अमोल पालेकर कृत ‘अनकही’ : जातवर्गीय पितृसत्तेच्या चित्रीकरणाचा प्रयत्न

कुणाल रामटेके यांचा अन्वयार्थक लेख

Spread the love

 

जातीवर्गवर्णलिंग भेदावर आधारित समाजात ब्राम्हण्यावादी पुरुषसत्तेची चिकित्सेच्या अंगाने कोणत्याही कला आणि साहित्य प्रकारांची चिकित्सा होत नाही तोपर्यंत सार्वत्रिक समीक्षा झाली असे आपणास म्हणता येत नाही. प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून अमोल पालेकर दिग्दर्शित ‘अनकही’ या चित्रपटाची समीक्षा ब्राम्हण्यावादी पुरुषसत्तेच्या प्रश्नाच्या अंगाने करण्याचा प्रयत्न केला आहे.

सूचनयोगिक अथवा समांतर रंगभूमीच्या उर्जीतावास्थेसाठी अत्यंत तळमळीने मान्यवरांनी केलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत. या प्रयोगांच्या माध्यमातून प्रस्थापित सिने-नाट्य मूल्यांना नाकारत विचार आणि अभिव्यक्तीची वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. महानगरी वर्तुळातून सिने-नाट्याला बाहेर काढत खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करणाऱ्या या मान्यवरांमध्ये अमोल पालेकर यांचे नाव अत्यंत महत्वपूर्ण आहे. अर्थात कला आणि साहित्याच्या परिप्रेक्षात होत असलेल्या अशा प्रयत्नांची चिकित्सा सातत्यपूर्णरित्या होत राहिली पाहिजे. अर्थात भारतासारख्या जातीवर्गवर्णलिंग भेदावर आधारित समाजात ब्राम्हण्यवादी पुरुषसत्तेची चिकित्सेच्या अंगाने कोणत्याही कला आणि साहित्य प्रकारांची चिकित्सा होत नाही तोपर्यंत सार्वत्रिक समीक्षा झाली असे आपणास म्हणता येत नाही. प्रस्तुत निबंधाच्या माध्यमातून अमोल पालेकर दिग्दर्शित ‘अनकही’ या चित्रपटाची समीक्षा ब्राम्हण्यवादी पुरुषसत्तेच्या प्रश्नाच्या अंगाने करण्याचा प्रयत्न केला आहे.


प्रस्थापित सिनेमा क्षेत्र आणि व्यावसाईक धाटणीपासून खऱ्या अर्थाने वेगळा असलेला ‘अनकही’ हा चित्रपट दिनांक १३ डिसेंबर १९८५ मध्ये रिलीज झाला. मराठीतील ‘कालाय तस्मै नमः’ या चिं. त्र्यं. खानोलकरांच्या नाटकावर आधारित या चित्रपटात अमोल पालेकर यांनी देवकीनंदन चतुर्वेदी अर्थात ‘नंदू’ आणि त्यांच्या बरोबर दीप्ती नवल यांनी इंदुमती मिश्रा ‘इंदू’ ची भूमिका केली आहे. त्यांच्यासोबतच श्रीराम लागू हे ज्योतिभास्कर पंडित सत्यनारायण चतुर्वेदी अर्थात नंदूच्या वडीलांच्या भूमिकेत,  तर दीना पाठक या देवकी चतुर्वेदी अर्थात नंदूच्या आईच्या, भूमिकेत आहेत. अनिल चटर्जी हे मिश्राच्या म्हणजेच इंदूच्या वडीलांच्या भूमिकेत असून देविका मुखर्जी यांनी नंदूचे प्रेम असलेल्या ‘सुषमा चटोपाध्याय’ यां युवतीची भूमिका साकारली आहे. या सोबतच विनोद मेहरा (डॉक्टर), विधू विनोद चोप्रा (पटवर्धन), विदुला सीमा (पटवर्धनची पत्नी), अनंत भावे (मनोरुग्ण डॉक्टर) आदि कलाकार आहेत.


भारतीय चित्रपटसृष्टीचा मूलभाव असलेल्या अतिरंजकातावादी धारेतून पूर्णपणे वेगळ्या आशयाचा हा चित्रपट असून त्याचे कथानकही अगदी वेगळ्या स्वरूपाचे आहे. यात नंदूचे वडील ज्योतिभास्कर पंडित सत्यनारायण चतुर्वेदी हे एक सुप्रसिद्ध ज्योतिषी असून चित्रपटाची सुरुवात हॉस्पिटलमधील दृश्याने होते. यात सत्यनारायण चतुर्वेदी यांनी नंदूच्या चुलत भावाच्या पत्नीच्या मृत्यूचे भाकीत केले आहे. त्याबाबतची सूचना ही त्यांनी डॉक्टरला केली. मात्र त्यांच्यावर अविश्वास दाखवून ऑपरेशन थिएटरमध्ये निघून जातात. तथापि, ज्योतिषाने जसे भाकीत केले होते त्याप्रमाणे रुग्णाचा मृत्यू होतो. ज्योतिषी आपली पत्नी देवकी आणि त्यांचा मुलगा नंदू यांच्याबरोबर राहतो. नंदूचे सुषमा चटोपाध्याय या तरुणीवर प्रेम असते. मात्र नंदूच्या लग्नानंतर अकरा महिन्यातच त्याच्या पत्नीचे निधन होणार असल्याची भविष्यवाणी जोतिषी अर्थात चंदूचे वडील करतात. त्यातून या चित्रपटाच्या कथानकाला नवे वळण मिळते. यावेळी नंदू हा ‘इंदू’ नावाच्या मतीमंद मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतो. अर्थातच त्यामागची प्रेरणा ही इंदूच्या मृत्यूनंतर त्याची प्रेयसी सुषमाबरोबर लग्नाची दारे त्याला उघडी होणार असतात. उच्चशिक्षित असलेला नंदू जोतिषाच्या आहारी जातो आणि इंदू बरोबर लग्न करतो. तिच्यासोबत संसार सुरु असतांनाच आज ना उद्या ती मारेल याची वाट अंत:र्मनाच्या कोपऱ्यात बघणे त्याचे सुरु असते. काही काळानंतर इंदू बाळंत होते. मात्र ज्यावेळी तिला बघण्यासाठी नंदू हॉस्पिटल मध्ये जातो त्याच वेळी सुषमाचे खालील पत्र त्याला मिळते. ते मुळातच वाचण्यासारखे आहे.
ते पुढील प्रमाणे –
“ये मेरी आत्महत्या नहीं, ये मेरा इनकार है. सारे बंधनों के खिलाफ ! जो मेरे गले में डाल दिए गए. प्यार के नाम पर, ममता के नाम पर, अंधविश्वास के नाम पर. आज उन सारे बंधनों को मैंने तोड़ दिया है. मेरी मौत मेरा बयान है. क्योकि जिन्दगी ने मुझसे बोलने का हक़ छीन लिया. किसी को मेरा प्यार चाहिए था अपने लिए. तो कोई काल के गणित के नाम पर मेरा अपना हक, मेरा अपना विश्वास छोड़ने के लिए मजबूर करना चाहता था. मैं क्या चाहती थी इससे किसी को कोई मतलब नहीं था. मैं काल के गणित के खिलाफ लड़कर जी सकती थी. मगर ‘बिंदु’ की निष्पाप आंखों से लड़कर नहीं. मैं अपने प्रेम को भूल कर किसी औरकी होकर भी जी सकती थी. लेकिन उन दो आंखों के सामने मेरी सारी जिंदगी एक अपराध बन गई और इस अपराध की सजा अपने आप को दिए बगैर मैं रह नहीं सकी इसीलिए मेरी मृत्यु किसी भविष्यवाणी का परिणाम नहीं. मेरा अपना चुनाव है. और अपने लिए मौत चुनकर मैं यही कहना चाहती हूं कि जिंदगी हर कदम पर आदमी का अपना चुनाव है.”

हे पत्र वाचत असतांनाच हा चित्रपट समाप्त होतो. मुळात कथानक संपायच्या आताच चित्रपट समाप्त असल्याने त्यातून निर्माण होत असलेल्या समस्यांचा विचार करण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर येते.


या चित्रपटाने सन १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एका नव्या चर्चेला तोंड फोडले. त्यातून पुन्हा एकदा ‘मेनस्ट्रीम’ म्हणविल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या आशय आणि विषयवस्तूची चिकित्सा करणे महत्वाचे ठरले. असो.
कोणत्याही सामाजात जन्मास येणाऱ्या कला वा साहित्य हे त्या समाजाचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जाते. मात्र भारतीय समाज आणि व्यवस्थेचा विचार करता येथील कला आणि साहित्यावर येथील ब्राम्हण्यवादी पितृसात्तेचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. काही अर्थी ‘अनकही’ या चित्रपटाची चिकित्सा करीत असतांना हा चित्रपटही त्यास अपवाद नाही हे ओघानेच आले. कथानकातील सर्वच मुख्य पात्रे हीच मुळात उच्चवर्णीय आहेत. त्यातच त्यांच्या परिघातील जनमानसावार ‘जोतिष’ किंवा तस्सम धर्म शस्त्रांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात त्यातून दिसून येतो. त्यासाठी डॉक्टरकडे आपल्या पत्नीला घेऊन आलेला नंदूचा मित्र अथवा चुलत बंधू पटवर्धन जोतीषाकडेही तिची कुंडली दाखवायला विसरत नाही. त्यातून मानवी जीवनाच्या गतीकते बरोबरच धर्म आणि अंधश्रद्धांच्या प्रभावातून शहरी आणि कथित शिक्षित मनही वेगळे होऊ शकत नाही हे प्रकर्षाने जाणवते. त्यामागची कारणे येथील बंधीस्थ समाज आणि त्याच्या मानसिकतेत शोधता येतील.


अर्थात, कोणत्याही बंधीस्थ सामाजिक व्यवस्थेत स्त्रिया अत्यंत खालच्या पातळीवर असलेल्या आपणास दिसून येतात. त्यांच्या मानवाधिकारांस सातत्याने अशा व्यवस्थेत नकार मिळणे स्वाभाविकच असते. त्यातूनच आपली पहिली पत्नी मारणार म्हणून मतीमंद असलेल्या ‘इंदू’ बरोबर विवाह करून तिच्या मृत्यूनंतर सुषमा बरोबर लग्न करण्याची इच्छा बाळगणारा नंदू क्रूर पुरुषी मानसिकताच दर्शवत असल्याचे मत खुद्द अमोल पालेकर यांनीच आपल्या एका मुलाखतीतून व्यक्त केले आहे. (माझा कट्टा, नोव्हे. २०२०, एबीपी माझा) अर्थात, मोठ्या घराची सून होणार म्हणून या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ असलेले इंदूचे वडील मात्र आपल्या मुलीच्या भविष्य विषयी अत्यंत खुश असतात. त्यातून भारतीय विवाह संस्थेचे मूळ स्वरूप समजाऊन घेण्यास मदत होईल. इंदूचे मतिमंदत्व आणि कथित भविष्य माहित असतांनाही आपल्या सात्यकथनासाठी प्रसिद्ध असलेले नंदूचे जोतिषी वडील त्याविषयी काहीही बोलत नाहीत. बंधिस्त समाजाची आत्ममग्न प्रवृत्ती स्पष्ट करणारे हे सारे कथानक आहे. पुढे बाळंतपणात इंदू एका मुलाला जन्म देते. त्याच वेळी तिला हॉस्पिटलमध्ये बघायला आलेल्या नंदूला सुषमाचे एक पत्र मिळते. त्यात खऱ्या अर्थाने दिसून येणारी वेदना ही सातत्याने दुय्यमत्व देण्यात आलेल्या शोषित स्त्रीची वेदना आहे.

– कुणाल रामटेके (संपादक-थिंक टँक लाईव्ह)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका