सांगोल्यात जुन्या झेडपी गटाप्रमाणेच निवडणूक होणार का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर वाढला

स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याने लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील असे अपेक्षित असले तरीही तालुक्यात सत्तेत असलेले शेकापचे आम.डॉ. बाबासाहेब देशमुख सत्कारात, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी पाटील हे समारंभ व आजारात, शिवसेना ठाकरे गटाचे दीपक साळुंखे पाटील पक्षांतराच्या विचारात, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट निराशात तर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे सभासद नोंदणी कामानिमित्त जोशात असल्याचे दिसत आहेत. तालुक्यात पूर्वीचे ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण आहेत. त्याचप्रमाणे की नवीन रचने प्रमाणे निवडणुका होणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख राजकारणात नवखे असल्याने सध्या ते राज्यपालापासून सर्व मंत्र्यांच्या व सर्व पक्षांच्या आमदारांच्या गाठीभेटी घेऊन सत्कार करण्यात व तालुक्यात आल्यानंतर सत्कार स्वीकारण्यात सध्या तरी ते मश्गुल आहेत. शेकापची बांधणी वाडीवस्तीपर्यंत असल्याने व संघटन चांगले असल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी मागणी करणाऱ्या इच्छुकांची संख्या त्या पक्षात मोठ्या प्रमाणात आहे. आता तरी त्यांचे जवळचेच स्नेही ग्रामविकास मंत्री जीवनराव गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री झाल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यात उत्साह दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक प्रसंगी शेकाप हा महाविकास आघाडीचा मित्र पक्ष होता व महाराष्ट्राच्या सत्तेत विरोधी पक्षाची म्हणजेच महायुतीची सत्ता आली तरीही आमदार देशमुख यांनी अल्पावधीत भाजपाशी चांगले संबंध जोडल्याने विकासाची गंगोत्री बापूप्रमाणे चालू राहील अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसल्याने अद्याप तरी कोणाबरोबर जाण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला नाही. परंतु भाजपाशी जवळीक वाढण्याची शक्यता वाढली आहे. शेकाप मधील एक मोठा गट भाजपा बरोबरच जाण्याच्या तयारीत असून तशा प्रकारचा दबाव वाढत असल्याचे सध्यातरी दिसत आहे पुढे काय होते पाहूया.
उबाठा गटाचे नेते दीपक साळुंखे पाटील हे विधानसभा निवडणूक प्रसंगीच त्या पक्षात होते त्यानंतर त्या पक्षाचे पूर्वीचे नेते व आबाला मानणारे कार्यकर्ते यांचं मनोमिलन झालेलं दिसून येत नाही. त्यामुळे आबा शिवसेना ठाकरे गटाला लवकरच सोडचिट्टी देऊन भाजपात जातील अशी सध्या तरी जोरदार चर्चा आहे. अद्याप तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात शांत जरी असले तरी गट बांधणी करण्यात प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी पाटील आजारी असले तरी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी समारंभात सहभाग नोंदवत असल्याचे दिसत आहे. हाता तोंडाशी आलेले मंत्री पद विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने गमावले व पालकमंत्री पदाला मुकलेची खंत त्यांना वाटत आहे. तसे ते बोलूनही दाखवत आहेत. आजारी नसते तर तिरंगी लढतीत सुद्धा बाजी मारली असती असे बापूसह कार्यकर्ते मत व्यक्त करीत आहेत. बापू हे पराभूत झाले असले तरी सध्या ते कार्यकर्त्यांची निराशा घालवून पुन्हा त्यांच्यात जोश निर्माण करण्यासाठी कार्यालयात येऊन बसून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. निवडणूक येतात – जातात त्यापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे हे समजून ते कामाला लागलेले आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी स्वतः पक्षासाठी रस्त्यावर उतरून गावागावात जाऊन सभासद नोंदणी मोहीम जोमाने सुरू केली आहे. सांगोला शहरात स्वतः घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करून शहरात 25000 व ग्रामीण भागात एक लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भाजप पक्ष बांधणीला केदार सावंत कामाला लागलेले दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा कसल्याही परिस्थितीत फडकवण्याचा निर्धार करून कामाला लागलेले दिसून येत आहेत. त्या दृष्टीने सभासद नोंदणीचे काम जोशात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट ची तालुक्यात कार्यकारणी सुद्धा नाही. त्यामुळे त्या पक्षात सामसूम व निराशा दिसत आहे.