ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमाध्यमविश्व
Trending

एनडीटीव्ही : भारतीयांच्या अपेक्षेचेही अधिग्रहण

डॉ. शिवाजी जाधव यांचा खणखणीत लेख

Spread the love

अदाणी समूहाकडून एनडीटीव्हीचे होत असलेले अधिग्रहण भारतीय प्रसार माध्यमात सर्वाधिक चर्चेत राहिले. पैशाच्या जोरावर एनडीटीव्ही विकत घेणे कोणालाही शक्य होईल. पण एनडीटीव्हीने जपलेला भारतीय पत्रकारितेचा गौरवशाली वारसा जपणे आणि झेपणे अदाणी समूहाला शक्य होईल का, हे पहावे लागेल. अदाणी समूह केवळ माध्यम विकत घेत नाही तर त्याच्यासोबत प्रचंड मोठी जबाबदारी आणि कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचेही अधिग्रहण करत आहे, याची जाणीव या समूहाने कायम ठेवली पाहिजे.

इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणेच माध्यम उद्योगातही अनेक चढउतार येत असतात. अनेक माध्यमांची विक्री होते. काही माध्यमे दिवाळखोरीत निघतात तर काही माध्यमांची पाचही बोटे तुपात असतात. शासकीय व्यवस्थेशी जुळवून घेऊन तसेच कायदेशीर बाबींमध्ये तरबेज राहून काही माध्यमे सर्वकालीन स्थितीत ‘फील गुड’ वातावरणाचा आनंद घेत असतात. किंबहुना काही माध्यमांवर दर्शकाश्रय असूनही मालकी हस्तांतरीत करण्याची वेळ येते.

बदलत्या आर्थिक स्थितीचा आणि वाचक-श्रोते-दर्शक-युजर्सच्या मूडचा परिणामही माध्यमांवर होत असतो. विशेषतः गेल्या काही वर्षात विस्तारत असणार्‍या डिजिटल माध्यमांत असेच काही बदल घडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर 2022 या मावळत्या वर्षात अन्य माध्यमांप्रमाणेच डिजिटल माध्यम क्षेत्रात झालेल्या बदलाची आणि एनडीटीव्हीसारख्या माध्यमाचे होत असलेल्या अधिग्रहणाची नोेंद घेणे आवश्यक आहे.

माध्यमांच्या अधिग्रहणात अर्थकारण खूप महत्त्वाचे असते. खास करून डिजिटल माध्यमांचे अर्थकारण आणि त्यांचा ग्राहकवर्ग याची नीटशी कल्पना असत नाही. आपल्याकडे कमी कालावधीचे व्हिडिओ तयार करून अपलोड करण्याचे फॅड सध्या खूपच वाढले आहे. एमएक्स टकाटक हा प्लॅटफॉर्म यासाठी सुविख्यात आहे. सोशल नेटवर्क कंपनी शेअरचॅटने अलिकडेच एमएक्स टकाटकचे अधिग्रहण केले. शेअरचॅटचा मोज हा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्महीही भारतात चांगलाच लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मचे 16 कोटी युजर्स आहेत. दुसर्‍या बाजूला एमएक्स टकाटकचेही भारतात तब्बल 15 कोटी युजर्स आहेत. या अधिग्रहणानंतर शेअरचॅटकडे भारतातील 31 कोटी युजर्स आहेत. परिणामी हा एक मजबूत प्लॅटफॉर्म बनला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम असे बडे प्लेअर या स्पर्धेत आहेत. फेसबुकचे शॉर्ट व्हिडिओ खूपच पसंतीला उतरतात. तरीही इन्टाग्रामचे रिल्स सर्वात पुढे आहेत.

या स्पर्धेत आता शेअरचॅट उभा ठाकले आहे. भारतात या बड्या प्लेअर्ससोबत जोश हा आणखी एक प्लॅटफॉर्म आपल्या साडेअकरा कोटी युजर्ससह स्पर्धेत कसा उतरतो, हे पहावे लागेल.

आणखी एक शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप ‘चिंगारी’कडून ‘फॅशन टीव्ही’सोबत केलेली पार्टनरशीपही चर्चेचा विषय आहे. चिंगारी मोबाईल अ‍ॅप 2018 मध्ये लाँच झाले. यामध्ये डान्स, गाणी तसेच अनेक नवनव्या कल्पनांचे व्हिडिओ मिळतात. वीसहून अधिक भाषांमध्ये हा कंटेन्ट उपलब्ध असून भारतात या प्लॅटफॉर्मचे 13 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. आता फॅशन टीव्हीसोबत हे अ‍ॅप जोडले गेल्याने दोन्ही माध्यमे एकमेकांचा कंटेन्ट वापरू शकणार आहेत.

गतवर्षातील जागतिक पातळीवर सर्वात चर्चेत राहिलेला आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला व्यवहार म्हणून ट्विटरच्या व्यवहाराकडे पाहिले जाते. अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रचंड पैसेवाले एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले. याआधी ट्विटर ही सार्वजनिक सेवा प्रणाली होती. मात्र आता ती मालकी हक्क असणारी प्रायव्हेट कंपनी झाली आहे. त्यामुळे येत्या काळात बरेच भले-बुरे प्रकार या कंपनीत पहायला मिळणार आहेत. युजर्सवर आणि पर्यायाने विविध देशातील सामाजिक स्वास्थ्यावरही त्याचे परिणाम होणार आहेत.

कोविडनंतर एका बाजूला धडाधड मासिके बंद होत असताना आघाडीची खासगी विमान कंपनी जीएमआर ग्रूपने ‘एसोसिटी लाईव्ह’ नावाचे मासिक प्रकाशित करण्याची घोषणा केली.

यासाठी या कंपनीने व्यावसायिक प्रकाशनात अग्रेसर असणार्‍या ‘बीडब्लू बिझनेसवर्ल्ड’सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनीकडे लाखो प्रवाशांचा डेटाबेस आहे. त्या जोरावर या प्रवाशांना संस्कृती, कला, इव्हेंट, प्रदर्शन आदीची माहिती देण्याचा प्रयत्न एरोसिटी लाईव्हमधून केला जाणार आहे.

उत्तर भारतातील महत्त्वाचे दैनिक ‘द ट्रिब्यून’ने अलिकडचे ‘तबोला’ सोबत युती केली आहे. तबोला ही जाहिरात आणि ग्राहक सेवा देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. जाहिरातदारांच्या वेबसाईटवर ट्राफिक पाठविण्याचे काम तबोला करते. याचा फायदा संबंधित जाहिरातदार किंवा माध्यम संस्थांना होतो.

याआधी एनडीटीव्हीने तबोलाची सेवा घेतली होती. आता द ट्रिब्यूनने ही सेवा घेतली आहे. ग्राहक वाढविण्याबरोबरच आशय निर्मिती आणि महसूल वाढीसाठीही तबोलाचा उपयोग होतो. ट्रिब्यूनने या सेवेचा उपयोग करून इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी भाषेतील वाचकांना आकर्षित करण्याचे नियोजन केले आहे.

या सर्वात अनेक अर्थाने गाजलेला व्यवहार म्हणजे नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (एनडीटीव्ही) ची मालकी हस्तांतरण प्रक्रिया. गेल्या काही महिन्यांपासून अदाणी समूह एनडीटीव्ही घेणार अशी चर्चा होती. मात्र, डिसेंबरमध्ये ही चर्चा वस्तुस्थितीत रूपांतरीत झाली. एनडीटीव्हीचे संस्थापक ख्यातनाम पत्रकार प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना काही वर्षांपूर्वी विश्वप्रधान कमर्शिलअ प्रा. लि. (व्हीसीपीएल) या कंपनीने 400 कोटींचे कर्ज दिले होते.

या कर्जाच्या बदल्यात कंपनीला कोणत्याही क्षणी एनडीटीव्हीत 29.18 टक्के भागिदारी देण्याची तरतूद केली गेली होती. ही तरतूद हेरून अदाणी ग्रूपने सुरूवातीला कुटनितीचा वापर करत व्हीसीपीएलचे अधिग्रहण केले. परिणामी, एनडीटीव्हीमध्ये अदाणी समूहाची 29.18 टक्के भागिदारी झाली.

टप्प्याटप्प्याने अदाणी समूह संपूर्ण एनडीटीव्ही समूह अधिग्रहित करत आहे. सध्या प्रणव आणि राधिका रॉय यांच्याकडे एनडीटीव्हीचे27.26 टक्के शेअर्स आहेत. परंतु या दोघांनीही एनडीटीव्हीतून बाहेर पडत अदाणी समूहाला चांगली पत्रकारिता करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ख्यातनाम पत्रकार रवीश कुमार याआधीच एनडीटीव्हीतून बाहेर पडले आहेत.
माध्यमांचा प्रवास सुरूवातीपासूनच भांडवली व्यवस्थेसोबतच सुरू झाला. लोकहिताची आणि लोकांनी चालवलेली माध्यमे फारकाळ तग धरु शकली नाहीत.

पैशाने माध्यमे विकत घेता येऊ शकेल पण माध्यमात काम करणारे सर्वच पत्रकार विकत घेणे कोणालाच कदापि शक्य होणार नाही. व्यवसाय म्हणून अदाणी समूहाने कोणते माध्यम खरेदी करावे, हा त्या समूहाचा प्रश्न आहे.

सरकारी कृपने तसेच स्वतः सरकारने चालवलेली माध्यमेही जनमनावर खूप काळ प्रभाव गाजवू शकली नाहीत. व्यक्तिगत मालकीची माध्यमे मात्र आपला प्रभाव कायम ठेऊन आहेत. माध्यमांचे कंपनीकरण झाल्यानंतरच्या काळातही भारतात व्यक्तिगत मालकी असलेल्या माध्यमांचा अद्याप दबदबा आहे. व्यक्तिगत मालकी असूनही माध्यमांनी कधी आपली माध्यमे कोणाच्या दावणीला बांधली नाहीत, हा भारतीय पत्रकारितेचा इतिहास आहे.

वर्तमान मात्र इतिहासाशी प्रतारणा करू पाहत आहे. अदाणी समूह एनडीटीव्हीवर मालकी प्रस्थापित करू पाहत असला आणि त्यात त्याला यश आले असले तरी एनडीटीव्हीने जपलेली भारतीय पत्रकारितेची गौरवशाली परंपरा अदाणी समूह जपणार का किंवा या समूहाला ही परंपरा झेपणार का, हे पाहण्यासाठी थोडा काळ वाट पहावी लागणार आहे.

पैशाने माध्यमे विकत घेता येऊ शकेल पण माध्यमात काम करणारे सर्वच पत्रकार विकत घेणे कोणालाच कदापि शक्य होणार नाही. व्यवसाय म्हणून अदाणी समूहाने कोणते माध्यम खरेदी करावे, हा त्या समूहाचा प्रश्न आहे. परंतु त्या माध्यमाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन पत्रकारिता करावी, ही सर्वसाधारण अपेक्षा आहे. अदाणी समूहाकडूनही हीच अपेक्षा असेल.

– डॉ. शिवाजी जाधव (कोल्हापूर)


खास बातम्या

शहाजीबापूंनी दणक्यात वजन घटवलं

वारकरी संप्रदायाचे वाटोळे कोणी केले?

सुशांतसिंह राजपूतच्या “त्या” घरात राहायला कोणी धजावेना!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका