दसरा सण : इतिहास आणि महत्त्व

कृषीविषयक लोकोत्सव

Spread the love

विजयादशमी विशेष/ नाना हालंगडे

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासन नऊ दिवस नवरात्र असते. त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजनही केले जाते.

दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव  अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.

फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, “मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी देईन. ” ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.

कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी १४ कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.

“साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी-दसरा !” या तुकाराम महाराजांच्या उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो योग्यच आहे.

दसऱ्याचे महत्व
झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.

साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा असे या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते. या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. याशिवाय कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे देवीला जाण्याचाही प्रघात आहे. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. मात्र या दंतकथा असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या असे म्हटले जाते. मोठ्या शहरांमध्ये विविध संस्था संघटनांकडून रावणाच्या प्रतिकृतीच्या दहनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.

या दिवशाला सीमोल्लंघन म्हणूनही ओळखले जाते. याचे कारण शिवकालीन आणि पेशवेकालीन परंपरेत आहे. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत नक्की करत असत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. म्हणून हा दिवस सीमोल्लंघन म्हणून ओळखला जातो. आपल्या गावाची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ सीमेचे उल्लंघन करणे.

*दसरा : शास्त्र व इतिहास*
*१. तिथी :- आश्विन शुद्ध दशमी.*
*२. व्युत्पत्ती आणि अर्थ :- दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.*
*३. समानार्थी शब्द: विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.’*
*४. इतिहास: श्रीरामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णांचा वर्षाव केला. कौत्साने केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजनांनी नेले.’ ’प्रभु श्रीराम याच दिवशी रावण वधाकरिता निघाला होता. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या घटनांच्या संकेतामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले  आहे.*

पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तो याच दिवशी. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे.

मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.

प्रारंभी दसरा सण एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.

आपट्याचे पूजन: आपट्याची पूजा करायची असल्यास पुढील मंत्र म्हणतात – अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण । इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

ई. अपराजितापूजन
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला । अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.

शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन :
या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे आणि उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.

राजविधान :
दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.

कृषीविषयक लोकोत्सव :
‘दसरा’ हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्‍त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका