सांगोल्यात हिवाळ्यात उन्हाळ्याची दाहकता
तालुक्यातील बंधाऱ्यात केवळ सात टक्के पाणीसाठा

विशेष वार्तापत्र/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात सध्या हिवाळ्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विहिरी व विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीबरोबरच बंधाऱ्यातील पाणीही कमी होऊ लागली आहे. तालुक्यातील १८ बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १२७०.२७ दलघफु असताना आजमितीला या बंधाऱ्यात केवळ ९७.२९ (७.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. ऐन उन्हाळ्यात तालुक्यात पिकांना पाणीटंचाईचे संकट जाणवणार आहे.

सांगोला तालुका हा पर्जन्यछायेचा प्रदेश मानला जातो. हा परिसरात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई नेहमी जाणवू लागते. सध्या उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यामुळे विहिरी व विंधन विहिरींचे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. तालुक्यातील माण व कोरडा नदीवरील बंधाऱ्यासह पाच तलावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. या दोन्ही नद्यावरील १८ बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १२७०.२७ दलघफु असताना आजमितीला या बंधाऱ्यात केवळ ९७.२९ (७.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. अचकदानी तलावासह खवासपूर, लोटेवाडी, बलवडी, अनकढाळ, मेडशिंगी बंधारे कोरडे ठणठणीत पडले असल्याने शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे. दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता म्हैसाळ व टेंभूच्या आवर्तनाकडे लागल्या आहेत.
सद्यस्थितीला १८ पैकी १० बंधाऱ्यात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा बंधाऱ्यात उपलब्ध आहे. तर इतर आठ बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याने शेतकऱ्यांचे म्हैसाळ, टेंभू सिंचन योजनेतून आवर्तन कधी सोडले जाणार याकडे लक्ष लागले आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्यास सांगोलकरांना पाणीटंचाईला समोर जावे लागणार आहे. सध्या तालुक्यात उसाचे पीक क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने या ऊस पिकाला उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निश्चितपणे जाणवणार आहे.
माण व कोरडा नदीवरील बंधाऱ्यातील सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठा
दलघफूटमध्ये व टक्केवारी पुढीलप्रमाणे –
खवासपूर ०.५ (०.८६ टक्के), लोटेवाडी ०.१० (०.२८ टक्के), बलवडी.- (शून्य टक्के), नाझरा ५.३९ (१०.६० टक्के), अनकढाळ ०.९८ (०.५२ टक्के), चिणके ७.३७ (१५ टक्के), वाटंबरे ३.३४ (६.२४ टक्के), कमलापूर १४.७३ (१३.०९ टक्के), अकोला ३.५२ (४.७६ टक्के), कडलास ११.३१ (१५.८७ टक्के), सांगोला १.०७ (१.३५ टक्के), वाढेगांव ८.३८ (१०.३४ टक्के), बामणी ०.७१ (१.०२ टक्के), मांजरी १९.७१ (१९.९८ टक्के), मेथवडे ६.९८ (१०.३३ टक्के), आलेगांव १०.७३ (१५.११ टक्के), मेडशिंगी (शून्य टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
पाच प्रकल्पातील पाणीसाठा
सांगोला तालुक्यातील चिंचोली, अचकदानी, जवळा, घेरडी, हंगीरगे या तलावांची पाण्याची साठवण क्षमता ३६०.५६ दशलक्ष घनफूट इतकी असून सद्यस्थितीत १५१.९७ द.ल.घ.फू. (५१.७९ टक्के) पाणीसाठा आहे. चिंचोली तलावात ४६.०४ द.ल.घ.फू.(४९.६० टक्के), अचकदानी तलावात शून्य टक्के पाणीसाठा, जवळा तलावात २१.३२ द.ल.घ.फू.(४५.६४ टक्के), घेरडी तलावात ६०.५१ द.ल.घ.फू. (६०.७१ टक्के), हंगीरगे तलावात २४.१ द.ल.घ.फू.(५१.२१ टक्के) इतका पाणीसाठा आहे.
नीरा उजवा कालव्याचे आवर्तन वेळेवर मिळावे
तालुक्याला माण व कोरडा नदीच्या बरोबरच नीर उजवा कालव्याचे आवर्तन अतिशय महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यातील निरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमी संघर्ष करावा लागला आहे. सद्यस्थितीमध्ये बंधाऱ्याचे पाणी कमी होत असताना निरा उजवा कालव्याच्या आवर्तन क्षेत्रातील पाणी वेळेवर मिळाल्यास शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा थोड्या कमी जाणवणार आहेत. यासाठी निरा उजव्या कालव्याचे आवर्तन ‘टेल टू हेड’ वेळेवर मिळावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.