक्रमकता
बाबासाहेबांचे स्फुटलेखन आक्रमक असे. अनेक लेख प्रासंगिक असले तरी ते चिंतनशील आहेत. बाबासाहेब या लेखांना चपखल शिर्षक देत असत. कम्युनिष्ट क्रांतीला त्यांनी ‘झटपट क्रांती’ असे संबोधिले. ‘देव पुजाऱ्यांचा की भक्तांचा’, ‘अफगाणिस्तानातील भिक्षुकशाही’, ‘हिंदूंचे समाजशास्त्र’, ‘हिंदी राजकारणाचा विचका’, ‘क्रांतीची उपासना की, देशाचे रक्षण’, ‘समाजसमतेचे विरोधक’ आणि ‘अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी’ अशी अनेक चपखल शीर्षके त्यांच्या लेखांमध्ये दिसून येतात. त्यांचे स्फुटलेखन मर्मभेदी असे. आपल्या लेखांत बाबासाहेब लोकम्हणी व लोकवाक्प्रचारांचा उपयोग हमखास करीत. अर्थवाही शब्दरचना आणि ठोस मनाला भिडणारी लेखनशैली, यामुळे ‘मूकनायक’ गाजले.

समाजाच्या वेदना मांडून विद्रोह प्रकट करण्यासाठी ‘मूकनायक’ पाक्षिकाचा 31 जानेवारी, 1920 रोजी जन्म झाला. मूक अशा अस्पृश्यांचे नायकपण-नेतेपण आपण स्वीकारल्याचे मूकनायक काढून 1920 साली त्यांनी जाहीर केले. मूकनायकाने त्यांच्या पुढील घणाघाती चळवळीची नांदीच जणू म्हटली. यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते. त्यामुळे पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये ते म्हणतात की, ”आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.

अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवगत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारुने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये.” या त्यांच्या मांडणीतून आक्रमकपणा दिसून येतो.

तुकारामाच्या अभंगांचा प्रभाव
डॉ. आंबेडकरांवर संत तुकारामाच्या अभंगांचा प्रभाव असल्याचे दिसते. संत तुकाराम हे मुळात विद्रोही विचारांचे संत असल्याने बाबासाहेबांच्या विचारातही तीच आक्रमकता येत असल्याचे दिसते.
काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||1||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||

मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर वरील बिरुदावली छापली जात होती. तुकारामांच्या या ओळी त्यांनी बिरुदासाठी निवडाव्या यात केवढे तरी औचित्य आहे. वृत्तपत्राचे ‘मूकनायक’ हे नावही त्यांना ”नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण” या चरणावरुन सुचले आहे हे निश्चित. राजकीय पत्रकारितेचे युग महाराष्ट्रात ‘केसरी’ने सुरू केले, तर ‘मूकनायक’ ने सामाजिक अन्याय वेशीवर टांगायला प्रारंभ करून दुसरे युग सुरू केले. डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेत धर्मसंस्था, धर्मविचार आणि जातीची उतरंड याचा मागोवा घेतला. हिंदु समाजव्यवस्था आणि अस्पृश्यांच्या इतिहासाची चिकित्सा केली. महाड सत्याग्रह, पर्वती सत्याग्रह, महारवतन, गिरणी मालक व कामगार प्रश्‍न, खोतीचे प्रश्न, गुलामगिरी असे अनेक विषय हाताळले.

‘बहिष्कृत भारत’ नावाचे पाक्षिक ते स्वत: संपादित करत असत. दुसऱ्या अंकापासून ‘बहिष्कृत भारत’वर बिरुदावली म्हणून ज्ञानदेवांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.
आता कोंदड घेऊनि हाती |आरुढ पांइये रथी |
देई अलिंगन वीरवृत्ती |समाधाने |
जगी कीर्ती रुढवी | स्वधर्माचा मानु वाढवी |
इया भारापासोनि सोडवी | मेदिनी हे |
आता पार्थ नि:शंकु होई | या संग्रामा चित्त देई |
एथ हे वाचूनि काही | बोलो नये |
आता केवळ संग्राम |संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही |
अशी युद्धप्रेरणा डॉ. आंबेडकर प्रारंभापासून अस्पृश्यांमध्ये चेतवीत होते. त्यांच्या या मांडणीतून आक्रमकपणा दिसून येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बहिष्कृत भारत’मधील मजकूर हा महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना, संस्था व व्यक्ती यांच्याकडून आलेली पत्रके यावरही आधारित असायचा. सामाजिक सुधारणेच्या बाजूचे व विरोधातील पत्रकेही ते छापत. त्या पत्रावरील संपादक या नात्याने स्वत: मतही व्यक्त करीत असत. सामाजिक सुधारणेच्या विरोधातील पत्रके छापल्यानंतर त्या पत्रकातील वैचारिक भिन्नता असलेल्या मतांचे ते खंडन करीत व सामाजिक सुधारणेच्या बाजूने असलेल्या पत्रकावर ते समर्थनार्थ मत व्यक्त करीत असत. ‘बहिष्कृत भारत’ चालविणे म्हणजे सामाजिक ऋण फेडण्यासारखेच आहे, असा विचार त्यांनी मांडला.

या पत्रात अग्रलेखाप्रमाणे स्फूट लेखनही जवळजवळ सातत्याने डॉ. आंबेडकरांनी केले. पहिल्या वर्षातील लेखन ‘आजकालचे प्रश्न’ या शीर्षकाच्या सदरात त्यांनी केले. ‘प्रासंगिक विचार’ म्हणून त्यांनी स्फुटे लिहिली. बरीच स्फुटे महाड सत्याग्रहाशी संबंधित होती. महाडचा धर्मसंगर, महार आणि त्यांचे वतन, पर्वती सत्याग्रह, अस्पृश्योन्नत्तीचे विविध प्रश्न, नेहरू कमिटीची योजना, हिंदुस्थानचे भवितव्य, गिरण्यांचे मालक व कामगार, खोती ऊर्फ शेतकरीवर्गाची गुलामगिरी अशा अनेक विविध विषयांवर त्यांनी स्फुटे लिहिली.

राजकारणासंबंधीचा त्यांचा दृष्टिकोन
‘जनता’ पत्राच्या वाचकांसाठी डॉ. आंबेडकरांनी विलायतेस जात असताना व विलायतेहून सविस्तर पत्रे पाठविली आहेत. प्रवास वर्णनांचाही भाग या पत्रात असला तरी डॉ. आंबेडकरांच्या शैलीत गोलमेज परिषदांचा सविस्तर वृत्तांत या पत्रात आपल्याला मिळतो. त्यातही आक्रमकता होती. तत्कालीन राजकारणासंबंधीचा त्यांचा दृष्टिकोन, महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींसंबंधीची त्यांची मते यांचेही दर्शन या पत्रात आपल्याला होते. डॉ. आंबेडकर-गांधी यांच्यातील संघर्षाचे स्वरूपही या पत्रातून ध्यानात येते. ही दीर्घ पत्रे डॉ. आंबेडकरांनी इंग्रजीत लिहिली होती. त्यांचे भाषांतर ‘जनता’ पत्रात प्रसिद्ध होत होते. ही पत्रे विलक्षण भावगर्भ व काव्यमय आहेत. डॉ. आंबेडकर-गांधी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे स्वरूपही या पत्रावरून ध्यानात येते.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, बाबासाहेबांची राज्यसभेची निवड इ. तत्कालीन राजकीय घडामोडींसमवेत धम्मचर्चा हा ‘प्रबुद्ध भारत’चा अभिन्न भाग होता. ‘प्रबुद्ध भारत’ने धम्मचक्र प्रवर्तनासाठी भक्कम वातावरणनिर्मिती केली. ‘प्रबुद्ध भारत’तर्फे विविध जयंतीच्या निमित्ताने काढलेल्या विशेषांकमधूनही सामाजिक विकासाबरोबरच आर्थिक व सांस्कृतिक परिवर्तनवादी आशयाला विशेष स्थान देण्यात आल्याचे दिसून येते.

बाबासाहेबांची पत्रकारिता जशी आक्रमक, तितकीच संयमी होती. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांच्या प्रचंड विद्धत्तेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. ‘मूकनायक’मधील बाबासाहेबांचे लेख प्रचंड कोटीचे तत्वज्ञान होते. उदाहरण म्हणून काही वाक्ये निश्चितपणे पाहावीत.

समाज ही एक नौकाच
‘एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणार्‍या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही, आधी नाही तर मागाहून का होईना जलमाधी घ्यावी लागणार आहे.’ (मूकनायक अंक पहिला 31 जानेवारी 1920).

‘राजकारणाचे सर्वसाधारण असे दोन हेतू आहेत. एक शासन व दुसरा संस्कृती. (मूकनायक अंक दुसरा 14 फेब्रुवारी 1920) अन्याय सहन न होणे, हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय.’ (मूकनायक – अंक 14 वा 14 ऑगस्ट 1920).

पत्रकारिता आजही देशाला दिशादर्शक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आजही देशाला दिशादर्शक अशीच आहे. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून अनेक पत्रकार पत्रकारिता करताना दिसतात. अलीकडील काळात पत्रकारिता ही अधिक व्यावसाईक बनत चालली असल्याने पत्रकारितेचे स्वत्व हरवतेय की काय अशी परिस्थिती आहे. अशा वातावरणात डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील आक्रमकपणा सर्वांसाठी आदर्शवत असाच आहे.

बालविवाहाचे फलित, ब्राम्हण्याचे स्वरुप, वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश, मातंग समाज, शुद्धिकार्य, सत्याग्रह, आर्यसमाजाचे कार्य, मनुस्मृती दहनाचे वादळ, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद, सहभोजन, मजूर पक्ष, मिश्रविवाह, हिंदीकरण, देव, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार, भिन्न वसाहती, व्यक्ती, सायमन कमिशन इत्यादी अशा अनेक विषयावर बाबासाहेबांनी लेखन केले. या सर्व लेखनात एक आक्रमकपणा दिसून येतो. पत्रकार हा धकाधकीची साहित्यनिर्मिती करणारा साहित्यकारच असतो. साहित्यात जसे जीवनजाणिवांचे प्रतिबिंब, तसे वर्तमानपत्रांत समाजमनाचा रंग उमटतोच!

म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनशैलीविषयी प्रा. अरुण कांबळे गौरवोद्गार काढतात, ‘डॉ. आंबेडकरांनी मराठीतून केलेले लेखन केवळ मराठी साहित्य संस्कृतीचे नव्हे, तर मानव्यधिष्ठित विश्वसाहित्य-संस्कृतीचे भूषण आहे.’ बाबासाहेब हे असे पत्रकार होते की, त्यांच्यात विचारवंत, विश्लेषक, समाजसुधारक, लोकशिक्षक, सत्याग्रही, नेतृत्वशील, आत्मप्रत्ययी अशी सारी गुणग्राहकता धरून त्यांची पत्रकारिता आकाराला आली होती. बाबासाहेबांच्या झुंजार पत्रकारितेने सर्वसामान्याचा आवाज होऊन एक युग घडविले, हे विसरता कामा नये.

संदर्भसूची

  1. थॉट्स ऑन पाकिस्तान, डॉ. आंबेडकर बाबासाहेब,
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस-व्होल्यूम-१,
  2. डॉ. आंबेडकर बाबासाहेब, डॉ. आंबेडकर फौंडेशन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँड इम्पोवरमेंट
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लाईफ अँड मिशन, कीर धनंजय, पॉप्युलर पब्लिकेशन, मुंबई
  4. डॉ. आंबेडकर : सामाजिक विचार एवं दर्शन, डॉ. जाधव नरेंद्र, प्रभात प्रकाशन, मुंबई
  5. पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पानतावणे गंगाधर, सुगत प्रकाशन, नागपूर
  6. मूकनायकचा आवाज, डॉ. देशमुख प्रसन्नकुमार व डॉ. जाधव रोहिदास, यशोदीप पब्लिकेशन, पुणे
  7. समग्र बाबासाहेब, डॉ. मागाडे बाळासाहेब, थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख, डॉ. पानतावणे गंगाधर, सुगत प्रकाशन, नागपूर
  9. मूकनायक, डॉ. पानतावणे गंगाधर, सुगत प्रकाशन, नागपूर
  10.  Thoughts of Dr Babasaheb Ambedkar, Y.D. Sontakke, samyak prakashan

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका