कोरोना महामारीने संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले : डॉ. एच.सी. टियागो

विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन

Spread the love

या आंतरराष्ट्रीय परिषदेत ५ विविध सत्रांमध्ये विविध विषयांतील शोधनिबंधांचे वाचन झाले. या सत्रांचे अध्यक्षस्थान प्रा.डॉ गौतम कांबळे, डॉ. माया पाटील, डॉ. रविंद्र चिंचोलकर, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी भूषविले. या विविध सत्रांचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भासके, डॉ. रुपेश पवार, श्री. चेतन मोरे, डॉ. चैतन्य शिनखेडे, ज्ञानेश्वरी हजारे यांनी केले. प्रा. चंद्रकांत गार्डी, डॉ. श्रीराम राऊत, प्रा. अशोक शिंदे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.

सोलापूर (प्रतिनिधी) : संशोधन हे समाजविकासाचे महत्त्वाचे अंग आहे. विज्ञान, तंत्रज्ञानासह सामाजिकशास्त्रांमध्ये होणारे संशोधन समाजाला पुढे घेऊन जाणारे असते. उपयोजित संशोधनाला किती महत्त्व आहे हे कोरोना काळात सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन युनिव्हर्सिटी ऑफ गुटेनबर्ग (स्वीडन)चे स्कॉलर डॉ. एच. सी. टियागो सोरेस बिडेन यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाकडून “Changing Contours of Social Sciences towards Post COVID -19’’ या विषयावर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवारी ऑनलाईन स्वरुपात करण्यात आले होते. त्यावेळी ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा यांच्यासह प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ. सुरेश पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा.डॉ. जी.एस. कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट केला. निमंत्रक डॉ. माया पाटील, समन्वयक डॉ. प्रकाश व्हनकडे यांनीही मनोगत केले. सूत्रसंचालन कु. तेजस्विनी कांबळे यांनी तर, आभारप्रदर्शन डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.

डॉ. एच.सी. टियागो सोरेस बिडेन पुढे म्हणाले की, अशा आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. अशा परिषदांमधून संशोधनातील नवे पैलू पुढे येतात. विविध विद्याशाखांमध्ये होणाऱ्या संशोधनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी किंवा वापर झाल्यास संशोधनाचा हेतू साध्य होईल. सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन करताना तथ्यांना महत्त्व असते. तथ्ये जेवढी अस्सल असतील तेवढे संशोधन अचूक बनते. संशोधनाच्या क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग होताना दिसत आहेत. ही बाब समाधानकारक आहे. आफ्रिका खंडात अंगोला देशात अल्पवयीन मुलांना बळजबरीने सैनिकी शिक्षण देऊन चुकीच्या मार्गाला लावले जात आहे. यातील मुले लवकर यातून बाहेर पडतात. मात्र मुलींना यातून लवकर बाहेर पडणे अवघड जात आहे. जगामध्ये वाईट प्रवृत्तींच्या विरोधात सर्व राष्ट्रांनी काम करणे गरजेचे आहे.

तज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलताना विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलाचे माजी संचालक डॉ. इ. एन. अशोककुमार म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. यामध्ये संशोधनाचीही महत्वाची भूमिका आहे. उपयोजित संशोधन वाढीस लागण्याची गरज आहे. संशोधन कार्य करताना संशोधक हा संशोधन विषयाशी प्रामाणिक असला पाहिजे. संशोधनातून समाजाला फायदा कसा होईल याकडे त्याने लक्ष दिले पाहिजे.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, कोरोना काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. या महामारीने जगाला नवा धडा दिला आहे. या संकटकाळात विविध क्षेत्रांवर नेमका परिणाम काय झाला याचा चिकित्सकपणे अभ्यास व्हावा, त्यातून काही नवे निष्कर्ष पुढे यावेत या हेतूने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयातील हे संशोधन आगामी उपाययोजनांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असे वाटते. संशोधनाच्या क्षेत्रात नाविन्यता व वैविध्यता येत असल्याचे दिसत आहे. संशोधकांनी समाजाच्या कामी येणारे संशोधन जास्तीतजास्त करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारच्या संशोधनातून कोरोना संकट पश्चात उपाययोजना करणे सोपे जाईल.


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका