सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
अनेक वर्षांपासून प्रशासकाच्या तावडीत असलेल्या जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगर पालिका तसेच ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. राज्यात सरकार स्थापन होताच या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. या महिनाअखेर वार्ड रचनेचा आराखडा जाहीर होणार असून पुढील महिन्यात प्रारूप मतदार याद्या, आरक्षण प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चार वर्षे प्रशासक
जिल्ह्यातील विविध नगरपालिकांवर चार वर्षांपासून प्रशासक आहे. सोलापूर महापालिकेवर पावणेतीन वर्षांपासून प्रशासक आहेत. सांगोला नगर पालिकेवर २०२१ पासून प्रशासक आहे. या प्रशासकाच्या तावडीतून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था मोकळ्या होणार आहेत.
जानेवारी २०२५ मध्ये या संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. डिसेंबरअखेर वॉर्ड रचनेचा आराखडा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
अगोदर नगरपालिका, महापालिका निवडणुका
सुरुवातीला जिल्ह्यातील नगरपालिका तसेच महापालिका निवडणुका होतील. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागेल. सोलापूर महापालिकेवर ७ मार्च २०२२ पासून प्रशासक आहे. म्हणजे पावणेतीन वर्षांपासून महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. वॉर्ड रचनेनंतर आरक्षण कार्यक्रमही जाहीर होईल. त्यानंतर निवडणूक मतदान होईल.
सांगोल्यात २०२१ पासून प्रशासक
बार्शी, पंढरपूर, करमाळा, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, कुडूवाडी, मोहोळ, अकलूज या नगरपालिकांवर डिसेंबर २०२१ पासून प्रशासक आहे.
डीपीसीवर नवीन ३० सदस्यांची नियुक्ती होणार
निवडणुका न झाल्याने जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच महापालिकेच्या ३० जागा रिक्त आहेत. या निवडणुका झाल्यानंतर डीपीसीवर नवीन ३० सदस्यांची नियुक्ती होईल.
वॉर्ड रचनेसंदर्भात यापूर्वी दोन आदेश निघाले आहेत. सुरुवातीला तीन सदस्यांचा वॉर्ड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यात बदल करत चार सदस्यांचा वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आदेशही निघाला. आता यात बदल होण्याची चर्चा आहे. त्यामुळे किती सदस्यांचा वॉर्ड होईल, या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता आहे.
५० हून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक
जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींची सार्वजनिक, तर काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका प्रस्तावित आहेत. डिसेंबर अखेर या ग्रामपंचायतींची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
राजकीय घडामोडींना वेग
विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. सरकारही स्थापन झाले आहे. निवडणुकीत मागील वर्षभरापासून व्यस्त असलेली नेतेमंडळी आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी ॲक्टिव्ह मोडवर आली आहेत. कोणत्या जिल्हा परिषद गटात, कोणत्या पंचायत समिती गणात कोणता उमेदवार द्यायचा याची खलबते सुरू झाली आहेत. विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.