३१ वर्षात १७ हजाराहून अधिक मुले घडविली
स्व.गणपतआबांची पुण्याई ; मुख्या.तुकाराम भुसनर आज शासकीय सेवेतून सेवानिवृत्त

स्पेशल रिपोर्ट / डॉ.नाना हालंगडे
“नाचे तुका लागे पाया,विद्या असती काही,तरी पडतो अपायी,सेवा चुकतो संतांची,नागवण हे फुकाची”,तुकोबारायांनी त्यांच्या अभंगातून देवांशी संवाद साधतात.त्यांच्या विरहात व्याकूळ होऊन अभंग रचतात. अन् देवालाच थँक्यू म्हणतात.पण हेच डिकसळ मधील आदर्श व्यक्तिमत्त्व, मितभाषी स्वभाव,स्पष्ट बोलणारे, मुख्याध्यापक तुकाराम गणपती भुसनर हे श्रीलक्ष्मी देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत शिक्षणाचा जागर करतायेत.गेली ३१ वर्षापासून त्यांनी समाजातील गोरगरीब,पीडित,मोलमजुरी करणाऱ्या हजारो कुटुंबातील मुले शिक्षणाने तेजोमय केली.आज शनिवार ३१ मे २०२५ रोजी मुख्याध्यापक तुकाराम भुसनर हे ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या उचित कार्याचा हाच तो लेखाजोखा……
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे तुकाराम सरांचा जन्म १ जून १९६७ साली झाला.घरची परिस्थिती अत्यंत बिकट अशी होती. आई-वडील व भाऊ व ऊसतोडीसाठी सांगली कारखान्याला जात होते.अशा परिस्थितीत त्यांना कपडेसुद्धा घालायला नव्हती. त्यावेळी त्यांना त्यांच्या आईने मुलाचे कपडे शेजाऱ्यांची मागून घेऊन, त्यांना वडिलांकडे रेल्वेने पाठविले.अशातच शाळेची सुरुवात गावातील जि.प.शाळा डिकसळ येथून झाली.पहिली ते चौथीपर्यंत या शाळेत शिक्षण घेतले व घरची जनावरे राखत चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारे येथे ५ वी ते ७ वी पायी चालत जाऊन सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे राहण्याची व जेवणाची सोय नसल्याने जवळा येथे कै.सौ. वत्सल्लादेवी विद्यालयात प्रवेश घेतला व शिक्षण सुरू झाले. शनिवारी गावी पायी चालत जावे लागत.अशातच १९८४ ला इयत्ता दहावी पूर्ण झाली.
पुढील शिक्षणासाठी जवळ्यातच वस्तीगृहात अकरावी व बारावी पूर्ण केली.बारावीत असताना सैन्यदलात भरती झाली.पुणे येथे वेल्डिंग खाते मिळाले त्या खात्यामध्ये डोळ्याला त्रास झाल्याने रात्री बारा वाजता पुणे येथून न विचारता गावी पळून आले.त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण सांगोला महाविद्यालय येथे केले. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून १९८९ ला ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
पुढील शिक्षणासाठी पुणे येथे कमवा अन् शिका या रयत शिक्षण संस्थेमध्ये एम.कॉमला पूर्ण केले.त्यावेळी आर्थिक परिस्थिती नसल्याने कामानिमित्त ते मुंबईत प्रथम नोकरीच्या शोधात गेले.त्यांचा मित्र तानाजी गेजगे अन् भुसनर सर हे दोघे रेल्वेने बिगर तिकटीचे गेले.त्याच दरम्यान पोलिसांनी त्यांना शिवडी रेल्वे स्टेशनवर पकडले. धरून एक रात्र कोंडून ठेवले. शेवटी आम्हाला बार्शीचा एका पोलिसाची ओळख पटली आणि त्यांनी आम्हाला नंतर सोडले व नंतर ते मुंबईमध्ये स्नेही पांडुरंग खोत यांच्या घरी गेले. तिथे एक टाइम जेवण एक टाईम वडापाव खाऊन दिवस काढले. परंतु गावाकडे आई सारखी आठवण काढीत होती. म्हणून नोकरी सोडून ते परत गावी आले
गावी आल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना सांगोला तालुक्याचे आमदार गणपतरावजी देशमुख यांनी माझ्या नोकरीसाठी मला १ एप्रिल १९९० ला माणगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडी येथे चिटबॉय म्हणून उसाच्या तोडनीसाठी नेमणूक केली.त्याच वेळी कर्नाटक व करमाळा या भागातून ऊस अनीत होतो. कारखान्यात असतानाच गावातील सर्व मित्रांच्या सहाय्याने गावांमध्ये एखादी बिशी चालवावी या हेतूने पुजाऱ्यांच्या वाड्यामध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असे ठरले की आपल्या गावामध्ये १ ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या गावामध्ये आहे. पुढील शिक्षणाची सोय नव्हती म्हणून पांडुरंग पाटील,गुरुजी यांच्या संकल्पनेतून गावामध्ये निवासी आश्रमशाळा चालू करण्याचे ठरले. त्या अनुषंगाने श्रीलक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ डिकसळ या संस्थेची २९ ऑक्टोंबर १९९० ला स्थापना केली.त्यावेळ पासून आश्रम शाळा सुरू करण्यासाठी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे गेले.त्यावेळी आमदारसाहेबांनी आकाशवाणी बंगला ते मंत्रालय साहेबांबरोबर टॅक्सीमध्ये गेले. त्या टॅक्सीचे भाडे ३५ रुपये आमदार साहेबांनी भरले व त्यावेळीचे मुख्यमंत्री शरद पवार व सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याबरोबर आमदार साहेबांनी चर्चा घडवून आणली व शाळा मान्यतेसाठी लागणारा प्रस्ताव आम्ही सादर केला. अशातच ५ ऑगस्ट १९९३ साली आश्रमशाळेला मान्यता मिळाली. त्यावेळी सरांचे फक्त ग्रॅज्युएशन झाले होते. पुढील शिक्षणासाठी मी बी.पी.एड करण्यासाठी सलगर येथे प्रवेश घेतला.१ जून १९९४ पासून ते गावातच आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर पाच वर्ष सहशिक्षक पदावर काम केले.
कामाचा अनुभव आल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्याध्यापक या पदावर केली. त्यावेळी विना अनुदानित तत्त्वावर काम केले. घरच्यांनी सुद्धा अशा कठीण काळामध्ये वडील गणपती बापू भुसनर व आई केराबाई गणपती भुसनर व भाऊ श्रीमंत गणपती भुसनर व पत्नी निलाबाई तुकाराम भुसनर व बहिण अंबुबाई व सोनाबाई यांनी सहकार्य केले.शाळा व संस्था ही सर्वस्वी जबाबदारी यांच्यावर टाकली. ते स्वतः सर्वांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या दहा क्रमांकावर असणाऱ्या आश्रमशाळेमध्ये त्यांच्या शाळेचा नावलौकिक आहे.याचा त्यांना अभिमान वाटतोय.त्याचवेळी सामाजिक न्याय विभागाने त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरीविले होते. पुढे संस्थेच्या सर्व संचालकांच्या मदतीने डिकसळ हे सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर व दऱ्याखोऱ्यात असल्याने येथील मुलांना व मुलींना सातवीच्या पुढे शिक्षण नव्हते व शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सर्वांनी माध्यमिक आश्रम शाळेची गरज लक्षात घेऊन, सर्वच संचालक मंडळ आम. गणपतराव देशमुख यांना भेटले.
यांच्या प्रयत्नाने २७ जानेवारी २००४ ला माध्यमिक आश्रमशाळेला मान्यता मिळाली व ती मान्यता आम.भाई गणपतराव देशमुख साहेबांनी स्वतः फोन करून पेढे घेऊन या व माध्यमिक आश्रम शाळेची मान्यता घेऊन जावा असे सांगितले.
शाळेचा कारभार पाहत असताना गावचा विकास करण्याच्या हेतूने सरपंच होण्याचा त्या कालखंडामध्ये मान ही मिळाला. पुढे गाव चालवित असताना सरांची पत्नी सौ नीलाबाई भुसनर व त्यांना ही श्रीलक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने सरपंच होण्याचा मान मिळाला.
शाळेमध्ये काम करत असताना, विद्यार्थ्यांचे गुणवत्तेबाबत दहावीचा निकाल शंभर टक्के असतो.बाह्य परीक्षा मंथन,एन एम एस स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे यश दिसून आले.शाळेचे बरेचसे विद्यार्थी अधिकारी,इंजिनियर,डॉक्टर सैन्य दलात,पोलिस दलात आहेत. याचा अभिमान त्यांना वाटतो. आज शाळेत शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरही क्रीडाक्षेत्रांमध्ये सुद्धा शाळेची टीम राज्यस्तरीय पर्यंत खेळते व क्रमांक ही पटकावित् आहे. याचाही त्यांना अभिमान वाटतोय.आज शाळेची विद्यार्थी संख्या जवळपास ६०० इतकी आहे.त्यामध्ये निवासी विद्यार्थी संख्या २४० इतकी आहे.त्या विद्यार्थ्यांचे राहण्याचे जेवण्याचे व शिक्षणाचे नियोजन ते स्वतः चांगल्या पद्धतीने पार पाडीत आहेत. शिक्षणाबरोबर तालुक्याच्या राजकारणामध्ये सहभागी असतात.जवळपास सलग पंधरा वर्षे सांगोला तालुका खरेदी_विक्री संघाचे संचालक काम करीत आहेत.आता ते खरेदी_विक्री संघामध्ये व्हाईस चेअरमन या पदावर काम करीत आहेत. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षकांची पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेमध्ये सुद्धा गेली वीस वर्ष संचालक पदावर काम करीत आहेत.ते गावामध्ये व तालुक्यामध्ये ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करीत आहेत. आश्रमशाळेमध्ये इमारत बांधकाम,इमारत जागा व निवासी मुलांना सोयी सुविधा अशा सर्व सोयी माझ्या सोबत असलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले व संस्थेने जी जबाबदारी त्यांच्यावर दिली.त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडली.त्याच दरम्यान माझ्या सर्व कार्यकर्ते यांनी संस्थेला व शाळेला कोणतेही गालबोट न लावता अतिशय सुंदर काम केले आहे.त्याच दरम्यान मुख्याध्यापक तुकाराम भुसनर म्हणाले, आता या ठिकाणी शेवटचे स्वप्न अपुरे आहे की? शाळेमध्ये ज्युनियर कॉलेज व्हावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करीत आहे.आज त्यांनी आपल्या सेवेची ३१ वर्ष सेवा पूर्ण केली. ते आज सेवाज्येष्ठतेनुसार निवृत्त होत आहे.
अनेक पुरस्कारांना गवसणी
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार- सामाजिक न्याय विभाग सोलापूर,कृतिशील आश्रमशाळा शिक्षक पुरस्कार-महाराष्ट्र राज्य कृती समिती सोलापूर,आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार पुरस्कार -धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मंगळवेढा, डिकसळ भूषण पुरस्कार- कै राजाराम बाबु पाटील यांच्या स्मरणार्थ,आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार- साने गुरुजी कथामाला महाराष्ट्र राज्य,आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार -सूर्योदय परिवार सांगोला,आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार- रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वाखरी आश्रमशाळा व आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार -सीबीएस न्यूज
“तेरा ही सहारा….” १३ जणांची बॉडी अन् स्व.आबांचा सहारा
भटक्या विमुक्त जाती_जमाती साठी याच गावातील शिक्षित युवकांनी गावाच्या कल्याणासाठी एकत्र येत १३ जणांनी श्रीलक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.आज याच संस्थेला ३५ वर्ष पूर्ण झाली.हाच सहारा देणारे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व.गणपतआबांनीच ही संस्था या तेरा जणांना मिळवून दिली.आज याच संस्थेचा वेलू गंगणावरती गेला असून,दरवर्षी ६०० हून अधिक मुले येथे पवित्र ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. हीच आश्रमशाळा राज्यात,जिल्ह्यात टॉप वरती आहे.येथे “तेरा ही सहारा” हाच प्रत्यय येत आहे.
संचालक ते मुख्याध्यापक
श्रीलक्ष्मी देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिकसळ नगरीचा जागर करणारे मुख्याध्यापक तुकाराम भुसनर सरांचे शिक्षण क्षेत्रातील ३१ वर्षाचे कार्य वाखणण्या जोगे असेच आहे.सुरुवातीस शिक्षण संस्था स्थापन करताना ते मुख्याध्यापक पदाची कारकीर्द राज्यात,जिल्ह्यात नावारूपास आणणारीच ठरली आहे.यांना खरे तर संस्थेचे सर्वच संचालक,शिक्षकवर्ग यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.आज याच शाळेचा दबदबा आहे.
ज्युनियर कॉलेजच स्वप्न
जिल्ह्यात अव्वलस्थानी असलेल्या डिकसळ आश्रम शाळेत आता ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचे माझे ध्येय आहे अन् ते पूर्ण करणारच.यासाठी सर्वच संचालक मंडळ यासाठी आग्रही आहे.त्याच दृष्टीने देखणी इमारत ही बांधण्याचे नियोजन आहे.