डिकसळमध्ये ‘भाईंची देवराई’ उपक्रमाचा १३ ऑगस्ट रोजी शुभारंभ

देशमुख कुटुंबियांची उपस्थिती; एका मिनिटांत एकाचवेळी होणार १ हजार ९५ वृक्षांची लागवड

Spread the love

सांगोला (विशेष प्रतिनिधी) : सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार तथा माजी रोजगार हमी योजना मंत्री कै. गणपतराव देशमुख यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सिमेवरील डिकसळ गावाच्या हद्दीतील वायफळ घाटालगत “भाईंची देवराई” हा भव्यदिव्य अभिनव उपक्रम साकारण्यात येत आहे. १३ ऑगस्ट रोजी देशमुख कुटुंबिय, डिकसळ ग्रामस्थ, आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक तसेच शेकडो शेकाप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एकाचवेळी १ मिनिटांत १ हजार ९५ झाडांचे रोपन केले जाणार आहे. विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी स्वत:ची २ एकर शेतजमिन या अभिनव प्रकल्पासाठी समर्पित केली आहे.

देवराई प्रकल्पाची तयारी पूर्ण झाली आहे.

प्रकल्पाची तयारी पूर्ण
दोन एकर जागेमध्ये १ हजार ९५ झाडे लावण्यासाठी जेसीबीद्वारे खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी पुणे येथील देवराई फाऊंडेशन या संस्थेकडून दीड हजार झाडे डिकसळ गावात आणण्यात आली आहेत. देवराई संस्थेचे संस्थापक रघुनाथ ढोले हे सक्रियपणे या प्रकल्पास सहाय्य करीत आहेत. झाडांसाठी लागणारी खते, क्यू-आर कोड तसेच मार्गदर्शनही करणार आहे. झाडांचे संगोपन, पाणी व्यवस्था, पायाभूत सुविधा, झाडांसाठीचे खड्डे ही व्यवस्था प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक डॉ. नाना हालंगडे हे सर्वांच्या मदतीतून करणार आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी संरक्षक कुंपनही बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पस्थळी पाण्याचाही चांगली व्यवस्था आहे. भाई गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर संघर्ष करून आणलेले म्हैसाळ योजनेचे पाणी या प्रकल्पालगतच आहे. त्या पाण्याचाही नैसर्गिकपणे या प्रकल्पास लाभ होईल.

देवराई प्रकल्पाची तयारी पूर्ण झाली आहे.

डॉ. नानासाहेब हालंगडे यांची धडपड
‘भाई गणपतराव देशमुख’ या नावावर सांगोला तालुक्यातील चार पिढ्यांनी प्रेम केले आहे. गणपतराव देशमुख तथा आबासाहेबांना मतदान केलेल्या चार पिढ्या सांगोला तालुक्यात आहेत. कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचित, शोषितांच्या कल्याणासाठी आबासाहेबांनी आपले उभे आयुष्य व्यतित केले. ‘एकनिष्ठ’ हा शब्द ते तंतोतंत जगले. त्यांच्या राजकीय कृतीतून त्यांनी आदर्श वस्तुपाठ घालून दिला. काही दिवसांपूर्वीच आबासाहेबांचे निधन झाले. सांगोला तालुका अद्यापही धक्क्यातून सावरलेला नाही. आबासाहेबांच्या आठवणी पर्यावरणपूरक उपक्रमातून चिरंतन राहाव्यात या हेतूने हा अभिनव उपक्रम साकारण्यात येत आहे. आबासाहेबांच्या कार्याचा हा वसा पुढच्या पिढीपर्यंत निरंतर राहावा ही कल्पना डोक्यात घेऊन आबासाहेबांच्या अनेक निवडणुकांचे, प्रसंगानुरूप कार्यक्रमांचे वार्तांकन करणारे, आबासाहेबांचा सहवास लाभलेले पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी हा उपक्रम प्रत्यक्षात उतरवला आहे. हा प्रकल्प निटपणाने आकारास यावा यासाठी डॉ.हालंगडे हे चिकाटीने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांनी यश येताना दिसत आहे.

हेही वाचा

गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ डिकसळमध्ये साकारणार ‘भाईंची देवराई’

सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ

आदिवासी विकासातील अडथळे

“आबासाहेब, आम्हाला सोडून जाऊ नका”, कार्यकर्त्यांची आर्त हाक

देवराई प्रकल्पासाठी ठिबक सिंचन करण्यात येत आहे.

प्रकल्पासाठी २ एकर शेतजमिन समर्पित
या प्रकल्पासाठी मूळचे डिकसळ येथील रहिवासी व जिल्ह्यातील नामवंत पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी डिकसळ गावाजवळ वायफळ घाटाच्या पायथ्यालगत असलेल्या आपल्या ७ एकर स्वमालकीच्या जमिनीपैकी २ एकर जमिन समर्पित केली आहे. ही त्यागवृत्ती सध्याच्या जमान्यात दुर्मिळ होत असताना तालुक्याच्या भाग्यविधात्याप्रतीचे प्रेम व पर्यावरणपूरकता याची सांगड घालून डॉ. हालंगडे यांनी या प्रकल्पास सुरुवात केली आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे सरसावत आहेत.

देवराई प्रकल्पासाठी रोपे डिकसळमध्ये दाखल झाली आहेत.

असा असेल “भाईंची देवराई” प्रकल्प
२ एकर जमिनीमध्ये १ हजार ९५ झाडे लावली जाणार आहेत. विविध १२८ प्रकारची ही झाडे आहेत. यामध्ये देवराई, घनवण, फळबाग या प्रकारची झाडांची वर्गवारी करण्यात आली आहे. आंबा, चिंच, पिंपळ, नारळ, जांभूळ, पेरू, सिताफळ आदींसोबत औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. दोन एकरात तब्बल १२८ प्रकारची झाडे लावली जातील. वृक्षसंवर्धनाचे, वृक्ष अभ्यासाचे, वनपर्यटनाचे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून हा परिसर पुढील काळात परिचित होणार आहे, हे निश्चित.

प्रकल्पात असेल वृक्ष ग्रंथालय
या प्रकल्पामध्ये वृक्षांचे संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे मोठे काम होणार आहे. फळझाडे, दुर्मिळ तसेच अौषधी वनस्पती, ऑक्सिजन निर्माण करणारी वृक्षराजी येथे असेल. सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणा-या पिंपळवृक्षासोबतच पिंपळवेलीचीही लागवड येथे केली जाणार आहे. येथे भेट देण्यासाठी येणा-यांसाठी बसण्याची सुविधा दिली जाणार आहे. प्रकल्पस्थळी २० बाय २० आकाराचे वृक्ष ग्रंथालय साकारले जाणार आहे. या वृक्ष ग्रंथालयात क्यू-आर कोडची सुविधा उपलब्ध असेल. मोबाईलद्वारे क्यू-आर कोड स्कॅन करून प्रत्येक झाडांचे महत्त्व, वैशिष्ट्ये, उपयुक्तता आदींची माहिती प्राप्त करून घेता येईल. प्रत्येक झाडांना नामफलक लावले जाणार आहेत.

श्री श्री श्री रविशंकर साखर कारखान्याचा पुढाकार
भाई गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यातील आठवणींची तैलचित्रे तसेच त्यांचे राजकीय, सामाजिक कार्य चित्रमय स्वरुपात त्यांच्या चाहत्यांना पाहता यावे यासाठी श्री श्री श्री रविशंकरजी साखर कारखाना राजेवाडी, ता. आटपाडी यांच्याकडून संग्रहालयही साकारण्याचे नियोजित आहे. तेथे भाईंचा पुतळाही बसवण्यात येईल. या साखर कारखान्याचे चेअरमन यांनी डॉ. हालंगडे यांच्याशी भेटून चर्चा केली आहे.

सढळ हाताने मदत करा
पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी स्वत:ची दोन एकर शेतजमिन या प्रकल्पास समर्पित करून ‘भाईंची देवराई’ या उपक्रमास सुरुवात करताच तालुक्यासह इतर भागातूनही त्यांच्या मदतीसाठी हात सरसावले आहेत. राजू वाघमारे, रासपचे जिल्हाध्यक्ष सोमाआबा मोटे, डिकसळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तुकाराम भुसनर, वाणीचिंचाळेचे माजी सरपंच चिदानंद स्वामी सर, जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबासाहेब कारंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, जि.प. सदस्य अॅड. सचिन देशमुख, जि.प. सदस्य अतुल पवार, माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे, श्रीपती वगरे, बंडू वाघमोडे, माजी चेअरमन आप्पासो भुसनर, उद्योगपती राजू गावडे, आनंदराव यमगर, बुरंगेवाडीचे सरपंच अर्जून बुरंगे, विनायक कुलकर्णी सर, माजी जि.प. सदस्य प्रा. किसन माने, जि.प.चे वरिष्ठ सहायक गणेश पाटील, पारे गावचे माजी सरपंच मधूकर गोरड, ग्रामसेवक बिभीषण सावंत, संदिप करांडे, संदिप भूसनर, दादासाहेब भूसनर सर आदींनी या कार्यात सहभाग घेतला आहे. या उपक्रमास आणखी मदतीची गरज आहे. आबासाहेबांवर प्रेम करणा-यांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन डॉ. हालंगडे यांनी केले आहे.

एका मिनिटांत होणार १ हजार ९५ वृक्षारोपन
१३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भाई गणपतराव देशमुख यांचे चिरंजिव पोपटराव देशमुख, चंद्रकांतदादा देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब व डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासह कुटुंबियांच्या प्रमुख हस्ते या उपक्रमास सुरुवात होईल. शेकापचे नेते, आर्ट ऑफ लिव्हिंगचे पदाधिकारी, डिकसळ ग्रामस्थही उपस्थित राहतील. यावेळी १ मिनिटांत १ हजार ९५ वृक्षांचे रोपन केले जाणार आहे. विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, पर्यावरण प्रेमी, डिकसळ ग्रामस्थ, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत वृक्षांची लागवड होईल.

निसर्गरम्य परिसरात आकार घेतोय प्रकल्प
सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. या प्रकल्पाच्या पश्चिमेला फॉरेस्ट, दक्षिणेकडे घाटमाथा व पवनचक्की, पूर्वेला वाहता ओढा, उत्तरेला लागवडीखालील शेतजमीन असा हा प्रसन्न वातावरणातील परिसर आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच येथे शाळांच्या मोफत शैक्षणिक सहली, वनपर्यटनही करता येणार आहे. विविध दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती येथे पाहता येतील. शिवाय येथे सीड बँकही सुरू करण्यात येत आहे. या वृक्ष ग्रंथालयात पर्यावरण, वृक्षसंपदा याबाबतचे महत्त्वपूर्ण ग्रंथही वाचता येतील. विरंगुळा व निसर्गरम्य वातावरणात काही क्षण व्यतित करण्याची संधी “भाईंची देवराई” या प्रकल्पात मिळणार आहे.

या प्रकल्पाला मदत करू इच्छिणा-यांनी पत्रकार नाना हालंगडे (७८२१८३१६०६) यांच्याशी संपर्क साधावा. फोन पे (पिराजी वाघमोडे -९८८१२१२५३४) द्वारे मदतीची रक्कम जमा करू शकता, असे डॉ. हालंगडे यांनी कळविले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका